क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये अर्ध्या तासात दामदुपटीचे आमिष; फसविणाऱ्या भामट्यास गुजरातमधून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 01:27 PM2022-10-20T13:27:36+5:302022-10-20T13:28:02+5:30

औरंगाबाद ग्रामीण सायबरची कारवाई, आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी

The Lure of double money in Half an Hour in Crypto Trading; Cheater arrested from Gujarat | क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये अर्ध्या तासात दामदुपटीचे आमिष; फसविणाऱ्या भामट्यास गुजरातमधून अटक

क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये अर्ध्या तासात दामदुपटीचे आमिष; फसविणाऱ्या भामट्यास गुजरातमधून अटक

googlenewsNext

औरंगाबाद : क्रिप्टो ट्रेडिंगची भुरळ घालून अर्ध्या तासात दामदुपटीचे आमिष दाखवून गुजरातच्या दोन भामट्यांनी महाराष्ट्रातील शेकडो नागरिकांना लाखोंचा ऑनलाइन गंडा घातला. कन्नड तालुक्यातील एकाने ७१ हजार रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दिल्यानंतर ग्रामीण सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास केला. त्यानंतर तीन दिवस सुरतमध्ये मुक्काम ठोकत एका भामट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सय्यद महंमद उनेस मियाॅ हाफीज (रा. अलकुरेशी अपार्टमेंट, सुरत, गुजरात) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया म्हणाले, कन्नड येथील एका तक्रारदाराच्या फिर्यादीवरून ऑगस्टमध्ये ग्रामीण सायबर ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. फिर्यादीच्या मुलाने इन्स्टाग्रामवर क्रिप्टो ट्रेडिंग करून अर्ध्या तासांत पैसे दुप्पट करून मिळतात, अशी जाहिरात पाहिली. ही जाहिरात सय्यद उनेस या सायबर भामट्याची होती. त्या जाहिरातीला भुलून ७१ हजार ८० रुपयांची गुंतवणूक केली होती. भामट्यांनी ही रक्कम हडप केली. तेव्हापासून सायबर पोलीस तांत्रिक तपास करीत होते. निरीक्षक अशोक घुगे, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, भारत माने यांच्या मार्गदर्शनात हवालदार कैलास कामठे, संदीप वरपे, नितीन जाधव, रवींद्र लोखंडे, सविता जायभाये, मुकेश वाघ, योगेश दारवंटे, शीतल खंडागळे यांच्या पथकाने आधी ज्या इन्स्टाग्रामवरून जाहिरात केली. त्याची तांत्रिक माहिती जमवली. ते खाते गुजरातमधील सुरत येथून चालत असल्याचे समोर आले. पथक सुरतला रवाना झाले. तेथे पथकाने तीन दिवस मुक्काम करीत कोणत्या बँक खात्यात पैसे जातात, ते कोणत्या एटीएममधून काढले जातात, हे पैसे काेण काढते, याची माहिती मिळवली. त्यावरून आरोपी आणि त्यांचे वाहन पाहून ठेवले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सायबर पोलीस आरोपी उनेसपर्यंत पोहोचले.

आरोपी पोलीस कोठडीत
सायबर पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: The Lure of double money in Half an Hour in Crypto Trading; Cheater arrested from Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.