हिंगोलीतील खून प्रकरणातील आरोपीस बडोद्यातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 07:01 PM2018-07-26T19:01:07+5:302018-07-26T19:01:28+5:30

शेर-ए-पंजाब धाब्यासमोरील उभ्या कंटेनरमध्ये आढळलेल्या मृतदेह प्रकरणी चौकशीनंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला. त्यातील आरोपीस बाळापूर पोलिसांनी बडोदा गुजरात येथून अटक केली आहे.

Hingoli murder case accused arrested in Baroda | हिंगोलीतील खून प्रकरणातील आरोपीस बडोद्यातून अटक

हिंगोलीतील खून प्रकरणातील आरोपीस बडोद्यातून अटक

Next

हिंगोली : शेर-ए-पंजाब धाब्यासमोरील उभ्या कंटेनरमध्ये आढळलेल्या मृतदेह प्रकरणी चौकशीनंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला. त्यातील आरोपीस बाळापूर पोलिसांनी बडोदा गुजरात येथून अटक केली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाळापूर पोलीस ठाणे हद्दीतील जरोडा शिवारातील मुख्य रस्त्याशेजारच्या हॉटेल शेर-ए-पंजाब धाब्यासमोर कंटेनर क्र. जी.जे. १४ डब्ल्यू २८२७ हे उभे होते. या कंटेनरच्या कॅबीनमध्ये एक मृतदेह आढळला होता. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोनि व्यंकटेश केंद्रे पथकासह घटनास्थळी हजर झाले. मयतास शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली. बारकाईने तपास केला. मयताचे नाव बलवान हवासिंग (रा. कुबजानगर, पिंचोपा कलानदादरी जि. भिवाजी हरियाना) येथील असल्याचे निष्पन्न झाले. 

शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात छातीला गंभीर दुखापतीने मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर पोनि केंद्रे, फौजदार तानाजी चेरले यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यावेळी दोन गाडीच्या चालकांची भांडणे व मारामारी झाल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. गुजरात येथील गाडीमालक रमेशचंद्र भालोटिया यांना संपर्क करून त्यांच्या कंपनीच्या दुसऱ्या कंटेनरची माहिती घेतली. त्या चालकाचे आधारकार्ड, चालक परवाना मागवून घेतला. तो फोटो प्रत्यक्षदर्शींना दाखवून ओळख पटविली.

मयतासोबत मारामारी करणारा तोच चालक आहे, ही खात्री पटल्यानंतर या प्रकरणी चालक बलवान जोधाराम (रा. पिंचोपा कलन,  जिल्हा भिवानी हरियाना) याचेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आरोपीचे लोकेशन मिळविले. आरोपी हा गुजरातमधील बडोद्याच्या ट्रान्सपोर्ट कंपनीत येणार असल्याची माहिती केंद्रे यांना मिळाली. त्यांनी तातडीने जमादार संतोष नागरगोजे, गोदमवाड यांना बडोद्याकडे रवाना केले. बडोदा (गुजरात) येथील ट्रान्सपोर्ट कंपनीत आरोपी बलवान जोधाराम येताच त्यास बेड्या ठोकल्या. बाळापूर पोलिसांनी त्यास अटक करून जलदगतीने खुनाचा तपास मार्गी लावला. 

‘फिल्टर’ने पटविली ओळख
शेर-ए-पंजाब धाब्याजवळ पंक्चर जोडण्याचे दुकान आहे. येथे काम करणारा विठ्ठल चांदराव भिसे (१४, रा. जरोडा) याचे टोपननाव फिल्टर आहे. ग्रीस भरणारा साहेबराव मस्के व फिल्टरने त्या दोन चालकांची मारामारी प्रत्यक्ष पाहिली. मारामारीत मयत हा कंटेनरच्या केबिनमधून खाली पडला. जोरात आवाज आल्याने हे दोघे मदतीसाठी आले. पण आरोपी चालकाने दम देवून दोघांना हुसकावून लावले. पोलिसांनी आरोपीचा फोटो फिल्टरला दाखवताच त्याने तो लगेच ओळखला. फिल्टर व म्हस्के या दोन प्रत्यक्षदर्शीमुळे खुनाच्या गुन्ह्याचा तपास करणे सोपे गेले

Web Title: Hingoli murder case accused arrested in Baroda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.