उन्हात कष्ट सारखेच, मात्र महिलांना रोजंदारी निम्मीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 05:32 PM2018-04-05T17:32:11+5:302018-04-05T17:35:12+5:30

चैत्राच्या उन्हाने शहर दुपारी मरगळल्यासारखे शांत होते; परंतु रोजंदारीवर काबाडकष्ट करणाऱ्या महिला व पुरुषांना मात्र उन्हामुळे थांबण्याची किंवा विश्रांतीची सोय नाही.

Same work but women have lesser wages than men | उन्हात कष्ट सारखेच, मात्र महिलांना रोजंदारी निम्मीच

उन्हात कष्ट सारखेच, मात्र महिलांना रोजंदारी निम्मीच

googlenewsNext
ठळक मुद्देरोजंदारीवर काबाडकष्ट करणाऱ्या महिला व पुरुषांना मात्र उन्हामुळे थांबण्याची किंवा विश्रांतीची सोय नाही.मजूर महिला जिद्दीने पुरुष सहकाऱ्याच्या तोडीसतोड काम करतात मात्र त्यांच्या तुलनेत तिला मजुरी मात्र निम्मीच मिळते,

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : एप्रिल महिन्याची रखरखीत दुपार, डोक्यावर आग ओकणारा सूर्यनारायण आणि अंगाची होणारी लाहीलाही, अशा अवस्थेत जेथे घरात किंवा कार्यालयात बसून काम करणेही असह्य होते, अशा परिस्थितीत डोक्यावर मातीचे टोपले उचलून आणि प्रसंगी ड्रेनेजच्या खड्ड्यात उतरून एक मजूर महिला जिद्दीने काम करते. तिचे काम पुरुष सहकाऱ्याच्या तोडीसतोड असूनही त्यांच्या तुलनेत तिला मजुरी मात्र निम्मीच मिळते, या विदारक असमानतेची खंत परसबाई काळवाणी ही कष्टकरी महिला व्यक्त करते.

चैत्राच्या उन्हाने शहर दुपारी मरगळल्यासारखे शांत होते; परंतु रोजंदारीवर काबाडकष्ट करणाऱ्या महिला व पुरुषांना मात्र उन्हामुळे थांबण्याची किंवा विश्रांतीची सोय नाही. शहरात काही ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. अशाच एका बांधकाम साईडवर परसबाई काळवाणी या कष्टकरी महिला भर उन्हात राबताना दिसून आल्या. वाढत्या उष्णतेमुळे जेथे खिडकीबाहेर डोकावून पाहणेही अवघड वाटते, अशा स्थितीत काळवाणी यांच्यासारख्या हजारो मजूर महिला मोठ्या कष्टाचे काम करत एकेक दिवस पुढे ढकलतात. त्यांच्यासोबत जे पुरुष सहकारी असतात, त्यांच्या तुलनेत या महिलांचे काम कुठेही कमी नाही किंबहुना काकणभर सरसच असेल. कष्ट सारखेच, कामाचे स्वरूपही सारखेच, पण तरीही ‘बाप्याच्या कामाची सर बाईच्या कामाला कशी येणार?’ असा सवाल करत ठेकेदार या महिलांच्या हातावर पुरुष मजुरांच्या तुलनेत अर्धीच रक्कम टेकवतो आणि त्यांची बोळवण करतो, अशी परिस्थिती सध्या बांधकाम क्षेत्रासारख्या असंघटित क्षेत्रात दिसून येत आहे. जेथे पुरुषांना दिवसाची मजुरी ४०० रुपये देण्यात येते, तेथे तेच काम करणाऱ्या महिलांना केवळ २०० रुपये मिळतात.

आपली परिस्थिती अन्यायकारक आहे, पण दाद मागायची कशी आणि कोणाकडे, असा या महिलांचा प्रश्न आहे. या गोष्टीला विरोध केला तर ठेकेदार कामावरून कमी करील, त्यापेक्षा मिळतील तेवढे पैसे घ्या आणि निमूटपणे काम करा, अशी या महिलांची हतबलता आहे. स्त्री-पुरुष समानतेचे वारे सर्वत्र वाहत असताना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या या महिलांकडे मात्र सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. 

पोटात आग उठल्यावर...
उन्हापासून बचाव करण्यासाठी गॉगल, स्कार्फ, हॅण्डग्लोज, सनकोट अशी जय्यत तयारी करून महिला घराबाहेर पडतात. तेथे परसबार्इंसारख्या महिला मात्र उन्हाचे चटके सोसतच प्रत्येक क्षण पुढे ढकलतात. पोटात आग उठली असताना डोक्यावरच्या आगीची चिंता कोण करणार? अशी एकाच वाक्यात जीवनकथा सांगत परसबार्इंनी पुन्हा कामाला सुरुवात केली.

Web Title: Same work but women have lesser wages than men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.