उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना तत्काळ पाठवा; परीक्षा विभागाचे प्राचार्यांना आवाहन

By राम शिनगारे | Published: May 2, 2024 01:25 PM2024-05-02T13:25:30+5:302024-05-02T13:25:41+5:30

चार जिल्ह्यांतील १६ केंद्रांवर होणार मूल्यांकन

Send the professor immediately for evaluation of the answer sheet; Appeal to the Principal by the Examination Department of the BAMU University | उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना तत्काळ पाठवा; परीक्षा विभागाचे प्राचार्यांना आवाहन

उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना तत्काळ पाठवा; परीक्षा विभागाचे प्राचार्यांना आवाहन

छत्रपती संभाजीनगर : पदवी परीक्षा अंतिम टप्प्यात असून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना तत्काळ कार्यमुक्त करावे, असे आवाहन परीक्षा विभागातर्फे संलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना करण्यात आले. दरम्यान, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ३० एप्रिलपासून सुरळीतपणे सुरू झाल्या आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांना २ एप्रिल, तर नियमित परीक्षांना १६ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम- २०१६ मधील तरतुदीनुसार सर्व अभ्यासक्रमांचे निकाल ३० दिवसांत जाहीर करणे बंधनकारक आहे. निकाल वेळेत जाहीर होण्यासाठी पदवी अभ्यासक्रमासाठी जिल्हानिहाय १६ मूल्यांकन केंद्रे आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमास ८ मूल्यांकन केंद्रे निश्चित केली आहेत. 

विद्यापीठ प्रशासनामार्फत सर्व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांना व प्राचार्यांना वारंवार आवाहन करण्यात येऊनही बरेचसे शिक्षक मूल्यांकन केंद्रावर रुजू होत नसल्याची माहिती विद्यापीठास मिळाली आहे. त्यामुळे याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होत आहे. याच बाबीची गंभीर दखल घेऊन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत चर्चा झाली. चर्चेअंती परीक्षेसाठी सर्व संलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी ८ एप्रिलपासून ज्या विषयाच्या परीक्षा संपतील, त्या-त्या विषयाच्या शिक्षकांना त्यांच्या महाविद्यालयातील शिक्षकांना पूर्णवेळ १५ दिवसांकरिता मूल्यांकन केंद्रावर उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी कार्यमुक्त करण्यात यावे, असे निर्देश दिले आहेत.

अहवाल विद्यापीठास पाठवा
प्राचार्यांनी त्यांच्या महाविद्यालयातील शिक्षकांना मूल्यांकनासाठी कार्यमुक्त केल्यानंतर मूल्यांकन केंद्रांनी शिक्षक कर्मचारी रूजू झाल्याबाबतचा अहवाल त्याच दिवशी विद्यापीठास सादर करावा. सदरील बाब विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याने या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन उत्तरपत्रिका मूल्यांकन पारदर्शीपणे करण्याबात सहकार्य करावे असेही पत्रकात म्हटले आहे.

निकालासाठी सहकार्य करा
उत्तरपत्रिका मूल्यांकनाची सर्व संलग्नित महाविद्यालये तसेच विद्यापीठाची सामूहिक जबाबदारी व कर्तव्य आहे. उन्हाळी परीक्षांचे सर्वांच्या सहकार्याने विहित वेळेत मूल्यांकन करण्यात येऊन ३० दिवसांच्या आत निकाल जाहीर करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी सामूहिकरीत्या सहकार्य करावे.
- डॉ. भारती गवळी, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

Web Title: Send the professor immediately for evaluation of the answer sheet; Appeal to the Principal by the Examination Department of the BAMU University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.