उलगडतोय इतिहास! बीबी का मकबऱ्यासमोर उत्खननात सापडला अनोखा ‘ग्रीन जास्पर’ दगड

By संतोष हिरेमठ | Published: February 16, 2024 07:44 PM2024-02-16T19:44:50+5:302024-02-16T19:46:18+5:30

 ‘मिनी ताज’च्या परिसरात सापडले पुरातन बांधकामाचे अवशेष

History is unfolding! A unique 'green jasper' stone was found in excavations in front of Bibi Ka's tomb | उलगडतोय इतिहास! बीबी का मकबऱ्यासमोर उत्खननात सापडला अनोखा ‘ग्रीन जास्पर’ दगड

उलगडतोय इतिहास! बीबी का मकबऱ्यासमोर उत्खननात सापडला अनोखा ‘ग्रीन जास्पर’ दगड

छत्रपती संभाजीनगर : गडद हिरवा रंग, त्यात काही ठिकाणी लाल, पिवळ्या रंगाचा शिडकावा केल्यासारखा दिसणारा ‘ग्रीन जास्पर’ नावाचा दगड जगप्रसिद्ध बीबी का मकबरा परिसरातील उत्खननात सापडला. याच दगडला टोकदार, अणकुचीदार करून हत्यार म्हणून वापर केला जात असे. त्याबरोबर याच दगडाचा चुरा करून बीबी का मकबऱ्यातील चित्र, नक्षीकामासाठी वापर झाल्याची शक्यता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली.

बीबी का मकबऱ्यासमोर असलेल्या उंचवट्यातील जागेत उत्खनन करण्यात येत आहे. याठिकाणी मकबरा बांधकाम काळातील स्नानगृह, शौचालयासारखा दगडी, चुन्याचे बांधकाम असलेला पाया, अवशेष आढळले आहेत. उत्खनन करून मलबा हटवला गेल्याने विटा, चुना, दगडी मध्ययुगीन बांधकामाचे अवशेष उघडे पडले आहेत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे अधीक्षक (अधीक्षण पुरातत्त्वविद) डाॅ. शिव कुमार भगत यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन सुरू आहे.

मकबऱ्यासाठीचे दगड अन् चुन्याचा वापर
उत्खनन होणारी जागा मकबऱ्याचे बांधकाम करणाऱ्या मजुरांसाठी वापरली जात असावी. मकबरा पूर्ण झाल्यानंतर समोर इतर वास्तू ठेवली जात नाही; परंतु देखभाल ठेवणाऱ्यांसाठी मकबरा बांधून झाल्यानंतरही हे बांधकाम तसेच ठेवण्यात आले. मकबरा बांधण्यासाठी जे दगड वापरात आले नाही, ते या बांधकासाठी वापरण्यात आले. मकबऱ्यासाठी ज्या पद्धतीचा चुना वापरण्यात आला, त्याच चुन्याचाही वापर झाला आहे.

उखळासारखा दगड
उत्खननाच्या ठिकाणी उखळासारखा एक दगड सापडला आहे. चौकोनी आकाराचा दगड आणि त्यात खड्डा आहे. हा दगड बांधकामाच्या उंच भागात होतात. त्यामुळे या दगडाचा वापर खांब उभा करण्यासाठी केला जात असल्याची शक्यता वर्तविण्यात आली.

टप्प्याटप्प्यात उत्खनन
उत्खननाचे काम टप्प्याटप्प्यात केले जाते. त्यानुसार बीबी का मकबरा परिसरात उत्खनन सुरू आहे. येथे ‘ग्रीन जास्पर’ हा दगड सापडला आहे. महिनाभर हे काम चालेल. उत्खनन करणाऱ्यांना प्रशिक्षण दिलेले आहे.
- डाॅ. प्रशांत सोनोने, सहायक अधीक्षण पुरातत्त्वविद, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण.

Web Title: History is unfolding! A unique 'green jasper' stone was found in excavations in front of Bibi Ka's tomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.