दागिने लंपास करणाऱ्या मोलकरणीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 07:12 PM2019-06-11T19:12:26+5:302019-06-11T19:14:55+5:30

ओडिशाला पळून जाण्याचा बेत : चोरीतील घड्याळामुळे मिळाली तपासाला दिशा

The accused who stolen jwellery was arrested | दागिने लंपास करणाऱ्या मोलकरणीला अटक

दागिने लंपास करणाऱ्या मोलकरणीला अटक

Next
ठळक मुद्दे पोलिसांनी भावेश यांच्या इमारतीच्या सीसीटीव्ही चित्रणाची पडताळणी केली. एक महिला भावेश यांच्या घरातून चोरी करून जात असल्याचे आढळले.

ठाणे - मालकाच्या घरातील हिरेजडीत दागिन्यांसह सहा लाख ८५ हजारांचा ऐवज चोरी करून ओडिशाला पळून जाण्याच्या बेतात असलेल्या मोलकरणीला वागळे इस्टेट पोलिसांनी २४ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. मिन्नती दुर्योधन गौडा (३१, रा. ओम अयोध्या चाळ, लोकमान्यनगर, पाडा क्र मांक-३, ठाणे) असे त्या मोलकरणीचे नाव आहे. तिच्याकडून सर्व ऐवज हस्तगत केल्याची माहिती वागळे इस्टेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.
वागळे इस्टेट येथील रहिवासी भावेश मिर्गनानी (३७) यांच्या घरातून अनोळखी चोरट्यांनी सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसह सुमारे सहा लाख ८५ हजारांचा ऐवज चोरी झाल्याची घटना १ ते ३ जूनदरम्यान घडली होती. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात ६ जून रोजी मिर्गनानी यांनी गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिकेत पोटे यांचे पथक या घटनेचा तपास करत असतानाच पोलिसांनी भावेश यांच्या इमारतीच्या सीसीटीव्ही चित्रणाची पडताळणी केली. त्यात एक महिला भावेश यांच्या घरातून चोरी करून जात असल्याचे आढळले.
ही महिला पूर्वी त्यांच्या घरात कामाला होती, अशीही माहिती समोर आली. तिचा कोणताही पत्ता उपलब्ध नसताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे लोकमान्यनगर, पाडा क्रमांक-४ येथील या महिलेचा पोलिसांनी शोध घेतला. त्यावेळी तिच्या घराच्या बाहेर खेळत असलेल्या तिच्या १२ वर्षांच्या मुलाच्या हातात परदेशी बनावटीचे महागडे घड्याळ उपनिरीक्षक पोटे यांच्या पथकाला दिसले. त्यानंतर, तिच्या घरात हे पथक दाखल झाले. त्यावेळी ती सामानाची आवराआवर करून ओरिसाला पळून जाण्याच्या बेतात असल्याचे उघड झाले.
महिला पोलिसांच्या मदतीने मिन्नती गौडा हिची कसून चौकशी केली असता, तिने चोरीची कबुली दिली. त्यानंतर, एका बॅगेतून हिरेजडीत दागिने आणि सर्व सहा लाख ८५ हजारांचा ऐवजही पोलिसांना तिने काढून दिला. तिला या प्रकरणात ७ जून रोजी अटक केली. ठाणे न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी दिली.

अशी केली चोरी

भावेश मिर्गनानी यांच्याकडे घरकाम करणारी मिन्नती हिने त्यांच्या घराच्या कुलुपाची चावी काही दिवसांपूर्वीच मिळवली होती. १ ते ३ जून या काळात ते पत्नीसह गावी गेले होते. तर, सासरे रुग्णालयात दाखल असल्यामुळे घरी असलेली त्यांची सासू २ जून रोजी सकाळी १० ते १०.४० वा.च्या दरम्यान रुग्णालयात गेली. याच अवघ्या ४० मिनिटांच्या काळात तिने आधीच मिळवलेल्या चावीच्या आधारे त्यांच्या घरात डल्ला मारला. २ जून रोजी ती सीसीटीव्हीमध्ये दिसल्यामुळे संशय बळावला. चौकशीत तिनेच चोरी केल्याचे उघड झाल्याचे वपोनि अफजल पठाण यांनी सांगितले.

Web Title: The accused who stolen jwellery was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.