मोलकरणीला कपाटात कोंडून ठेवल्याच्या गुन्हय़ाखाली सरकारी वकील दोषी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 06:45 PM2019-01-07T18:45:33+5:302019-01-07T19:17:03+5:30

घरात कामासाठी ठेवलेल्या मोलकरणीस लोखंडी कपाटात कोंडून ठेवून तिच्या जीवाला धोका पोहोचविण्याच्या आरोपाखाली सत्र न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम करणा-याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी यांनी दोषी ठरविले.

 Government lawyer convicted under the charge of keeping the valuables confined | मोलकरणीला कपाटात कोंडून ठेवल्याच्या गुन्हय़ाखाली सरकारी वकील दोषी

मोलकरणीला कपाटात कोंडून ठेवल्याच्या गुन्हय़ाखाली सरकारी वकील दोषी

मडगाव - घरात कामासाठी ठेवलेल्या मोलकरणीस लोखंडी कपाटात कोंडून ठेवून तिच्या जीवाला धोका पोहोचविण्याच्या आरोपाखाली सोमवारी दक्षिण गोव्याच्या सत्र न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम करणा-या लादिस्लाव फर्नाडिस यालाच मडगावचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी राम प्रभूदेसाई यांनी दोषी ठरविले. गोव्याच्या न्यायालयीन इतिहासात एक सरकारी वकीलच गुन्हेगार म्हणून दोषी ठरण्याची ही पहिलीच वेळ असून या प्रकरणात शिक्षेसंबंधी युक्तीवाद करण्यासाठी 14 जानेवारीर्पयत ही सुनावणी तहकूब करण्यात आली.

फर्नाडिस यांना भादंसंच्या 323 (दुखापत करणे), 341 (बळजबरीने अडवणूक करणे) व 346 (बंद जागेत कोंडून ठेवणे) या कलमाखाली दोषी ठरविण्यात आले आहे. या गाजलेल्या प्रकरणात खास सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. प्रितम मोराईस यांनी काम पाहिले.
2006 साली घडलेल्या आणि त्यावेळी संपूर्ण राज्यात अत्यंत गाजलेल्या या प्रकरणात सुरुवातीला संशयित फर्नाडिस याच्याविरोधात अल्पवयीन मुलीला कामाला ठेवले म्हणूनही आरोप ठेवण्यात आले होते. मात्र वैद्यकीय तपासणीत सदर मुलगी अल्पवयीन नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बाल न्यायालयाकडून हे प्रकरण मडगाव प्रथम वर्ग न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. बाल हक्क चळवळीतील संस्था असलेल्या जन उगाई या संस्थेने हे प्रकरण पोलिसांर्पयत पोहोचविले होते.

या प्रक़रणाची पार्श्वभूमी अशी की, त्यावेळी सहाय्यक सरकारी वकील म्हणून काम करणारे फर्नाडिस यांनी मूळ ओरिसा येथील बसंती पसरीचा या मुलीला आपल्याकडे मोलकरीण म्हणून कामाला ठेवले होते. सदर मुलीने दिलेल्या जबानीप्रमाणे, काम करताना तिचा छळही केला जात होता. त्यामुळे तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी तिला कोलवा पोलिसांनी पुन्हा फर्नाडिस यांच्या घरी आणून सोडताना सदर मुलीला तिच्या घरी पाठविण्याचा सल्ला दिला होता. असे असतानाही फर्नाडिस यांनी त्या मुलीला घरी न पाठविता आपल्याच घरी कामाला ठेवले. याची वर्दी जन उगाई या संस्थेला मिळाल्यानंतर 24 ऑगस्ट 2006 रोजी या संस्थेकडून पोलिसांत तक्रार करण्यात आल्यानंतर संशयिताच्या कोलवा येथील घरी पोलिसांनी छापा टाकला असता पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी फर्नाडिस यांनी सदर मुलीला लोखंडी कपाटात बंद करुन त्या कपाटाला चावी केली आणि सदर मुलगी आपल्या घरी नाहीच, असा बहाणा केला होता. पोलीस उपनिरीक्षक गुरुदास कदम यांनी घराची झडती घेतली असता, त्यांना हे बंद कपाट दिसून आल्यावर संशयिताला ते उघडण्यास भाग पाडले असता, सदर मुलगी अस्वस्थावस्थेत त्या कपाटात कोंडून ठेवल्याचे दिसून आले होते.

Web Title:  Government lawyer convicted under the charge of keeping the valuables confined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.