लाच स्वीकारण्यात खासगी व्यक्ति देखील आघाडीवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 04:57 PM2018-09-20T16:57:12+5:302018-09-20T16:57:34+5:30

चालू वर्षात राज्यातील अपसंपदेच्या एकूण १५ प्रकरणांमध्ये ३० जणांचा समावेश असून, यापैकी तब्बल १५ जण खासगी आहेत.

Private person is also the leader in accepting the bribe! | लाच स्वीकारण्यात खासगी व्यक्ति देखील आघाडीवर!

लाच स्वीकारण्यात खासगी व्यक्ति देखील आघाडीवर!

Next

संतोष वानखडे 

वाशिम -  शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचाºयांबरोबरच खासगी व्यक्तीही ‘लाच’ स्वीकारण्यात आघाडीवर असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांवरून स्पष्ट होत आहे. १ जानेवारी ते १३ सप्टेंबर २०१८ या कालावधीत राज्यभरात एकूण ९९ खासगी व्यक्तींवर लाचप्रकरणी कारवाई करण्यात आली. अपसंपदा प्रकरणांमध्ये एकूण ३० पैकी १५ आरोपी हे खासगी व्यक्ती आहेत. 

सर्वसामान्य नागरिकांना छोटी-मोठी कामे करण्यासाठी रोज शासकीय कार्यालयाचे खेटे मारावे लागतात. मात्र, येथे आल्यावर काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून टोलवाटोलवी होत असल्याने विहित मुदतीत काम होत नाही. विहित मुदतीत काम व्हावे, यासाठी काही जणांकडून लाचेची मागणीही होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईपासून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी काही जणांनी खासगी व्यक्तींमार्फत (दलाल) लाचेची रक्कम स्वीकारण्याचा मार्ग अवलंबिला असल्याचे दिसून येत आहे. लाचप्रकरणी खासगी व्यक्तीही कारवाईच्या कक्षेत आल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच खासगी व्यक्तीही लाच स्वीकारण्यात आघाडीवर असल्याची बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीने अधोरेखित केली. १ जानेवारी ते १३ सप्टेंबर २०१८ या दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यभरात ६०७ प्रकरणांत लाचप्रकरणी एकूण ८१५ जणांविरूद्ध कारवाई केली. यामध्ये वर्ग एक दर्जाचे ५१ अधिकारी, वर्ग दोन दर्जाचे ६८ अधिकारी, वर्ग तीनचे सर्वाधिक ५०४ कर्मचारी, वर्ग चारचे ३७ कर्मचाऱ्यांबरोबरच ५६ इतर लोकसेवक आणि ९९ खासगी व्यक्तींचा समावेश आहे. इतर लोकसेवक या संवर्गात लोकप्रतिनिधी, पदाधिकारी किंवा त्यांचे नातेवाईक, कंत्राटी तत्वावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. चालू वर्षात राज्यातील अपसंपदेच्या एकूण १५ प्रकरणांमध्ये ३० जणांचा समावेश असून, यापैकी तब्बल १५ जण खासगी आहेत.

लाचप्रकरणी अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच खासगी व्यक्ती, इतर लोकसेवक व त्यांचे नातेवाईक आदींवरही कारवाई केली जाते. वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर चालू वर्षात जवळपास ८ ते १० खासगी व्यक्ती, इतर लोकसेवकांविरूद्ध कारवाई करण्यात आली. शासकीय, निमशासकीय कामासाठी कुणी लाचेची मागणी करीत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी.

- एन.बी. बोराडे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम.

Web Title: Private person is also the leader in accepting the bribe!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.