Maharashtra SSC Results 2018 : औरंगाबाद विभागात मुलांपेक्षा मुलींचा निकाल सहा टक्क्यांनी अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 06:48 PM2018-06-08T18:48:45+5:302018-06-08T18:54:20+5:30

औरंगाबाद : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी ) परीक्षेचा निकाल ...

Maharashtra SSC Results 2018: Out of boys in Aurangabad division, girls outnumber six percent more | Maharashtra SSC Results 2018 : औरंगाबाद विभागात मुलांपेक्षा मुलींचा निकाल सहा टक्क्यांनी अधिक

Maharashtra SSC Results 2018 : औरंगाबाद विभागात मुलांपेक्षा मुलींचा निकाल सहा टक्क्यांनी अधिक

googlenewsNext
ठळक मुद्देदहावीत उत्तीर्णतेची टक्केवारी वाढलीबीड जिल्ह्याचा निकाल ९२.५४ टक्के.

औरंगाबाद : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी ) परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि.८) दुपारी एक वाजता आॅनलाईन जाहीर झाला. राज्यात औरंगाबाद विभागाने पाचवा क्रमांक पटकावला, तर औरंगाबाद विभागात बीड जिल्ह्याने बाजी मारली. औरंगाबाद विभागाचा निकाल ८८.८१ टक्के एवढा असून, बीड जिल्ह्याचा निकाल ९२.५४ टक्के एवढा लागला. मागील वर्षाच्या तुलनेत  यावर्षी उत्तीर्णतेचे प्रमाण ०. ६६ टक्क्यांनी वाढले आहे. तर मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतचे प्रमाण तब्बल ५. ९६ टक्के एवढे अधिक असल्याची माहिती विभागीय परीक्षा मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

औरंगाबाद विभागातंर्गत असलेल्या औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील एकुण २४६१ माध्यमिक शाळांमधून १ लाख ८९ हजार ६१५ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील १ लाख ८८ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १ लाख ६७ हजार २४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ८८. ८१ इतकी आहे. याचवेळी पुर्नपरीक्षार्थीच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ४२.३४ एवढी आहे. मागील वर्षी ७ हजार ९०७ विद्यार्थी अनुतीर्ण झाल्यामुळे त्यांनी यावर्षी मार्च महिन्यात पुन्हा परीक्षा दिली होती. यातील ३३४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

बीड जिल्हा पहिला, तर औरंगाबाद दुसरा क्रमांक

औरंगाबाद विभागात बीड जिल्ह्याचा निकाल ९२.५४ टक्के एवढा लागला आहे. बीड जिल्ह्यातून एकुण ४४ हजार ४२ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली होती. यातील ४० हजार ७५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल ९०.८५ टक्के एवढा लागला आहे. यानंतर जालना ८९.९२ टक्के, परभणी ८४.३९ आणि सर्वात कमी हिंगोली जिल्ह्याचा निकाल ७७.३७ टक्के एवढा लागला आहे.

मुलीच ठरल्या हुशार

औरंगाबाद विभागात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ५.९६ टक्के एवढी अधिक आहे. विभागात एकुण विद्यार्थ्यांमध्ये १ लाख ८ हजार ३९ मुलांनी परीक्षा दिली. त्यातील ९३ हजार २०३ मुले उत्तीर्ण झाली. टक्केवारीत हा आकडा ८६.२७ एवढा आहे. तर विभागात ८० हजार २८० मुलींनी परीक्षा दिली होती. त्यातील ७४ हजार ४१ मुली उत्तीर्ण झाल्या. टक्केवारी ही आकडेवारी ९२.२३ एवढी आहे.

प्राविण्य श्रेणीत ५० हजार विद्यार्थी

विभागीय शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या निकालात श्रेणी पद्धती देण्यात आली आहे. औरंगाबाद विभागात दहावीची परीक्षा दिलेल्या एकुण १ लाख ६७ हजार २४४ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ५० हजार २८० विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर प्रथम श्रेणीत ६६ हजार ३८४, द्वितीय श्रेणीत ४२ हजार ७६८ आणि ७, ८१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

‘बेस्ट आॅफ फाईव्ह’मुळे टक्केवारीत उढ्ढाण

विद्यार्थ्यांना एकुण विषयांपैकी सर्वांधिक गुण मिळणा-या पाच विषयांची टक्केवारी गृहीत धरण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या टक्केवारीने उढ्ढाण घेतले आहे. यातच कला, क्रीडा प्रकारातील पैकीच्या पैकी गुणांचाही समावेश झाल्यामुळे प्राविण्य श्रेणीतील विद्यार्थ्यांची संख्या ५० हजारांपेक्षा अधिक झाली आहे. कला व क्रीडा प्रकारात औरंगाबाद जिल्ह्यातील ५४१९, बीड ५०८७, जालना १५४७, परभणी २६४४ आणि हिंगोली जिल्ह्यातील १२५१ विद्यार्थ्यांना फायदा झाला असल्याची माहिती सचिव सुगता पुन्ने यांनी दिली.

गैरप्रकाराची २३० प्रकरणे उघड

औरंगाबाद विभागात परीक्षा केंद्र आणि परीक्षोत्तर गैरमार्गाचा अवलंब करणारे एकुण २३० विद्यार्थी आढळून आले आहेत. यातील २०९ प्रकरणांची चौकशी पूर्ण झाली असून, उर्वरित प्रकारणांची चौकशी करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे.

Web Title: Maharashtra SSC Results 2018: Out of boys in Aurangabad division, girls outnumber six percent more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.