खाजगी डॉक्टरांनी नाकारलेली शस्त्रक्रिया ‘घाटी’ रुग्णालयामध्ये यशस्वी झाल्याने मातेला मिळाले नवे जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 02:10 PM2018-12-11T14:10:28+5:302018-12-11T14:19:03+5:30

तब्बल ८७ रक्त पिशव्या लागलेल्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेने डॉक्टरांनी नवजात शिशू आणि मातेची ताटातूट टाळली.

The surgery rejected by a private doctor gave the new life to the mother due to critical operation success in 'Ghati' hospital | खाजगी डॉक्टरांनी नाकारलेली शस्त्रक्रिया ‘घाटी’ रुग्णालयामध्ये यशस्वी झाल्याने मातेला मिळाले नवे जीवन

खाजगी डॉक्टरांनी नाकारलेली शस्त्रक्रिया ‘घाटी’ रुग्णालयामध्ये यशस्वी झाल्याने मातेला मिळाले नवे जीवन

ठळक मुद्देप्रसूतीशास्त्र विभागाची किमयासाडेपाच तास चालली शस्त्रक्रियातब्बल ८७ रक्त पिशव्या लागल्या

औरंगाबाद : गरोदरपणात निर्माण झालेल्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत खाजगी डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिला; परंतु घाटीतील प्रसूतीशास्त्र विभागातील डॉक्टरांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्याची किमया केली. आधी सिझर आणि नंतर शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी नवजात शिशू आणि मातेची ताटातूट टाळली.

अमृता राज चुडीवाल (२८, रा. कन्नड), असे या मातेचे नाव आहे. गर्भावस्थेत वार (प्लॅसेंटा) याद्वारे भ्रूणाला रक्त, रक्तघटक आणि अन्नपुरवठा होत असतो. सामान्य प्रसूतीनंतर शिशूपाठोपाठ वार बाहेर पडत असते. काही गुंतागुंतीच्या अवस्थेत हे वार गर्भपिशवीला चिकटून राहते. तेव्हा अतिरिक्त रक्तस्राव होऊन माता मृत्यूचा धोका संभवतो. साडेतीन महिन्यांची गर्भवती असताना अमृता चुडीवाल यांच्यात ही स्थिती असल्याचे निदान झाले. ही परिस्थिती आणि त्यासाठीची शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने खाजगी डॉक्टरांनी त्यांना घाटीत पाठविले. 

खाजगी डॉक्टरांबरोबर घाटीतील प्रसूती विभागाकडे त्यांची नियमित तपासणी सुरू झाली. प्रसूती विभागात त्यांची २२ सप्टेंबर रोजी सिजर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना मुलगी झाली. यावेळी चिकटलेला वार गर्भपिशवीतच विरघळण्यासाठी इंजेक्शन देण्यात आले होते; परंंतु सिझरच्या ६१ दिवसांनंतर अतिरक्तस्रावामुळे अमृता या २२ नोव्हेंबर रोजी प्रसूती विभागात दाखल झाल्या. वार गर्भपिशवीत चिकटलेला होता. रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबलेली होती. त्यामुळे इतर आतड्यांना इजा होण्याचा धोका होता. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून वार आणि गर्भपिशवी दोन्ही काढण्याचा निर्णय घेण्यात आला. 

शस्त्रक्रियेपूर्वी त्यांना १५ रक्तघटक देण्यात आले. शस्त्रक्रियेला सुरुवात झाली, तेव्हा ४६ रक्तघटक देण्यात आले. साडेपाच तास ही शस्त्रक्रिया चालली. प्रसूतीशास्त्र विभागाच्या डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. शस्त्रक्रियेनंतर २६ रक्तघटक देण्यात आले. शस्त्रक्रियेच्या १७ दिवसांनंतर सोमवारी (दि. १०) अमृता चुडीवाल यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. 

शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. सोनाली देशपांडे, डॉ. प्रशांत भिंगारे, डॉ. जैता घोष, डॉ. अंकिता शहा, डॉ. अनुराग सोनवणे, डॉ. संजय पगारे, डॉ. सुष्मिता पवार, डॉ. सौजन्ना रेड्डी, भूलतज्ज्ञ डॉ. मुकुंद परचेंटकर,डॉ. रश्मी बंगाली, डॉ. अंकुश पवार, सिस्टर प्रतिभा काथार, ब्रदर योगेश शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

सुटी दिल्यानंतर अश्रू अनावर...
रुग्णालयातून सुटी दिल्यानंतर डॉक्टरांप्रती भावना व्यक्त करताना अमृता यांना अश्रू अनावर झाले होते. उपचारासाठी खाजगी डॉक्टरांनी नकार दिला; परंतु घाटीतील डॉक्टरांनी नवीन आयुष्य दिले, त्यामुळेच आज मी इथे असल्याचे अमृता चुडीवाल म्हणाल्या.

Web Title: The surgery rejected by a private doctor gave the new life to the mother due to critical operation success in 'Ghati' hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.