कुलगुरूंच्या चौकशी अहवालावरून टोलवाटोलवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 04:50 PM2019-05-31T16:50:01+5:302019-05-31T16:54:02+5:30

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध आरोपांची चौकशी एस. एफ. पाटील समितीने केली

negligence over Dr. BAMU VC's inquiry report | कुलगुरूंच्या चौकशी अहवालावरून टोलवाटोलवी

कुलगुरूंच्या चौकशी अहवालावरून टोलवाटोलवी

googlenewsNext
ठळक मुद्देउच्चशिक्षण विभाग म्हणतो राज्यपालांकडे पाठविलाराज्यपाल कार्यालय सांगते मिळालाच नाही

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध आरोपांची चौकशी करण्यासाठी शासनाने नेमलेल्या एस. एफ. पाटील समितीच्या अहवालावरून टोलवाटोलवी सुरू असल्याचे स्पष्ट झाले. हा अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी मराठवाडा विकास कृती समिती आणि मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे मागील महिनाभरापासून औरंगाबाद आणि मुंबईत बेमुदत उपोषण सुरू आहे. 

मराठवाडा विकास कृती समितीचे मागील ३० दिवसांपासून विभागीय आयुक्तालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणकर्त्यांना उच्चशिक्षण विभागाचे सहसचिव डॉ. सिद्धार्थ खरात यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून उपोषण मागे घेण्यास सांगितले. कुलगुरूंच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने शासनाकडे अहवाल सादर केला. हा चौकशी अहवाल शासनाने पुढील कार्यवाहीसाठी राज्यपाल कार्यालयाकडे पाठविल्याचे स्पष्टीकरण दिल्याचे उपोषणकर्ते डॉ.दिगंबर गंगावणे यांनी सांगितले. डॉ.खरात आणि राहुल वडमारे यांच्यात झालेला संवादच ‘लोकमत’ला मिळाला आहे. उपोषणकर्त्यांनी उच्चशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार डॉ. खरात यांनी उपोषणकर्त्याशी संवाद साधला. शासनाने चौकशी अहवाल राज्यपालांकडे दिला आहे. त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार हा राज्यपालांचा आहे. त्यामुळे आपण उपोषण थांबवावे, असेही डॉ. खरात यांनी स्पष्ट केले. राज्यपालांना कोणीही सांगू शकत नाही. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री हेसुद्धा या विषयात काहीही करू शकणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.  

याच वेळी मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे चौकशी अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर दोन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. या समितीचे अध्यक्ष नवनाथ देवकते यांनी राज्यपाल कार्यालयातील अव्वर सचिव प्रताप लुबाळ यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शासनाकडून कुलगुरूंच्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाला नसल्याचे सांगून, अहवाल प्राप्त झाल्यास तात्काळ कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले. त्यानंतर मराठवाडा कृती समितीच्या सदस्यांनी मंत्रालयात डॉ. सिद्धार्थ खरात यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी २० नोव्हेंबर २०१८ रोजी राज्यपालांकडे अहवाल पाठविला असल्याचे सांगितले. यावरून कुलगुरूंच्या चौकशी अहवालावरून टोलवाटोलवी सुरू असल्याचे नवनाथ देवकते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. डॉ. खरात यांच्या भेटीनंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उच्चशिक्षण सचिव सौरभ विजय यांची भेट घेऊन हा टोलवाटोलवीचा प्रकार त्यांना सांगितला असल्याचे स्पष्ट केले.

सेवानिवृत्तीचे लाभ थांबविले?
कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे हे विद्यापीठातून ३ जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचे वय ६२ वर्षांहून अधिक असल्यामुळे त्यांना पुन्हा पुणे विद्यापीठात रुजू होता येणार नाही. कुलगुरू या पदावरूनच ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीसंदर्भात विद्यापीठ मागासवर्गीय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने विभागीय उच्चशिक्षण विभागाकडून माहिती मागविली होती. त्यांना सहसंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार कुलगुरूंच्या  विरोधातील चौकशी संदर्भातील कोणतीही सूचना राज्यपाल कार्यालयांकडून प्राप्त झालेली नाही. शासन निर्णयाद्वारे कुलगुरूं ची चौकशी करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यपालांकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय सेवानिवृत्तीचे लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: negligence over Dr. BAMU VC's inquiry report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.