भिंतीत एटीएम बसविण्याचे रिझर्व्ह बँकेचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 05:57 PM2019-07-15T17:57:25+5:302019-07-15T18:01:13+5:30

बँकांचे रिझर्व्ह बँकेच्या आदेशाकडे दुर्लक्ष

Reserve Bank order to set up ATM in wall | भिंतीत एटीएम बसविण्याचे रिझर्व्ह बँकेचे आदेश

भिंतीत एटीएम बसविण्याचे रिझर्व्ह बँकेचे आदेश

googlenewsNext
ठळक मुद्देशहरातील ६०० पेक्षा अधिक एटीएम केवळ सीसीटीव्हीच्या भरवशावरएटीएमच्या सुरक्षेबद्दल बँक व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा 

औरंगाबाद : एटीएममधील रक्कमच नव्हे, तर अख्खे एटीएम मशीनच चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे बँकांनी त्यांचे एटीएम भिंतीमध्ये बसवावे, असे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. मात्र, यासंदर्भात अजून कोणतीही माहिती मुख्यालयाकडून आली नाही, असे शहरातील बँकांच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

बीड बायपास रस्त्यावरील एसबीआयचे एटीएम घेऊन चोरट्यांनी शुक्रवारी रात्री पोबारा केला. या घटनेमुळे पुन्हा एकदा एटीएम सुरक्षेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक बँका, खाजगी बँका, पतसंस्था मिळून शहरात ६०० पेक्षा अधिक एटीएम आहेत. बँकांचे विभागीय कार्यालय, मुख्य कार्यालयात बसविण्यात आलेले एटीएम वगळता इतर एटीएमवर सुरक्षा व्यवस्था नसल्याचे आढळून आले आहे. प्रत्येक एटीएम सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, कॅमेरे असतानाही एटीएम फोडण्याच्या घटना घडल्या आहेत, तसेच आता तर चक्क  एटीएमच उचलून नेण्याचा चोरट्यांनी प्रताप दाखवत एटीएमच्या सुरक्षाप्रणालीलाच छेद दिला आहे.

औरंगाबादेतील ही पहिली घटना असली तरी देशात याआधी अनेक एटीएम अशा प्रकारे चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. एटीएम चोरीच्या वाढत्या घटनांमुळे अखेर रिझर्व्ह बँकेने महिनाभरापूर्वी नवीन आदेश काढले आहेत. त्याद्वारे सर्व बँकांना स्पष्ट आदेश दिले आहेत की, त्यांनी सर्व एटीएम मशीन भिंतीमध्ये बसवावेत. मात्र, या आदेशाचे एकाही बँकेने पालन केले नसल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीने एसबीआय व महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनी मुख्यालयातून असा कोणताही आदेश प्राप्त झाला नसल्याचे सांगितले. मात्र, एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, आम्ही आधीच प्रस्ताव पाठविला होता, त्यानुसार आम्हाला शहरात तीन सीडीएम मशीन भिंतीत बसविण्याला मंजुरी मिळाली आहे.

जनतेचाच पैसा लुटला जातोय 
देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले की, देशभरात एटीएम फोडणे किंवा एटीएम चोरून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्याचा फटका बँकांना बसत आहे. बँकांच्या एनपीए वाढण्यापैकी हे एक कारण आहे. यामुळे प्रत्यक्षरीत्या बँकेच्या ग्राहकांना नुकसान होत नाही, कारण नंतर नुकसानभरपाई भरून काढण्यासाठी रिझर्व्ह बँक मोठी रक्कम देते; पण रिझर्व्ह बँक किंवा केंद्र सरकार स्वत:च्या खिशातून पैसे देत नाही. जनतेकडून जमा झालेल्या कराच्या महसुलातूनच हा पैसा दिला जातो. यामुळे चोर अप्रत्यक्षरीत्या जनतेच्या पैशाचीच लूट करीत आहेत. 

एटीएमच्या सुरक्षेबद्दल बँक व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा 
रिझर्व्ह बँकेने नवीन आदेश देऊन महिना उलटला, पण एकाही बँकेने एटीएम मशीन भिंतीत बसविले नाही. यावर कहर म्हणजे जेथे सुरक्षारक्षक होते त्यांनाही काढून टाकण्याचा सपाटा बँक व्यवस्थापनाने सुरू केला आहे. फक्त सीसीटीव्हीच्या भरवशावर एटीएम सुरक्षित राहू शकत नाही, हे आता सिद्ध झाले आहे. रिझर्व्ह बँकेला आम्ही मागणी केली आहे की, २४ तास शस्त्रधारी सुरक्षारक्षक बँकेत व एटीएमवर नेमण्याचे आदेश बँकांना द्यावेत. 
- देवीदास तुळजापूरकर, महासचिव, महाराष्ट्र स्टेट बँक एम्लॉईज फेडरेशन
 

Web Title: Reserve Bank order to set up ATM in wall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.