पोलीस आयुक्तांच्या नावाने खंडणी मागणार्‍या पिता-पुत्राविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 08:47 PM2018-03-19T20:47:06+5:302018-03-19T20:47:06+5:30

सिटी सर्व्हे विभागाकडे दाखल केलेला तक्रार अर्ज परत घेण्यासाठी जमिनमालकाकडे पाच लाखाची खंडणी मागणार्‍या पिता-पुत्रांविरूद्ध सिटीचौक पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

Offense against father-son demanding ransom in the name of Police Commissioner | पोलीस आयुक्तांच्या नावाने खंडणी मागणार्‍या पिता-पुत्राविरोधात गुन्हा

पोलीस आयुक्तांच्या नावाने खंडणी मागणार्‍या पिता-पुत्राविरोधात गुन्हा

googlenewsNext

औरंगाबाद : सिटी सर्व्हे विभागाकडे दाखल केलेला तक्रार अर्ज परत घेण्यासाठी जमिनमालकाकडे पाच लाखाची खंडणी मागणार्‍या पिता-पुत्रांविरूद्ध सिटीचौक पोलिसांनी गुन्हा नोंदविला. विशेष म्हणजे खंडणी मागताना आरोपींनी पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षकांच्या नावाचा वापर केला.

एस.एस.बारी आणि वसीम बारी अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, बारी हा पोलीस आयुक्तांचे स्वीय सहायक म्हणून सेवानिवृत्त झालेला आहे. कटकटगेट येथील रहिवासी नासेरखान गणीखान यांनी याविषयी सिटीचौक पोलिसांत तक्रार नोंदविली. नासेर खान यांचे कटकटगेट येथील घर आणि १३ गुंठे जमिनीसंदर्भात मनपासोबत न्यायालयात आणि सिटी सर्व्हे विभागात वाद सुरू आहे. या जमिनीविषयी आरोपी बारी यांचा काहीही संबंध नाही.परंतु त्यांनी या जमिनीसंदर्भात मनपा कोर्टात आणि सिटी सर्व्हे विभागाकडे अर्ज दाखल केला. ही बाब नासेरखान यांना समजल्यानंतर त्यांनी बारी यांच्याशी संपर्क साधून अर्ज का दाखल केल्याचे कारण विचारले. सदर प्रॉपर्टीची किंमत खूप  असल्याने तक्रार अर्ज काढून घेण्यासाठी सेटलमेंट करावी लागेल, असे आरोपी म्हणाले. 

काही दिवसापूर्वी आरोपींनी एका अनोळखी व्यक्तीमार्फत निरोप पाठवून नासेरखान यांना भेटण्यास बोलावले. मात्र नासेरखान हे त्यांना भेटायला गेले नाही.१७ फेब्रुवारी रोजी हिवराळे नावाचा ओळखीचा व्यक्ती नासेरखान यांना भेटला आणि बारी यांचे घरी जाऊन त्यांना भेटा व  वाद मिटवून घ्या,  असा निरोप दिला. त्यानंतर हिवराळेच्या मदतीने बारीला निरोप पाठवून एका हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावले. तेव्हा बारीने हे प्रकरण पोलीस आयुक्तांपर्यंत गेल्याचे सांगितले. पोलीस आयुक्तांना ३ लाख, सिटीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना दोन लाख रुपये आणि त्याच्यासाठी त्याने एक प्लॉट आणि काही रक्कम द्यावी लागेल असे सांगितले. 

हिवराळेने २० फेब्रुवारीला  नासेरखान यांना पुन्हा फोन करून बारी यांनी बोलावल्याचा निरोप दिला. त्यानंतर नासेरखान, त्यांचा मित्र शहारुख आणि हिवराळे  हे आरोपीच्या घराजवळ गेले. आरोपींनी  त्यांना साठे चौैकात पुढे जाण्यास सांगितले. काही वेळाने बारी आणि त्यांचा मुलगा तेथे आले. नासेरखान यांनी आरोपींना रोख २० हजार रुपये दिले. यावेळी उर्वरित रक्कम तात्काळ दे अन्यथा महागात पडेल अशी धमकी दिली.

Web Title: Offense against father-son demanding ransom in the name of Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.