२५ तरुणींची फसवणूक : ‘लखोबा लोखंडे’ला कल्याणात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 03:17 AM2018-08-14T03:17:45+5:302018-08-14T03:17:55+5:30

विवाह नोंदणी संस्थेच्या वेबसाइटद्वारे आयटी इंजिनीअर असलेल्या तरुणींना लग्नाचे प्रलोभन दाखवत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणारा तोतया पोलीस अधिकारी शुभांकर बॅनर्जी (३४) याला महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे.

25 girl's cheating: 'Lakhoba Lokhande' arrested in Kalyan | २५ तरुणींची फसवणूक : ‘लखोबा लोखंडे’ला कल्याणात अटक

२५ तरुणींची फसवणूक : ‘लखोबा लोखंडे’ला कल्याणात अटक

Next

कल्याण - विवाह नोंदणी संस्थेच्या वेबसाइटद्वारे आयटी इंजिनीअर असलेल्या तरुणींना लग्नाचे प्रलोभन दाखवत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणारा तोतया पोलीस अधिकारी शुभांकर बॅनर्जी (३४) याला महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे. शुभांकर स्वत: आयटी इंजिनीअर असून तो मूळचा बंगळुरू येथील रहिवासी आहे. आतापर्यंत शुभांकरने फसवलेल्या तीन तरुणी समोर आल्या असल्या, तरी प्राथमिक माहितीनुसार त्याने जवळपास २५ तरुणींना गंडा घातल्याचे समोर येत आहे. आरोपीने तीन मुलींकडून ३७ लाख रुपये उकळल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शुभांकर हा विवाह नोंदणी संस्थेच्या वेबसाइटच्या माध्यमातून इंजिनीअर तरुणींना आपल्या जाळ्यात ओढत होता. त्या चांगल्या कंपनीत कामाला असतात आणि त्यांचा पगारही जास्त असतो. त्यामुळे शुभांकर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. नंतर, काही ना काही समस्या सांगून किंवा ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळायचा. या भामट्याने कल्याणमधील एका इंजिनीअर तरुणीकडून साडेसहा लाख रुपये उकळले होते. त्याने तिचा विनयभंगही केला. दोघांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली. फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात येताच तिने तक्रार दाखल केली. पोलिसांनी शुभांकरला बेड्या ठोकण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार, पीडित तरुणीने त्याला एक लाख रुपये देण्यासाठी बोलवून घेतले. पैशांच्या हव्यासापोटी कल्याणमध्ये आलेल्या शुभांकरला अटक केली. बंगळुरूच्या तरुणीकडून २० लाख, तर कोलकात्याच्या तरुणीकडून १० लाख रुपये उकळले आहेत.

आरोपी बंगळुरूचा

शुभांकरचे व्यक्तिमत्त्व प्रभावी आणि सोज्ज्वळ आहे. याचाच गैरफायदा घेत तो तरुणींना जाळ्यात फसवायचा. तो मूळचा बंगळुरूचा राहणारा आहे. आपण दहशतवादविरोधी पथकामध्ये (एटीएस) अधिकारी असून इथिकल हॅकर असल्याचेही जाळ्यात फसलेल्या तरुणींना तो सांगायचा. शुभांकर हा मुख्यत: बंगळुरू, कोलकाता आणि मुंबईतील तरुणींना फसवायचा.

Web Title: 25 girl's cheating: 'Lakhoba Lokhande' arrested in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.