लोकसभा उमेदवारीवरून सोशल मीडियातील पोस्टमुळे युवानेत्याचे भाजपाने काढले पद

By विकास राऊत | Published: March 11, 2024 01:00 PM2024-03-11T13:00:54+5:302024-03-11T13:01:26+5:30

लोकसभा उमेदवारीवरून केले होते वक्तव्य, प्रदेशाध्यक्षांकडून स्थगिती दिली पदाला

Youth leader's 'post' in BJP lost due to social media post on Lok Sabha candidature | लोकसभा उमेदवारीवरून सोशल मीडियातील पोस्टमुळे युवानेत्याचे भाजपाने काढले पद

लोकसभा उमेदवारीवरून सोशल मीडियातील पोस्टमुळे युवानेत्याचे भाजपाने काढले पद

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरून भाजपत अंतर्गत राजकारण पेटले असून त्याचा पहिला बळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव कुणाल मराठे यांचा गेला आहे. भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षांकडून मराठे यांच्या सचिवपदाला स्थगिती देण्यात आली आहे.

भाजप पदाधिकारी असताना मतदारसंघातून उमेदवार कोण व कसा असावा, आणि खासदार कोण व्हावे, यासाठी सोशल मीडियात जारी केलेल्या व्हिडीओमधून  भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव कुणाल मराठे यांनी वक्तव्य केले. तसेच, बाजारात इतर बंद पडलेल्या कॅसेट्स फिरत आहेत. जनतेने भूलथापांना बळी पडू नये, युवा, तरुण उमेदवाराच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन मराठे यांनी व्हिडीओतून केले. बंद पडलेल्या कॅसेट्स हे वक्तव्य भाजपतील काही नेत्यांना प्रचंड लागले. त्यामुळे या व्हिडीओची युवा मोर्चा प्रदेश पातळीवर गांभीर्याने दखल घेतली गेली. मराठे यांच्या सचिवपदाला स्थगिती देण्यात आलेले पत्र युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी जारी केले. ते पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले.

दरम्यान, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांना विचारले असता ते म्हणाले, सोशल मीडियात व्हायरल झालेले पत्र खरे आहे. मराठे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी पक्षाबाबत व्हिडीओमध्ये काहीही वक्तव्य केलेले नाही. माझ्या पदाला स्थगिती दिल्याबाबत मला काहीही सूचना मिळालेल्या नाहीत.

लोणीकरांच्या पत्रात काय आहे?
भाजयुमोने आपणास दिलेल्या प्रदेश सचिव पदाला काही कारणास्तव तत्काळ स्थगिती देण्यात येत आहे. दिलेली स्थगिती या क्षणापासून तत्काळ लागू होत आहे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी मराठे यांच्या नावे दिलेले या आशयाचे पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले. दरम्यान, लोणीकर यांच्याशी संपर्क केला असता ते ऑनलाइन बैठकीत असल्यामुळे उपलब्ध होऊ शकले नाहीत.

Web Title: Youth leader's 'post' in BJP lost due to social media post on Lok Sabha candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.