वाहनांचे खराब ऑइल विकून अनाथांना मदत; दुचाकी मेकॅनिक संघटनेचा स्तुत्य उपक्रम

By मुजीब देवणीकर | Published: December 4, 2023 07:15 PM2023-12-04T19:15:47+5:302023-12-04T19:16:18+5:30

मिळालेल्या पैशातून अनाथ मुलांना गहू, तांदूळ, तेलाचे डबे अशी भरीव मदत करण्यात आली.

Help orphans by selling used vehicle oil; A unique initiative of two-wheeler mechanics association | वाहनांचे खराब ऑइल विकून अनाथांना मदत; दुचाकी मेकॅनिक संघटनेचा स्तुत्य उपक्रम

वाहनांचे खराब ऑइल विकून अनाथांना मदत; दुचाकी मेकॅनिक संघटनेचा स्तुत्य उपक्रम

छत्रपती संभाजीनगर : वाहनांमधून निघणारे खराब ऑइल मेकॅनिक बांधवांकडे पडून असते. छत्रपती संभाजीनगर शहरातील दुचाकी मेकॅनिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रत्येक सदस्याकडील खराब ऑइल जमा केले. एकत्र केलेले ऑइल विकले आणि त्यातून मिळालेल्या पैशातून अनाथ मुलांना गहू, तांदूळ, तेलाचे डबे अशी भरीव मदत करण्यात आली.

आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून दुचाकी मेकॅनिक संघटना काही वर्षांपासून काम करीत आहे. संघटनेने अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. दिवाळीनिमित्त अनाथ मुलांसाठी आपण काही तरी केले पाहिजे, या भावनेतून पदाधिकाऱ्यांनी शक्कल लढविली. संघटनेच्या सदस्यांकडे असलेले खराब ऑइल जमा केले. त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून तब्बल पाच क्विंटल गहू, अडीच क्विंटल तांदूळ, चार गोडेतेलाचे डबे माऊली वारकरी शिक्षण संस्था निल्लोड फाटा या संस्थेला भेट दिले.

ही संस्था अनाथ मुलांचे पालन पोषण करून त्यांना आध्यात्मिक, तसेच सामाजिक शिक्षण देऊन स्वावलंबी बनविते. या ठिकाणी ३०० मुले शिकतात. त्यापैकी ७८ मुले अनाथ आहेत. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर पवार महाराज यांचा संघटनेने विठ्ठल-रुखमाईची मूर्ती देऊन सत्कार केला.

यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सय्यद चांद, अध्यक्ष दादासाहेब तांबे, माजी अध्यक्ष बाळासाहेब पवार, कोषाध्यक्ष शेख इस्माईल, उपाध्यक्ष राजू त्रिभुवन, शेख मुन्नाभाई, शेख नूर, लासूरचे अध्यक्ष संजय त्रिभुवन, जीवन त्रिभुवन, रामेश्वर होन, चंद्रशेखर औताडे, गोकुळ तिवाडे, फुलंब्रीचे रामेश्वर गाडेकर, खुलताबादचे विनोद अण्णा पाटील, आदी उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मुलांना चिवडा व गोड पदार्थांचे वाटप करण्यात आले.

Web Title: Help orphans by selling used vehicle oil; A unique initiative of two-wheeler mechanics association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.