आई-वडील उत्तरकार्याला; घरात मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 07:40 PM2021-11-14T19:40:12+5:302021-11-14T19:42:55+5:30
Suicide Case :सूरज उर्फ लखन हरि कंगार (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकलेले नाही.
जळगाव : आई, वडील, भाऊ व वहिणी नातेवाईकाच्या उत्तरकार्याच्या कार्यक्रमाला गेलेले असताना मागे मुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी रामेश्वर कॉलनीत उघडकीस आली. सूरज उर्फ लखन हरि कंगार (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकलेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज हा अविवाहित होता. एमआयडीसीत कंपनीत कामाला होता. रामेश्वर कॉलनीतील स्वामी समर्थ मंदिराजवळ तो कुटुंबासह वास्तव्याला होता. रविवारची सुटी असल्याने तो एकटाच घरी होता तर वरणगाव येथे नातेवाईकाचे निधन झालेले असल्याने वडिल हरी दिगंबर कंगार, आई मालती, मोठा भाऊ मुकेश, वहिणी असा संपूर्ण परिवार सकाळीच वरणगावला गेले होते. सायंकाळी सहा वाजता भाऊ मुकेश पुढे घरी आला असता सूरज याने राहत्या घरात दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले.
दुपारी तीन वाजेच्या जवळपास त्याने गळफास घेतल्याचा अंदाज आहे. मुकेश व इतरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. हवालदार रतिलाल पवार यांनी पंचनामा केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.