माझे शहर, माझी संकल्पना; छत्रपती संभाजीनगरात नाइट लाइफ सुरू व्हायला हवी

By विजय सरवदे | Published: January 11, 2024 05:31 PM2024-01-11T17:31:09+5:302024-01-11T17:31:24+5:30

अजिंठा लेणी पाहून उशिरा शहरात आलेल्या पर्यटकांना रात्री १०-११ वाजेनंतर इथे ना काही खरेदी करता येत, ना खाण्यासाठी हॉटेल्स् उघडी असतात.

My City, My Concept; Night life should start in Chhatrapati Sambhaji Nagar | माझे शहर, माझी संकल्पना; छत्रपती संभाजीनगरात नाइट लाइफ सुरू व्हायला हवी

माझे शहर, माझी संकल्पना; छत्रपती संभाजीनगरात नाइट लाइफ सुरू व्हायला हवी

छत्रपती संभाजीनगर : या शहरात पर्यटन, उद्योग आणि इतर व्यवसायाला खूप मोठा वाव आहे. पण, त्यासाठी आवश्यक त्या सुविधा कमी पडतात. इथे जयपूर शहरासारखी ‘नाईट लाइफ’ सुरू करावी. त्यामुळे येथे पर्यटक वाढतील आणि गुंतवणूकदारही येतील, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी व्यक्त केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी छत्रपती संभाजीनगर शहराविषयी काही कल्पना मांडल्या त्या अशा, आपल्याकडे अजिंठा, वेरूळ ही जागतिक वारसा स्थळे आहेत. शिवाय, बिबी का मकबरा, पाणचक्की आणि जवळच दौलताबाद किल्ला ही पर्यटनस्थळे स्थापत्यकला, शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत. मात्र, तुलनेने या शहरात विदेशी पर्यटकांना हवे तशा सुविधा मिळत नाहीत. अजिंठा आणि वेरूळकडे देश-विदेशांतील पर्यटकांना जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी स्वतंत्र ‘कोरिडोअर’ हवा. शहर व जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती मिळण्यासाठी एक मध्यवर्ती केंद्र असावे. येणाऱ्या पर्यटकांना या शहरात थांबण्यासाठी ‘नाइट लाइफ’ सुरू करायला हवी. अजिंठा लेणी पाहून उशिरा शहरात आलेल्या पर्यटकांना रात्री १०-११ वाजेनंतर इथे ना काही खरेदी करता येत, ना खाण्यासाठी हॉटेल्स् उघडी असतात. मी जयपूर शहराशी संबंधित आहे. पर्यटनाच्या दृष्टीने तेथे जो विकास झाला, तो अवर्णनीय आहे. तिथे पर्यटकांना सर्व सुविधा, मार्गदर्शन सहज उपलब्ध मिळते. रात्रीच्या वेळीही त्या शहरात पर्यटकांना सर्व आवश्यक त्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे तिथे येणारा पर्यटक जगभरात जयपूरची स्तुती करत असतो.

या शहरात पाणी पाच-सहा दिवसांना मिळते. विमानाची इंटरकनेक्टिव्हिटी नाही. नाइट लाइफ नाही, अशा बातम्या सातत्याने प्रसार माध्यमांवर झळकत असतात. त्यामुळे या शहराविषयी निगेटिव्हिटी निर्माण झाली असून, येथे गुंतवणूक करण्यासाठी मोठमोठे उद्योग धजावत नाहीत. तसे हे शहर पर्यावरणदृष्ट्या उत्तम आहे. इथले लोक शांत, संयमी व आपुलकीने वागणारी आहेत. कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने हे शहर महाराष्ट्राचे मध्यवर्ती ठिकाण आहे.

Web Title: My City, My Concept; Night life should start in Chhatrapati Sambhaji Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.