यंदाचा नागसेन गौरव पुरस्कार यशवंत मनोहर यांना; फेस्टिव्हलमध्ये ३ दिवस भरगच्च कार्यक्रम

By विजय सरवदे | Published: March 28, 2024 12:00 PM2024-03-28T12:00:05+5:302024-03-28T12:02:14+5:30

नागसेन वन परिसरातील लुम्बिनी उद्यानात शुक्रवारी २९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता राजस्थान येथील आंबेडकरी कार्यकर्ते तथा पत्रकार भवर मेघवंशी यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे उद्घाटन होईल.

In Chhatrapati Sambhajinagar Nagsen Festival honors Yashwant Manohar, three days of packed events | यंदाचा नागसेन गौरव पुरस्कार यशवंत मनोहर यांना; फेस्टिव्हलमध्ये ३ दिवस भरगच्च कार्यक्रम

यंदाचा नागसेन गौरव पुरस्कार यशवंत मनोहर यांना; फेस्टिव्हलमध्ये ३ दिवस भरगच्च कार्यक्रम

छत्रपती संभाजीनगर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी- माजी विद्यार्थ्यांच्या वतीने नागसेन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असून, २९, ३० आणि ३१ मार्च या तीन दिवसीय महोत्सवात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.

संयोजन समितीच्या वतीने मुख्य निमंत्रक सचिन निकम यांनी कळविले आहे की, नागसेन वन परिसरातील लुम्बिनी उद्यानात शुक्रवारी २९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता राजस्थान येथील आंबेडकरी कार्यकर्ते तथा पत्रकार भवर मेघवंशी यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे उद्घाटन होईल. त्यानंतर पटकथा लेखक, साहित्यिक तथा पत्रकार संजय पवार यांचे ‘लोकशाही आणि आंबेडकरी समाज’ या विषयावर व्याख्यान होईल. तत्पूर्वी उत्कर्षा बोरीकर यांचे भीमगीतावरील भरत नाट्यमचे सादरीकरण होईल.

३० मार्च रोजी सकाळी ११ ते ३ या वेळेत डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशनच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिर, मोफत नेत्र तपासणी आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ६ ते ७:४५ या वेळेत जेएनयू विद्यापीठात विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व केलेले ‘आईस्का’चे नेते डॉ. राहुल सोनपिंपळे, फिन्द्री या बहुचर्चित कादंबरीच्या लेखिका डॉ. सुनीता बोर्डे यांचे व्याख्यान होईल. रात्री ८ ते १० या वेळेत नागसेन वनातील माजी विद्यार्थ्यांचे कवींचे संमेलन होईल.

रविवार, ३१ मार्च रोजी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी पीपल्स एज्युकेशन सोसायटीतील सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांचे संमेलन होईल. त्यात सिडनहॅम कॉलेजचे माजी प्राचार्य व्ही. बी. तायडे, ॲड. जयमंगल धनराज, महेंद्र भवरे, डॉ. युवराज धसवाडीकर, डॉ. प्रियानंद आगळे आदींच्या परिसंवादातून पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासाबाबत चर्चा घडवून आणली जाणार आहे. पीईएस अभियांत्रिकीचे माजी विद्यार्थी तथा पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होईल. या दिवशीच पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थ्यास देण्यात येणारा नागसेन गौरव पुरस्कार हा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे.

Web Title: In Chhatrapati Sambhajinagar Nagsen Festival honors Yashwant Manohar, three days of packed events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.