जेट एअरवेजचे नरेश गोयल यांची ५३८ कोटींची मालमत्ता जप्त; ईडीने दिला दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 06:09 AM2023-11-02T06:09:20+5:302023-11-02T06:10:02+5:30

१७ फ्लॅट, बंगले यांचा समावेश : ईडीची विविध राज्यांत कारवाई

538 crore property of Jet Airways' Naresh Goyal seized; ED gave a bang | जेट एअरवेजचे नरेश गोयल यांची ५३८ कोटींची मालमत्ता जप्त; ईडीने दिला दणका

जेट एअरवेजचे नरेश गोयल यांची ५३८ कोटींची मालमत्ता जप्त; ईडीने दिला दणका

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: स्टेट बँक ऑफ इंडियाप्रणीत देशातील काही प्रमुख बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या पैशांचा अपहार केल्याप्रकरणी १ सप्टेंबरपासून अटकेत असलेले जेट एअरवेज कंपनीचे संस्थापक नरेश गोयल यांना बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दणका देत त्यांची ५३८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये गोयल यांच्या मालकीच्या विविध कंपन्यांच्या नावे असलेले १७ फ्लॅट्स, बंगले, व्यावसायिक कार्यालये तसेच विविध राज्यांत असलेल्या मालमत्तांचा समावेश आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी गोयल यांचे निवासस्थान व कार्यालय तसेच त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंटच्या कार्यालयावरही छापेमारी केली होती.

स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँकेसह देशातील प्रमुख बँकांकडून गोयल यांनी घेतलेल्या कर्जापैकी ५३८ कोटी रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी कॅनरा बँकेने सीबीआयकडे लेखी तक्रार दाखल केली होती.

ईडीच्या आरोपपत्राची घेतली दखल

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी कॅनरा बँकेची ५३८ कोटींना फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने त्यांना अटक केली असून, याप्रकरणी ईडीकडून नरेश गोयल यांच्याविरोधात विशेष सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी या आरोपपत्राची बुधवारी दखल घेतली.

प्रकरण काय?

  • कर्जप्राप्त रकमेतील पैसा गोयल यांनी जेट एअरवेज कंपनीच्या १०० टक्के मालकीची कंपनी असलेल्या जेट लाइट लि. या कंपनीला दिला होता.
  • एअर सहारा या कंपनीची खरेदी करण्यासाठी हे कर्ज दिल्याचे त्यांनी कारण सांगितले होते. मात्र, कालांतराने ते कर्ज निर्लेखित केल्याचे दाखवले होते.
  • कंपनीच्या तिकीट वितरणाच्या एजंटांना कमिशनपोटी वारेमाप पैसा दिल्याचे तपासात दिसून आले.
  • एजंटांना देण्यात आलेले पैसे त्यांनी आपल्याच उपकंपन्यांना दिले होते व त्यांच्यामार्फत ते एजंटांना दिल्याचे त्यांनी दाखवले होते. मात्र, जेट समूहातील ज्या कंपन्यांना त्यांनी हे पैसे दिल्याचे दाखवले होते, त्या कंपन्या २००९ पासून फारशा कार्यरत नव्हत्या.
  • तरीही सातत्याने त्यात गोयल गुंतवणूक करत होते व त्यातील पैसे ते व त्यांचे कुटुंबीय वैयक्तिकरित्या वापरत होते.


सीबीआयने त्यांच्याविरोधात दिल्ली येथे गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्याच्या आधारे ईडीने आता तपास सुरू केला असून, गोयल व त्यांच्या कंपनीच्या मालमत्तेची जप्ती केली आहे.

Web Title: 538 crore property of Jet Airways' Naresh Goyal seized; ED gave a bang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.