Nirav Modi Extradition: भारतात नीरव मोदीला भोगावा लागणार तुरूंगवास, पण तरीही मिळणार 'या' खास सोयी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 08:36 PM2022-11-10T20:36:16+5:302022-11-10T20:37:40+5:30

पीएनबी घोटाळा उघडकीस येण्यापूर्वीच नीरव मोदी जानेवारी २०१८ मध्ये भारताबाहेर पळून गेला होता.

Nirav Modi Extradition PNB scam culprit will face imprisonment in India but will still get these special facilities in Arthur Road Jail | Nirav Modi Extradition: भारतात नीरव मोदीला भोगावा लागणार तुरूंगवास, पण तरीही मिळणार 'या' खास सोयी

Nirav Modi Extradition: भारतात नीरव मोदीला भोगावा लागणार तुरूंगवास, पण तरीही मिळणार 'या' खास सोयी

Next

Nirav Modi Extradition, India: पंजाब नॅशनल बँक प्रकरणातील फरारी नीरव मोदी भारतात येऊ शकणार का? हा अजूनही प्रश्न आहे. लंडन हायकोर्टाने नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. मात्र, त्याचा भारतात येण्याचा मार्ग अद्याप पूर्णपणे मोकळा झालेला नाही. कारण, त्याला सुप्रीम कोर्टात आणि नंतर मानवाधिकार कोर्टात जाण्याचा मार्ग अजूनही शिल्लक आहे. लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टाने फेब्रुवारी २०२१ मध्ये नीरव मोदीच्या भारतात प्रत्यार्पणाला मंजुरी दिली. याला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले, तेथे त्यांचे अपील फेटाळण्यात आले. पण जरी भारतात त्याला कारागृहात राहावे लागले तरीही त्याला काही विशेष सेवा मिळणार असल्याची माहिती आहे.

नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकेची (PNB) १४ हजार ५०० कोटी रुपयांची फसवणूक केली. नीरव मोदीवर ६ हजार ८०५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पीएनबी घोटाळा उघडकीस येण्यापूर्वीच नीरव मोदी जानेवारी २०१८ मध्ये भारतातून पळून गेला होता. नीरव मोदीने भारतात न येण्यासाठी अनेक क्लृक्त्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या वकिलांनी सांगितले की, तो मानसिक आजाराने त्रस्त आहे आणि भारतात आल्यावर आत्महत्येचा धोकाही आहे. पण, नीरव मोदीला कोणताही मानसिक आजार नाही किंवा त्याने आत्महत्येचा किंवा स्वत:ला इजा करण्याचा प्रयत्नही केलेला नाही, असे या तज्ज्ञांचे मत असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाने सांगितले की, प्रत्यार्पणानंतर नीरव मोदीला मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील बॅरेक क्रमांक १२ मध्ये ठेवण्यात येईल, जे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि तेथे सतत त्याच्यावर लक्ष ठेवले जाईल, जेणेकरून त्याचा आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा धोकाही कमी होईल.

आर्थर रोड जेल किती खास आहे?

- आर्थर रोड जेल ब्रिटिशांनी १९२५ मध्ये बांधले होते. १८४२ ते १८४६ या काळात बॉम्बेचे (आताचे मुंबई) गव्हर्नर सर जॉर्ज आर्थर यांच्या नावावरून या तुरुंगाचे नाव ठेवण्यात आले.
- १९७० मध्ये या रस्त्याचे नाव बदलून साने गुरुजी मार्ग असे करण्यात आले. १९९४ मध्ये या कारागृहाचे नाव बदलून मुंबई सेंट्रल जेल असे करण्यात आले. तरीही ते आर्थर रोड जेल म्हणून ओळखले जाते.
- आर्थर रोड जेल २.८३ एकरमध्ये पसरले आहे. यात एकावेळी ८०० कैदी बसू शकतात. मात्र काही वेळा कैद्यांची संख्या दोन ते तीन हजारांपर्यंत पोहोचते.
- या तुरुंगात दहशतवादी अजमल कसाब, अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम, २००८ च्या मुंबई हल्ल्यातील दोषी छोटा राजन यांच्यासह अनेक हायप्रोफाईल कैदी ठेवण्यात आले आहेत.
- विजय मल्ल्याला भारतात आणल्यास त्यालाही बॅरेक क्रमांक-12 मध्ये ठेवण्यात येईल, असे सरकारने लंडनमधील न्यायालयाला सांगितले होते. मल्ल्यावर ९ हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे.

नीरव मोदीला कोणत्या सुविधा मिळणार?

- इतर कैद्यांप्रमाणेच नीरव मोदीला चटई, उशी, चादर आणि ब्लँकेट देण्यात येणार आहे. त्याला दररोज शुद्ध पिण्याचे पाणी, चोवीस तास वैद्यकीय सुविधा, शौचालय आणि कपडे धुण्याची सुविधाही मिळेल.
- या कक्षात पुरेशी प्रकाश आणि हवा खेळती असल्याची सुविधा असेल, असे आश्वासन कारागृह विभागाने दिले आहे. मोदीला सामान ठेवण्यासाठी एक कपाटही देण्यात येणार आहे.
- नीरव मोदीला दररोज व्यायाम किंवा इतर कामासाठी सेलमधून बाहेर पडण्याची परवानगी असेल. मात्र, त्याला एका दिवसात एका तासापेक्षा जास्त वेळ बाहेर राहता येणार नाही.

Web Title: Nirav Modi Extradition PNB scam culprit will face imprisonment in India but will still get these special facilities in Arthur Road Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.