नामांतर लढ्यात ‘लाँग मार्च’ची तयारी केली पण क्रांतिचौक ऐवजी पोहोचलो सेंट्रल जेल

By विजय सरवदे | Published: January 14, 2023 08:08 PM2023-01-14T20:08:17+5:302023-01-14T20:08:51+5:30

‘लाँग मार्च’ हा नामांतर लढ्यातील एक गौरवशाली टप्पा होता.

Prepared for a 'long march' in the name change fight of Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, but instead of Krantichowk, reached the Central Jail: prakash shirsat | नामांतर लढ्यात ‘लाँग मार्च’ची तयारी केली पण क्रांतिचौक ऐवजी पोहोचलो सेंट्रल जेल

नामांतर लढ्यात ‘लाँग मार्च’ची तयारी केली पण क्रांतिचौक ऐवजी पोहोचलो सेंट्रल जेल

googlenewsNext

नामांतर लढ्याला प्रेरणादायी इतिहास आहे. दलित पँथरसह अनेक पुरोगामी संघटना आणि कार्यकर्ते हा लढा नेटाने रेटून नेत होते. दुसऱ्या बाजूने विरोधकही गप्प नव्हते. तेही दंड थोपटून नामांतराला कडाडून विरोध करीत होते. या लढ्यात मराठवाड्यातील दलितांची हजारो घरे बेचिराख झाली, अनेक भीमसैनिक शहीद झाले. त्यांचे स्मरण आणि तब्बल १७ वर्षे चाललेल्या या लढ्याचा विजयोत्सव म्हणून दरवर्षी दि. १४ जानेवारीला विद्यापीठ नामविस्तार वर्धापन उत्साहाने साजरा केला जातो. यानिमित्ताने नामांतर लढ्यात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या मान्यवरांच्या काही आठवणी...

क्रांतिचौक ऐवजी पोहोचलो सेंट्रल जेल 
प्रा. प्रकाश सिरसाट सांगतात, ‘लाँग मार्च’ हा नामांतर लढ्यातील एक गौरवशाली टप्पा होता. औरंगाबाद शहरातील गुलमंडी भागात असलेल्या वसंत भुवन सभागृहात नामांतरवादी विद्यार्थी नागरिक कृती समितीच्या वतीने २२ जुलै १९७९ रोजी नामांतर परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेत महाराष्ट्रातील नामांतरवाद्यांनी आपापल्या ठिकाणाहून पायी निघून औरंगाबादला यावे व दि. ६ डिसेंबर १९७९ रोजी क्रांतिचौकात सत्याग्रह करावा, असा कार्यक्रम घोषित करण्यात आला. यालाच ‘लाँग मार्च’ असे नाव देण्यात आले. नामांतर वादी कृती समितीचा भाग म्हणून याच्या प्रचाराची जबाबदारी आमच्यावर टाकण्यात आली होती. इतरत्र बरेच फिरून झाले होते. 

शेवटचा दौरा म्हणून दि. ४ डिसेंबर रोजी मी येवल्याच्या गेलो. तिथे राष्ट्र सेवा दलाच्या मोठा गट सक्रिय होता. सायंकाळी त्यांची बैठक सुरू झाली. माझा प्रस्ताव मांडल्यानंतर त्यावर बरीच चर्चा झाली. संघटनेच्या भूमिकेच्या विरोध जाऊन त्यांनी सत्याग्रहात सहभागी होण्याचे ठरविले. दुसऱ्या दिवसी सकाळीच औरंगाबादला जाण्यासाठी बस होती. तिने निघायचे ठरले. सकाळी बसस्टँडला पोहोचलो, बस उभीच होती. आत पाहिले तर बसमध्ये एकही प्रवासी नव्हता. ड्रायव्हर, कंडक्टरही नव्हते. मनात शंका उद्भवली. ही बस एवढी रिकामी कधीच नसे. विचार करायला वेळ मिळावा म्हणून मुतारीकडे गेलो. आजूबाजूला साध्या वेशातील दोन पोलिस असल्याचे जाणवले. त्यातला एक तर औरंगाबादपासून मागावर असावा. इतरांना बसमध्ये चढू नका असे सांगावे म्हणून निघालो, तोपर्यंत निम्म्याहून अधिक कार्यकर्ते जागा पकडून बसले होते. मी बसजवळ जाईपर्यंत सगळेच आत बसलेले होते. तिथून निघावे, तर पळ काढला अशी कार्यकर्त्यांची समजूत व्हायची आणि थांबलो तर पोलिस पकडणार आणि आपण सत्याग्रहाला मुकणार अशा विचारात थांबायचे ठरवले. 

क्षणात पोलिसांनी बस ताब्यात घेतली आणि औरंगाबाद ऐवजी आमचा प्रवास येवला पोलिस स्टेशनच्या दिशेने सुरू झाला. दुपारपर्यंत लिखापढी पूर्ण करून आम्हाला पोलिस व्हॅनमध्ये बसवले. कुठे नेतायेत ते कळत नव्हते. आमच्यासोबत नुकतेच महाविद्यालयात प्रवेश घेतलेले काही लहान मुले आणि मुली होत्या. त्या रडू लागल्या. शेवटी सायंकाळच्या सुमारास आम्ही नाशकात पोहोचलो. आमची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. अशारीतीने पोलिसांच्या नकली बसच्या जाळ्यात आम्ही सहज सापडलो.

Web Title: Prepared for a 'long march' in the name change fight of Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, but instead of Krantichowk, reached the Central Jail: prakash shirsat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.