अस्वस्थता : भाजप, सेना, राकाँतही

By Admin | Published: August 24, 2014 01:04 AM2014-08-24T01:04:50+5:302014-08-24T01:14:57+5:30

विजय पाटील, हिंगोली आगामी विधानसभेच्या अनुषंगाने भाजपात प्रवेशासाठी इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पक्षाला बळ मिळण्याऐवजी डोकेदुखीच वाढण्याची शक्यता आहे.

Uncertainty: BJP, Army, Lieutenant | अस्वस्थता : भाजप, सेना, राकाँतही

अस्वस्थता : भाजप, सेना, राकाँतही

googlenewsNext

विजय पाटील, हिंगोली
आगामी विधानसभेच्या अनुषंगाने भाजपात प्रवेशासाठी इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पक्षाला बळ मिळण्याऐवजी डोकेदुखीच वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या माजी खा.सूर्यकांता पाटील यांचाही निर्णय होत नाही. तो झाला तर काय भूमिका घ्यायची असा प्रश्न राष्ट्रवादीतील त्यांना मानणाऱ्या गटाला पडला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षात कमालीची अस्वस्थता आहे.
हिंगोली जिल्ह्यावर एकेकाळी शिवसेना-भाजपाचे एकहाती वर्चस्व होते. हळूहळू एकेक गड कोसळत गेला अन् आज पूर्ण जिल्ह्यावरच कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण झाले आहे. बेरजेच्या राजकारणात कॉंग्रेस व राष्ट्रवादीने घेतलेले परिश्रम फळाला येत गेल्याचा हा परिणाम आहे. मात्र इतर निवडणुकांमध्ये अधून-मधून शिवसेना-भाजपा आपला करिष्मा दाखवतच असते. ही एकजूट पुढे टिकत नाही अन् सगळेच मुसळ केरात जाते, असा आजवरचा अनुभव आहे.
सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वातावरणनिर्मितीला प्रारंभ झाला आहे. जो-तो आपापल्या परीने दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. हिेंगोलीत कॉंग्रेसकडून आ.भाऊराव पाटील गोरेगावकर हे चौथ्यांदा विजयासाठी प्रयत्नरत आहेत. तर भाजपाकडून इच्छुकांची संख्या वाढत चालली आहे. पक्षातच कमी आहेत म्हणून की काय बाहेरून येणारेही थेट उमेदवारी आणणारच, अशा भीमदेवी थाटात घोषणा करीत आहेत. कॉंग्रेसचे जि.प.सदस्य मिलिंद यंबल यांनी तर भाजपाकडून मुलाखतच दिली. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील या भाजपाच्या वाटेवर असल्याची मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील राष्ट्रवादीच्या गोटात हालचाली वेगवान आहेत. सूर्यकांता पाटील यांच्यामागे पाठबळ उभे करताना आपल्यालाही बळ मिळणार की कसे? याची चाचपणी करून काहीजण निर्णय घेण्याच्या मन:स्थितीत आहेत. त्यातही काही जणांना तर आगामी विधानसभेची उमेदवारीच पाहिजे आहे. त्याच अटीवर त्यांना पुढचा निर्णय घ्यायचा आहे. माजी खा. शिवाजी माने यांची लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेशी झालेली जवळीकही काहींची अस्वस्थता वाढवत आहे. ते राष्ट्रवादीत असले तरी अचानक भगव्याखाली जातील की काय? हाही एक विषय आहे. विशेष म्हणजे शिवसेनेत कळमनुरी व वसमत विधानसभा मतदारसंघात सगळे काही आलबेल आहे, असे नाही. भाजपात मात्र बाहेरून येणाऱ्यांमुळे अस्वस्थता आहे. मरगळलेल्या भाजपाला उर्जितावस्थेत आणण्यासाठी कोणीही पुढे आले नव्हते. त्यावेळी आम्ही कमळाला पाणी घातले. आता मात्र बाहेरून येणारे झाडच उपटून आपल्या दारात नेण्याची भाषा करू लागल्याने निष्ठावंत नाराज आहेत. उमेदवारी कोणाला मिळेल, हे अजून निश्चित नाही. त्यामुळे या अस्वस्थेत भर पडणाऱ्या अंतर्गत घडामोडी घडत आहेत. रोज कोणीतरी पक्षश्रेष्ठींकडे जाते. काहीतरी बोलणी करते. त्याची मतदारसंघात पेरणी करते. अशा प्रकारांमुळे उमेदवारी जाहीर होईपर्यंत अस्वस्थता कायम राहणार आहे.
सेनेतील अस्वस्थतेचा वसमतमध्ये उद्रेक
शिवसेनेतील दोन गटांच्या राजकारणाबाबत नवे जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी सर्वांचेच कान उपटले. मात्र त्यांनी दोन ठिकाणी घेतलेल्या कार्यक्रमांतच त्याला खतपाणी मिळाले, हे त्यांच्याही लक्षात आले नसावे. एवढ्या बेमालूमपणे सेनेतील मंडळी आपापल्या गटांचा जीवंतपणा सिद्ध करते, असे वैशिष्ट्य असलेले महाराष्ट्रातील हे एकमेव ठिकाण असेल. वसमतमध्ये शनिवारी प्रकरण हातघाईवर आले. शिवसेनेचा मेळावाच उधळला गेला. कोणी कोणाला धोपटले हेही कळत नव्हते, इतकी धुमश्चक्री झाली. चक्क संपर्कप्रमुखांनीच काढता पाय घेतला.
कळमनुरीत अशीही शांतता
कळमनुरी विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसकडून इच्छुक असलेल्यांची संख्या मुंबईतील मुलाखतींनंतर १९ एवढी झाली आहे. येथून उमेदवारी मिळाली म्हणजे विजय आपलाच असे वाटत असल्याने सगळे काही शांत-शांत आहे. या शांततेत काय दडले? हे कळायला मार्ग नाही.

Web Title: Uncertainty: BJP, Army, Lieutenant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.