रोपे करपण्यास सुरूवात

By Admin | Published: August 3, 2014 11:50 PM2014-08-03T23:50:53+5:302014-08-04T00:52:33+5:30

हिंगोली : दीड महिन्याच्या उशिरानंतर कशीबशी झालेल्या पेरणीवर वरूणराजाची वक्रदृष्टी कायम राहिली. कशीतरी अग्नीवर निघालेली कोवळी रोपे पाण्याअभावी करपण्यास सुरूवात झाली.

Starting the seedlings | रोपे करपण्यास सुरूवात

रोपे करपण्यास सुरूवात

googlenewsNext

हिंगोली : दीड महिन्याच्या उशिरानंतर कशीबशी झालेल्या पेरणीवर वरूणराजाची वक्रदृष्टी कायम राहिली. कशीतरी अग्नीवर निघालेली कोवळी रोपे पाण्याअभावी करपण्यास सुरूवात झाली. मागील दहा दिवसांपासून पावसाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांचा जीव घायकुतीला आला. सुरूवातीला पावसासाठी धावा तर आता प्रत्येकाने पेरणीसाठी लाख-लाख रूपये घालून बसलेल्या उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले.
मृगानंतर आर्द्राही कोरड्या गेल्याने पुनर्वसूने दिलासा दिला. तोपर्यंत पेरणीला महिन्याचा उशिर झाल्याने मूग, उडदाच्या पेरणीचा कालावधी निघून गेला. दरम्यान कशीबशी उत्पादकांनी धूळपेरणी केली. काही ठिकाणी दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणीचे संकट ओढवले. पेरणीसाठी लाख-लाख रूपयांची खत, बियाणे टाकले. सरसकट पेरणी आटोपताच थोड्याच ओलीवर बियाणे उगवले. जमिनीबाहेर कोंब येताच पावसाने पावसाने डोळे वटारले. मागील सहा दिवसांपासून दडी मारल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला. दरम्यान २७ आणि २८ जुलै रोजी अनुक्रमे ६ मिमी पाऊस झाल्याने ११६ मिमीवर सरासरी गेली. नंतर जोराचा वारा आणि कडक उन्हाने जमिनी कोरड्या पडल्या. हळूहळू रोपे सुकण्यास सुरूवात झाली. मागील सहा दिवसांपासून पावसाचा पत्ताच नाही. जमिनीतील थोडसे बाष्पही गेल्याने पिके करपू लागली. अधिच तपश्चर्या केल्याप्रमाणे धावा केल्यानंतर पाऊस आला आणि नवसासारखी पेरणी झाली. उत्पादनाची हमी नसताना एक-एक उत्पादक लाखो रूपये घालून बसला. कारण आजघडीला जिल्ह्यात तीन लाख हेक्टर क्षेत्राच्या पुढेच पेरणी झाली आहे. गतवर्षी यावेळी उत्पादक कोळपणी, फवारणी करीत होते. शिवाय जिल्ह्यात ८१० मिमी पाऊस झाला होता. यंदा सव्वासे मिमीची देखील सरासरी झालेली नाही. परिणामी बियाण्याच्या खरेदीतून हातचे निघून गेल्यानंतर पावसाअभावी पदराचे निघून जाण्याची शक्यता आहे. आणखीच पाऊस लांबला तर पिकांना पाळी घालावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात झालेला पाऊस (मिमी)
तालुके गतवर्षी २८ जुलै ३ आॅगस्ट
हिंगोली ८४६.८२ ८४.४४ ९०.४४
कळमनुरी ७५६.३६ १०९.०२ ११०.०७
सेनगाव ७७३.५६ ११६.८४ ११९.१७
वसमत ७२६.५६ १०८.८४ ११०.५७
औंढा ना. ९४७.६२ १६३.२५ १६८
एकूण ८१०.०२ ११६.०६ ११९.८१
शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाहीत

भांडेगाव : शेतकऱ्यांनी यंदा पेरणी केली; परंतु पावसाअभावी पिके डोलण्या ऐवजी सुकू लागली. सकाळी टवटवीत दिसणारे पिके दुपारी माना टाकू लागली. त्यामुळे ही दुर्दशा डोळ्याने पाहू वाटत नसल्याने उत्पादक शेताकडे जात नाहीत.
हिंगोली तालुक्यातील जामठी, साटंबा, भांडेगाव, परिसरात हलक्या पावसावर पेरण्या आटोपल्या. त्यानंतर मोठा पाऊस झालाच नसल्याने पिके वाळू लागली. पाण्याची व्यवस्था असलेले शेतकरी पाणी देत आहेत; परंतु विहिरी आणि बोअर आटल्याने शेतकरीही हतबल झाले आहेत. खरीप हंगामास दोन महिने पूर्ण झाले असल्याने गतवर्षी मूग, उडदाच्या तोडणीचे दिवस होते. यंदा शेतकरी पेरणीमध्येच परेशान आहेत. पेरलेले महागामोलाचे बियाणे आता वाळत असल्याने हे पाहणे कठीण झाल्याने शेतकरी रानाकडेही जात नसल्याचे चित्र आहे.

Web Title: Starting the seedlings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.