डोक्यात पाटा घालून मुलासमोरच पत्नीचा खून; संशयखोर पतीला जन्मठेपेची शिक्षा

By प्रभुदास पाटोळे | Published: August 25, 2023 07:57 PM2023-08-25T19:57:58+5:302023-08-25T19:58:21+5:30

मुलासमोरच केली होती संशयावरून पत्नीची हत्या; १० हजार रुपये दंड

Killing his wife in front of the child with a splint on her head; Suspicious husband sentenced to life imprisonment | डोक्यात पाटा घालून मुलासमोरच पत्नीचा खून; संशयखोर पतीला जन्मठेपेची शिक्षा

डोक्यात पाटा घालून मुलासमोरच पत्नीचा खून; संशयखोर पतीला जन्मठेपेची शिक्षा

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : चारित्र्याच्या संशयाने पत्नी अंजुम (३२, रा. गारज, ता. वैजापूर, ह.मु. गल्ली क्र. २१, बायजीपुरा) हिच्या डोक्यात पाटा घालून मुलासमोरच तिचा निर्घृण खून करणारा तिचा पती महंमद खलील महंमद इस्माईल ऊर्फ शेख खलील शेख इस्माईल (३८, रा. इंदिरानगर, बायजीपुरा) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.पी. इंगळे यांनी मंगळवारी जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड सुनावला.

याबाबत मृत अंजुमचा भाऊ रहीम करीम शेख (३४, रामनगर साखर कारखाना, जि. जालना, ह.मु. आयआरबी कॅम्प सातारा परिसर) यांनी फिर्याद दिली होती. अंजुमचा २००९ साली खलीलशी विवाह झाला होता. त्यांना ९ आणि ७ वर्षांची दोन मुले आहेत. खलीलचे याआधी एक लग्न झालेले आहे, हे अंजुमला २०१० मध्ये समजले होते. पहिल्या पत्नीपासून खलीलला दोन मुले व एक मुलगी आहे. ती वैजापूर तालुक्यातच राहते. खलील कधी अंजुमकडे तर कधी तिच्याकडे राहत होता.

२७ मार्च २०२२ ला खलील अंजुमकडे आलेला होता. सकाळी घर खाली करण्याच्या कारणावरून अंजुम व खलील यांच्यात वाद सुरू झाला. त्यावेळी त्यांचा मुलगादेखील घरात होता. वाद वाढत गेल्यानंतर खलीलने रागाच्या भरात घराबाहेर असलेला पाटा उचलून मुलासमोरच अंजुमच्या डोक्यात घातला. हा प्रकार सुरू असताना मुलाने मावशीला फोन केला व मामाला वर पाठव म्हणून सांगितले. त्यानंतर गंभीर जखमी अंजुमचा उपचार सुरू असताना रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबत जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

तत्कालीन पोलिस निरीक्षक आर. के. मयेकर यांनी दोषारोपपत्र दाखल केले. सहायक लोकअभियोक्ता आर.सी. कुलकर्णी यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक बी.बी. कोलते यांनी सहकार्य केले.

Web Title: Killing his wife in front of the child with a splint on her head; Suspicious husband sentenced to life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.