छत्रपती संभाजीनगरात भर दिवसाही लुटमार; दिवसाला चोरी, लुटीच्या किमान दोन घटना

By सुमित डोळे | Published: December 5, 2023 12:00 PM2023-12-05T12:00:28+5:302023-12-05T12:00:46+5:30

पोलिसांच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह; गेल्या १० महिन्यांमध्ये केवळ लुटल्याच्या २५० पेक्षा अधिक रेकॉर्डब्रेक घटना घडल्या आहेत

Looting in Chhatrapati Sambhaji Nagar even in broad daylight; At least two incidents of theft, robbery a day | छत्रपती संभाजीनगरात भर दिवसाही लुटमार; दिवसाला चोरी, लुटीच्या किमान दोन घटना

छत्रपती संभाजीनगरात भर दिवसाही लुटमार; दिवसाला चोरी, लुटीच्या किमान दोन घटना

छत्रपती संभाजीनगर : गेल्या पाच महिन्यांमध्ये शहराच्या विविध भागांत पोलिसांऐवजी गावगुंड, लुटारूंची दहशत वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एके काळी निर्मनुष्य ठिकाणी, अंधारात लुटण्यात येत होते. आता मात्र, २४ तास शहरात नागरी वसाहत, रहदारीच्या दिवसाला चोरी, लुटीच्या किमान ३ घटना घडत आहेत. गेल्या १० महिन्यांमध्ये केवळ लुटल्याच्या २५० पेक्षा अधिक रेकॉर्डब्रेक घटना घडल्याने, शहर पोलिसांच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अप्पासाहेब दाभाडे (रा.बदनापूर) हे महावितरणमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ आहेत. ३ डिसेंबरला कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी ते शहरात आले होते. घरी परत जाण्यासाठी सायंकाळी ७ वाजता सिडको चौकात बसची वाट पाहत थांबले. तेव्हा लांब केस असलेला तरुण त्यांच्याकडे गेला. ‘तुला कुठे जायचे आहे, मी सोडताे,’ असे म्हणत त्याने अचानक अप्पासाहेब यांची कॉलर पकडली. बळजबरीने ओढून उभे करत मोबाइल हिसकावून घेतला. त्याच्या दुसऱ्या साथीदाराने पळत येत, पैसे असलेले वॉलेट काढून घेत निघून गेले. तेवढ्यात एका दुचाकीस्वाराने तेथे जात ‘तुमचा मोबाइल, वॉलेट मी मिळवून देतो,’ असे म्हणत तो समोर गेला, परंतु लुटणारे दोघे त्याच्याच दुचाकीवर बसून निघून गेले.

आठ दिवसांपूर्वी विद्यानिकेतन कॉलनीत वर्षा सावळे या सायंकाळी ५ वाजता मुलीसोबत जात होत्या. यावेळी मोपेड दुचाकीवर आलेल्या चोराने पाठीमागून जात त्यांच्या हातातील मोबाइल, कागदपत्रे व दीड हजार रोख रक्कम असलेली पर्स ओढली. वर्षा यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने हिसका देऊन पोबारा केला.

जुलैपर्यंत शंभरी ओलांडली, ऑक्टोबर अखेर २५०च्या पार
केवळ लुटमारीच्या घटनांनी शहरात जुलैअखेरच शंभरी ओलांडली होती. जुलैपर्यंत लुटल्याच्या ८८ घटना होत्या, तर मारहाण करून जबरी लुटल्याच्या ४३ घटना होत्या. त्यात बहुतांश घटना एप्रिल, मे, सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात घडल्या. अशा दिवसाला किमान २ लुटीच्या घटना घडत आहेत. ऑक्टोबरअखेर हा आकडा २५० च्या घरात पोहोचला. मात्र, पोलिस विभाग अद्यापही याकडे गांभीर्याने पाहायला तयार नसल्याचे चित्र आहे.

नेमके घडतेय काय?
-लुटमारीच्या सर्वाधिक घटना या मुकुंदवाडी, सिडको, एमआयडीसी सिडको, वाळूज, एमआयडीसी वाळूज, पुंडलिकनगर परिसरात घडत आहे.
-सकाळी ६ ते १० व रात्री ५ ते १२ या वेळेत मोपेडस्वार, स्पोर्टस् बाइकवर येत सहज पर्स, मोबाइल ओढून नेतात.
-मुकुंदवाडी परिसर, सिडको बसस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानकावर सर्रास रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा वावर.
-रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवणे, मारहाण करून लुटले जाते.
-रस्त्यावरील पोलिसांचा वावर कमी होणे, गांभीर्याने गस्त घातली जात नसल्याचे मत निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

समन्वयाचा अभाव
मोठी घरफोडी, लुटमार, सोनसाखळी चोरी सारख्या गंभीर घटना स्थानिक पोलिसांकडून वरिष्ठ अधिकारी, नियंत्रण कक्ष, गुन्हे शाखेला कळवणे अपेक्षित असते. मात्र, कारवाईच्या स्पर्धेत स्थानिक पोलिसांकडून ते टाळले जाते. परिणामी, तपासावर परिणाम होऊन गुन्हेगारांची हिंमत वाढते.

गुन्ह्यांचा आलेखात वर, कारवाईत शून्य
सिडको, एमआयडीसी सिडको ठाण्यांकडून लुटमारीत चार टोळ्या पकडल्या गेल्या. यात दोन अल्पवयीन मुलांची टोळीदेखील निष्पन्न झाली. मात्र, मुकुंदवाडी, पुंडलिकनगर, वाळूज, हर्सूल, बेगमपुरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घटना घडूनही गांभीर्याने तपास केला गेला नाही. येथील डीबी पथकदेखील सक्रिय नसून गुन्ह्यांच्या तुलनेत गुन्ह्यांचा तपासाचा आलेख मात्र खालवला आहे.

Web Title: Looting in Chhatrapati Sambhaji Nagar even in broad daylight; At least two incidents of theft, robbery a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.