Bhima Koregaon Violence Case: Sudha Bhardwaj, Vernon Gonsalves, Arun Ferreira may be arrested | Koregaon - Bhima : सुधा भारद्वाज, वर्नोन गोन्साल्वीस, अरूण फरेरा यांना होऊ शकते अटक
Koregaon - Bhima : सुधा भारद्वाज, वर्नोन गोन्साल्वीस, अरूण फरेरा यांना होऊ शकते अटक

पुणे - भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नजरकैदेत होते असलेल्या सुधा भारद्वाज, वर्नोन गोन्साल्वीस, अरूण फरेरा यांचा जामीन अर्ज आज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे या तिघांना कधीही पुणे पोलीस अटक करू शकतात. कारण, आजच या तिघांची नजरकैद संपली आहे. सध्या हे तिघेही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानबद्ध आहेत. मात्र, अटक टाळण्यासाठी या तिघांनी ७ दिवसांची नजरकैद वाढविण्यासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला आहे.  

पुण्याच्या सत्र न्यायालयात भीमा-कोरेगाव एल्गार परिषदेप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या कथित माओवाद्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली.  या तिघांनाही २८ ऑगस्टला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पुण्यात नेण्यात आलं. मात्र, सर्वोच्च न्यायालयात या कारवाईला दिलेल्या आव्हानानंतर २६ ऑक्टोबरपर्यंत या तिघांसहीत आणखी दोन आरोपींना नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश कोर्टानं दिले होते. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. भारद्वाज, गोन्साल्विस आणि परेरा यांच्यासोबतच गौतम नवलखा आणि वरवरा राव यांनाही अटक झाली होती. इतर दोन आरोपी म्हणजेच गौतम नवलखा आणि वरवरा राव यांच्या जामिनावर पुण्यात निर्णय होणार नाही. कारण नवलखा यांच्यावर ठेवण्यात आलेली नजरकैद उठवण्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने १ ऑक्टोबर रोजी दिला होता. तर वरवरा राव यांनी पुणे पोलिसांच्या या कारवाईला हैदराबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तिथं या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.  


Web Title: Bhima Koregaon Violence Case: Sudha Bhardwaj, Vernon Gonsalves, Arun Ferreira may be arrested
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.