पर्यटन राजधानीचा ऐतिहासिक वारसा राष्ट्रगीतात चित्रित; औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 07:55 PM2019-02-11T19:55:06+5:302019-02-11T19:57:13+5:30

१४ फेब्रुवारी रोजी एमजीएम संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात सायंकाळी ५ वाजता होणार लोकार्पण.

Historical heritage of tourist capital painted in the national anthem; Aurangabad History Society's Program | पर्यटन राजधानीचा ऐतिहासिक वारसा राष्ट्रगीतात चित्रित; औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीचा उपक्रम

पर्यटन राजधानीचा ऐतिहासिक वारसा राष्ट्रगीतात चित्रित; औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीचा उपक्रम

googlenewsNext
ठळक मुद्देके. के. मोहम्मद यांच्या हस्ते लोकार्पण

औरंगाबाद : ऐतिहासिक वास्तूंमुळे जागतिक नकाशावर असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील वारसा ५२ सेकंदांच्या ‘राष्ट्रगीता’मध्ये चित्रित केला आहे. या वैभवशाली वारसाचे दर्शन घडविणाऱ्या राष्ट्रगीताचे लोकार्पण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे  माजी संचालक आणि आगाखान सेंटर फॉर कल्चर अ‍ॅण्ड हेरिटेजचे विद्यमान प्रकल्प संचालक डॉ. के. के. मोहम्मद यांच्या हस्ते १४ फेब्रुवारी रोजी एमजीएम संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात सायंकाळी ५ वाजता होणार आहे. 

औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे दोन वर्षांपूर्वी राष्ट्रगीतात वैभवशाली वारसा चित्रित करण्याचा ‘अमेझिंग औरंगाबाद : जन गण मन’ हा प्रकल्प हाती घेतला होता. त्यास सेंसॉर बोर्डाकडून नुकतीच मंजुरी मिळाली आहे. यानंतर त्याचे लोकार्पण करण्यात येत असल्याची माहिती सोसायटीचे सदस्य अ‍ॅड. स्वप्नील जोशी यांनी महाराष्ट्र गांधी भवन स्मारक निधी संस्थेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. देशात प्रसिद्ध असलेल्या ‘मिले सूर मेरा तुम्हारा’च्या धर्तीवर प्रत्येक ऐतिहासिक वास्तंूच्या ठिकाणी राष्ट्रगीताचे कडवे मान्यवरांनी गायले आहे. अशा पद्धतीने बहुतांश वास्तू या राष्ट्रगीतामधून दाखविण्याचा प्रयत्न केला असल्याची माहितीही अ‍ॅड. जोशी यांनी दिली.

या ऐतिहासिक वास्तूंमध्ये अजिंठा- वेरूळ लेणी, दौलताबादचा किल्ला, बीबीका मकबरा, हिमायतबाग, जायकवाडी धरण, दिल्लीगेट, घाटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मराठवाडा अ‍ॅटो क्लस्टर, सरस्वती भुवन शिक्षण संस्था, नुकतेच तयार झालेले रामकृष्ण मंदिर आदींचा समावेश आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच शहर आणि जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंचा वारसा राष्ट्रगीतामधून दाखविण्यात येत आहे. या कार्यक्रमाला शहरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, संस्थेच्या सचिव डॉ. बिना सेंगर,  अ‍ॅड. जोशी यांनी केले. या पत्रकार परिषदेला औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीचे सदस्य प्रमोद माने, स्वप्नील खरे, अमित देशपांडे आदी उपस्थित होते.

या महनीय व्यक्तींनी गायले राष्ट्रगीत
ऐतिहासिक वास्तूंच्या ठिकाणी शहरातील महनीय व्यक्तींनी राष्ट्रगीताचे कडवे गायले आहे. यामध्ये पद्मश्री डॉ. यू. म. पठाण, फातेमा झकेरिया, दिवंगत दिनकर बोरीकर, बा. वि. गर्गे, पंडित नाथराव नेरळकर, पंडित विश्वनाथ ओक, स्वातंत्र्यसैनिक  ना. वि. देशपांडे, ताराबाई लड्डा, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, प्रा. दिलीप घारे, कवी डॉ. दासू वैद्य, इतिहासकार रा. श्री. मोरवंचीकर, डॉ. दुलारी कुरेशी, रफत कुरेशी, जलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे, पक्षीमित्र दिलीप यार्दी, उद्योजक राम भोगले, चित्रकार विजय कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार बैजू पाटील, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, प्राचार्य प्रतापराव बोराडे, साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे, बाबा भांड, कुलगुरू डॉ. वि. ल. धारूरकर, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्मिता अवचार यांच्यासह उद्योजक, घाटीतील डॉक्टर, परिचारिका,  विद्यार्थी आदींचा समावेश आहे.
 

Web Title: Historical heritage of tourist capital painted in the national anthem; Aurangabad History Society's Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.