तरुणीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 09:09 PM2019-02-05T21:09:10+5:302019-02-05T21:09:53+5:30

इच्छीत स्थळी सोडण्याऐवजी तरुणीला भलत्या ठिकाणी नेत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी सिंहगडरोड पोलिसांनी एका सहा आसनी रिक्षाचालकाला अटक केली.

The rickshaw driver who assaulted girl was arrested by Pune police | तरुणीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक 

तरुणीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक 

googlenewsNext

पुणे : इच्छीत स्थळी सोडण्याऐवजी तरुणीला भलत्या ठिकाणी नेत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी सिंहगडरोड पोलिसांनी एका सहा आसनी रिक्षाचालकाला अटक केली. युवतीने रिक्षातून उडी मारल्याने तिला किरकोळ स्वरुपाची दुखापत झाली आहे. 

           जयवंत मारूती भुरूक (वय २७, रा. कोल्हेवाडी, ता. हवेली, मुळ रा. आंतरोली, जि. वेल्हा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित २३ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. तक्रारदार युवती नृत्य प्रशिक्षण घेत आहे. पुणे स्टेशन भागात वर्ग आहे. २७ जानेवारी २०१९ रोजी रात्री ही घटना घडली. 

           फिर्यादी या रात्रीच्या वेळी स्वारगेटवरून धायरी येथे निघाल्या होत्या. त्यावेळी त्या आरोपीच्या रिक्षामध्ये बसल्या. हिंगणे भागात एक महिला आणि पुरुष प्रवासी रिक्षातून उतरले. त्यानंतर रिक्षात युवती एकटीच होती. फिर्यादी यांना धायरी येथे सोडण्याऐवजी त्याने जबरदस्तीने फिर्यादींना दुसरीकडे घेवून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिक्षा चालकाने सिंहगड रस्त्याजवळ असलेल्या कालव्याच्या रस्त्याने रिक्षा नेली. कालव्याच्या रस्त्याने रिक्षा चालक पुन्हा सिंहगड रस्ता भागात आला आणि मुंबई-बंगळुरु बाहयवळण मार्गाच्या दिशेने रिक्षा नेली. 

त्यामुळे युवतीला संशय आला. तिने रिक्षा चालकाला रिक्षा कुठे चालविली आहे, अशी विचारणा केली. तेव्हा माझे नºहे भागात काम आहे. दहा मिनिटांत धायरीत सोडतो, असे रिक्षा चालकाने सांगितले. त्यामुळे युवतीने गोल्ड जिमजवळ रिक्षा चालकाला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रिक्षा चालकाने युवतीने चेहऱ्यावर गुंडाळलेला रुमाल ओढण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून तिने रिक्षातून उडी मारली. त्यानंतर तिने तिच्या मित्राच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. या घटनेत किरकोळ जखमी झालेल्या युवतीने खासगी रुग्णालयात उपचार घेतले. शनिवारी तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक आशा गायकवाड तपास करत आहेत. 

            भुरूक हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. फिर्यादींना कोणत्या उद्देशाने त्यांना दुसरीकडे नेले, यासह पुढील तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील राजश्री कदम यांनी केली. न्यायालयाने त्याला ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला. या प्रकाराबाबत पोलिसांनी प्रचंड गोपनीयता बाळगली होती.  

Web Title: The rickshaw driver who assaulted girl was arrested by Pune police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.