पिंपळे सौदागरमध्ये अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 07:45 PM2019-07-23T19:45:14+5:302019-07-23T19:45:31+5:30

सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे चिमुकली आई-वडिलांसोबत घरात झोपली. मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास नराधमाने आई शेजारी झोपलेल्या चिमुकलीला उचलून नेले.

Rape and murder of two and a half year old girl in pimple saudagar | पिंपळे सौदागरमध्ये अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या  

पिंपळे सौदागरमध्ये अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या  

googlenewsNext

पिंपरी : आई-वडिलांसोबत घरात झोपलेल्या अडीच वर्षाच्या चिमुकलीला आईच्या कुशीतून नराधमाने उचलून नेले. बलात्कार करून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह लष्कराच्या मोकळ्या मैदानात टाकून दिला. ही खळबळजनक घटना पिंपळे सौदागर येथे मजुरांच्या कामगार वसाहतीत घडली.
  सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. पिंपळे-सौदागर येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी पीडित चिमुकलीचे आईवडील मजुरीचे काम करतात. हे मजूर दाम्पत्य मूळचे छत्तीसगडचे आहे. पिंपळे सौदागरमधील लेबर कॅम्पमध्ये हे कुटुंब पत्र्याच्या खोलीत राहते. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे चिमुकली आई-वडिलांसोबत घरात झोपली. मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास नराधमाने आई शेजारी झोपलेल्या चिमुकलीला उचलून नेले. आईला पहाटे जाग आल्यानंतर चिमुकली आसपास कोठेच दिसली नाही. कुटुंबीयांनी आणि नातेवाइकांनी सगळीकडे शोधाशोध सुरू केली; मात्र ती आढळून आली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी सांगवी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांसह  नातेवाईक चिमुकलीचा शोध घेत असताना मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह पिंपळे सौदागर येथील लष्कराच्या हद्दीतील मोकळ्या जागेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी औंध रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनात चिमुकलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले. सांगवी पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक आरोपीचा शोध घेत आहे.

Web Title: Rape and murder of two and a half year old girl in pimple saudagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.