फसवणुकीच्या रक्कमेतून ठगांची कोट्यवधीची ऑनलाईन शॉपिंग; ७ जणांना अटक

By मनीषा म्हात्रे | Published: March 15, 2024 02:36 PM2024-03-15T14:36:45+5:302024-03-15T14:37:10+5:30

पश्चिम बंगाल मधून सात जणांना बेड्या, क्रेडिट कार्ड डाटा सुरक्षित करण्याच्या नावाखाली खाते रिकामे...

Fraudsters rake in millions online shopping; 7 people arrested | फसवणुकीच्या रक्कमेतून ठगांची कोट्यवधीची ऑनलाईन शॉपिंग; ७ जणांना अटक

फसवणुकीच्या रक्कमेतून ठगांची कोट्यवधीची ऑनलाईन शॉपिंग; ७ जणांना अटक

मुंबई : क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड डाटा सुरक्षित करण्याच्या नावाखाली बँक खात्याची माहिती मिळवायची. पुढे याच माहितीच्या आधारे ऑनलाईन शॉपिंग करून खरेदी केलेल्या वस्तूंची विक्री करणाऱ्या टोळीचा दक्षिण विभाग सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत सात जणांना पश्चिम बंगाल येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ५० लाख रुपयांची रोकडसहित किंमती ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

दक्षिण विभाग सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मार्च रोजी चर्चगेट येथे राहणारे तक्रारदार यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. २९ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान अज्ञात इसमाने तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांचे बँक खाते, डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड यांची माहीती मिळवली. तक्रारदार, त्यांची पत्नी आणि परदेशात राहणाऱ्या मुलीच्या बचत खात्यामधुन पैसे क्रेडीट कार्ड मध्ये वळवले. पुढें क्रेडीट कार्ड व्दारे, फ्लिपकार्ट, मिंत्रा,स्विगी सह वेगवेगळ्या ऑनलाईन पोर्टलचा वापर करून एकूण १ कोटी ४८ लाख ५६ हजार रुपयांची शॉपिंग केली.

गुन्ह्यातील आरोपीने क्रेडीट व्दारे महागड्या वस्तु मागवून त्या कोलकत्ता येथे विविध ठिकाणी डिलीव्हरी झाल्याचे निष्पन्न होताच, पोलीस पथक कोलकत्ता येथे रवाना झाले. याठिकाणी पोलीस आल्याचे कळताच आरोपी सिलीगुडी येथे पळुन गेले होते. पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सिलिगुडी येथून आरोपींना ताब्यात घेतले. चौकशी अंती त्यांना अटक करण्यात आली. अटक सातही आरोपींना सिलीगुडी येथील न्यायालयात हजर करून ट्रान्झीट रिमांड घेण्यात आले. 

फसवणुकीसाठी थाटले कॉलसेंटर 

आरोपी कोलकत्ता येथे कॉलसेंटर चालवत असून, भारतीय व परकीय नागरिकांना क्रेडीट कार्ड सुरक्षितते बाबत कॉल करून त्यांच्या क्रेडीट कार्डची माहीती मिळवायचे. पुढे याच माहितीच्या आधारे ऑनलाईन शॉपींग करत असल्याचे चौकशीत समोर आले.

अटक आरोपी...

रयान कालौल शाहदास ( २२ ), अरुणभा अमिताभौ हल्डर (२२),  रितम अनिमेश मंडल ( २३ ), तमोजीत शेखर सरकार ( २२ ), रजिब सुखचांद शेख (२४),सुजोय जयंतो नासकर (२३) आणि रोहीत बरून बैदय (२३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते कोलकत्ता येथे राहणारे आहे. 

ती डिलिव्हरी थांबवली...

त्यांच्याकडून ५० लाखांची रोकड, २७ मोबाईल फोन, ५ वॉच, ३ एअर बर्ड, १ मॅकबुक, १ आयपॅड, ११ परफ्युम बाटल्या, २ लेडीज बॅग, २ फ्रिज, २ एअर कडिशनर, २ प्रिंटर, १ किचन चिमणी जप्त करण्यात आली आहे. तक्रारदार यांची फसवणुक झालेल्या ६० लाख रुपये किमतीच्या वस्तुची ऑनलाईन पोर्टल व्दारे डिलीव्हरी केली होती. अन्य मालाची डिलीव्हरी तात्काळ तक्रार केल्याने थांबविण्यात आलेली आहे. 

वैयक्तिक माहिती शेअर करू नका..

आपली वैयक्तिक माहीती कोणालाही देवु नये व आपली ऑनलाईन फसवणुक झाल्यास तात्काळ १९३० या क्रमांकावर तक्रार करावी असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

या पथकाची कामगिरी...

सह पोलीस आयुक्त (गुन्हे), लखमी, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा )शशिकुमार मिना,पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे,  सहा. पोलीस आयुक्त, सायबर, गुन्हे शाखा अबुराव सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, पोलीस निरीक्षक किरण जाधव, पोलीस निरीक्षक मर्गेश मजगर, पोलीस उप निरीक्षक सचिन त्रिमुखे, पोउनि श्वेता कढणे, पोउनि धनवेश पाटील, सपोनि श्रीराम घोडके, पोना संतोष गलांडे, पोना. संदिपान खरजे, प्रविण चाळके, किरण झुंजार पोशि. निखील गाडे यांनी ही कामगिरी केली आहे.

Web Title: Fraudsters rake in millions online shopping; 7 people arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.