पैठण शहरात पुन्हा गूढ आवाज; आठ वर्षात ३१ वेळा अनुभव, कारण अद्याप अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 07:17 PM2023-11-17T19:17:21+5:302023-11-17T19:17:42+5:30

शास्त्रज्ञांना सुध्दा गूढ आवाजाचे रहस्य उलगडले नाही

Mysterious noises again in Paithan city; Experienced 31 times in eight years, cause still unclear | पैठण शहरात पुन्हा गूढ आवाज; आठ वर्षात ३१ वेळा अनुभव, कारण अद्याप अस्पष्ट

पैठण शहरात पुन्हा गूढ आवाज; आठ वर्षात ३१ वेळा अनुभव, कारण अद्याप अस्पष्ट

पैठण : वर्षभराच्या कालावधीनंतर शक्तीशाली गूढ आवाजाने शुक्रवारी दुपारी पुन्हा पैठण शहरास दणका दिला. गूढ आवाजाने पैठण शहराचा दक्षिण भाग व परिसर हादरला. या आधी १ ऑक्टोबर, २०२२ रोजी पैठण परिसरात गूढ आवाजाचा दणका नागरिकांना जाणवला होता. गेल्या आठ वर्षातील गूढ आवाजाचा आजचा ३१ वा हादरा होता. विशेष म्हणजे, पैठण शहराला फेब्रुवारी ते मे महिन्या दरम्यानच असे हादरे बसले आहेत.

नोहेंबर महिन्यात गूढ आवाजाचा हादरा बसण्याची ही पहिली वेळ आहे. भूकंप मापन यंत्रावर नोंद होत नसलेल्या या गुढ आवाजा समोर जिओलॉजिकल सर्वे ऑफ ईंडियानेही हात टेकले आहेत. नेमका हा आवाज येतो कोठून हा यक्ष प्रश्न जनतेला भेडसावत आहे. शुक्रवारी दुपारी १.४७ वा   शक्तिशाली गूढ आवाजाने पैठण शहर व परिसर हादरला. पैठण शहराच्या ५ किलोमीटर परिघात या गूढ आवाजाची तीव्रता नागरिकांना जाणवली. आवाजाच्या तीव्रतेने नागरिकामधे थोडावेळ चलबिचल झाली होती. पैठण शहरास व परिसरातील अनेक गावांना अशा आवाजाचे हादरे ठराविक कालावधी नंतर सातत्याने बसत आहेत.मात्र प्रशासनाकडून या आवाजाबाबत खुलासा होत नसल्याने जनतेत आवाजाबाबत तर्क वितर्क लढवले जात आहे.

दरम्यान, आज दुपारी १.४७ वा पैठण शहरासह पंचक्रोशीतील गावांना  गूढ आवाजाच्या दणक्याने हादरे बसले. आवाजाची तीव्रता जास्त असल्याने  अनेक नागरिकांच्या घराच्या भिंती हादरल्या, छताचे पत्रे थरथरले, खिडकिच्या काचा कंप  पावल्या, मातीच्या घराच्या भिंतीची माती घसरली, या प्रकाराने  नागरिकांची भितीने गाळण उडाली होती.

पैठण येथील व्यापारी गणेश कोळपकर यांनी या बाबत लोकमतला फोन करून गूढ आवाजा बाबत चिंता व्यक्त केली. माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड यांनीही या बाबत शास्त्रीय संशोधन व्हावे अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. गूढ आवाजाचा दणका जाणवल्याचे शहरातील व ग्रामीण भागातील अनेकांनी सांगितले. 

आठ वर्षात ३१ गूढ आवाजाचे दणके
पैठण परिसरात अशा प्रकारच्या गूढ आवाजाचे नियमीत पणे  हादरे बसत आहेत प्रत्येक वेळी जनतेत घबराट पसरते,  या गूढ आवाजाची शहनिशा करून हा आवाज नेमका कशाचा आहे या बाबत प्रशासनाने खुलासा करावा अशी जनतेतून मागणीही सातत्याने होत आहे. गेल्या ८ वर्षात आजचा ३१ वा गूढ आवाज होता.  पैठण परिसरात जायकवाडी सारखे मोठे १०२टी एम सी क्षमतेचे धरण असल्याने शंकाकुशंकेने नागरिकांची झोप उडाली आहे.  वारंवार असे धक्के बसत असताना जिल्हा प्रशासन मात्र या बाबतीत मौन बाळगून आहे. प्रशासनाकडून कसलाच खुलासा होत नसल्याने या आवाजाचे गूढ वाढतच चालले आहे. 

शास्त्रज्ञांना सुध्दा गूढ आवाजाचे रहस्य उलगडले नाही
पैठण शहर व तालुक्यात सातत्याने भुगर्भात होत असलेल्या गुढ आवाजाचे संशोधन करण्यासाठी नागपूर येथील भारतीय भूगर्भ वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचे पथक पैठण येथे दि १२ ऑगस्ट २०१५ रोजी दाखल झाले होते. वरिष्ठ भुगर्भशास्त्रज्ञ महेश वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने गुढ आवाजाचे संशोधन करण्यासाठी माती खडक आदीचे नमुने नेले होते. तथापी गूढ आवाजाचे रहस्य शोधताना जिओलॉजिकल सर्वे ऑफ ईंडिया, नागपूर चे भूगर्भशास्त्रज्ञ ठोस निष्कर्ष काढू शकले नाहीत. परंतु, या शास्त्रज्ञांनी पैठण व नागपूर येथील भूकंप मापन यंत्राच्या नोंदीचा हवाला देत या आवाजाचा व भुगर्भीय हालचालीचा काही एक संबंध नसल्याचे ठामपणे जायकवाडी प्रशासनास दिलेल्या अहवालात मांडले आहे. विशेष म्हणजे, या अहवालात आवाजाच्या घटना घडल्या आहेत हे शास्त्रज्ञांनी मान्य केले असल्याने शेवटी हा आवाज नेमका येतो कोठून या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरितच राहिले आहे.

Web Title: Mysterious noises again in Paithan city; Experienced 31 times in eight years, cause still unclear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.