नागरिकांनी भरून काढली दोन दिवसांच्या लॉकडाऊनची कसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:31 AM2021-04-13T04:31:21+5:302021-04-13T04:31:21+5:30

खरेदीसाठी बाजारात तुफान गर्दी परंडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवारी झालेल्या ‘वीकेंड’ लाॅकडाऊनला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला; ...

Citizens filled out a two-day lockdown | नागरिकांनी भरून काढली दोन दिवसांच्या लॉकडाऊनची कसर

नागरिकांनी भरून काढली दोन दिवसांच्या लॉकडाऊनची कसर

googlenewsNext

खरेदीसाठी बाजारात तुफान गर्दी

परंडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवारी झालेल्या ‘वीकेंड’ लाॅकडाऊनला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला; मात्र सोमवारी शहरातील बाजारात तुफान गर्दी करीत दोन दिवसांचा ‘बॅकलाॅग’ भरुन काढल्याने प्रतिबंधात्मक नियम पायदळी तुडविले गेल्याचे दिसून आले.

शनिवार व रविवारी शहरात वीकेंड लाॅकडाऊनमुळे शुकशुकाट होता; मात्र सोमवारी नागरिकांची खरेदीसाठी अक्षरश: झुंबड उडाली. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात तुफान गर्दी झाली. शहरातील नेहरू चाैक, मंडईपेठ, आठवडा बाजार मैदानात शेकडो नागरिक दाटीवाटीने फिरत होते. मंडईपेठेत तर दुचाकीस्वारांनाही या गर्दीमुळे दुचाकी चालविणे मुश्कील झाले. या गर्दीतच न.प. चे मुख्याधिकारी दीपक इंगोले आपल्या पथकासह विनामास्क फिरणाऱ्यांना काठीचा प्रसाद देऊन पोलिसी खाक्या दाखवत होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार केवळ किराणा, भाजीपाला, बेकरी या जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना अटींचे पालन करुन ग्राहक करण्यास परवानगी असतानाही इतरही अनेक दुकानांमध्ये ग्राहकांची झुंबड उडाली होती. तर अनेक कापड, भांडी, स्टेशनरी आदी दुकानदार शटर उघडून ग्राहकांना आत घेऊन शटर बंद करून व्यवसाय करीत होते. जीवनावश्यक वस्तू वगळता अनेक व्यावसायिकांचा आज बंद दुकानांतून व्यवसाय म्हणजे ‘वरुन कीर्तन आतून तमाशा’ चालू होता. त्यामुळे कोरोना निर्बंधाचे धिंडवडे निघाले.

बारसमोरही रांगा

सोमवारी बीअर बारमधून मद्य विक्रीसाठी पार्सल सेवेस परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील सर्व बीअर बारसमोर मद्यप्रेमींनी खरेदीसाठी गर्दी केली. त्यामुळे काही बारमधील मद्यसाठा दुपारीच संपला. अनेक मद्यपिंनी संभाव्य लाॅकडाऊनचा विचार करून मोठ्या प्रमाणात मद्याचा साठा खरेदी करून आगामी काळातील टंचाईची सोय करून ठेवली.

Web Title: Citizens filled out a two-day lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.