ग्रामपंचायतीचा व्यवहार डिजिटल; क्यूआर कोड स्कॅन करून भरा कर

By विजय सरवदे | Published: January 11, 2024 06:38 PM2024-01-11T18:38:23+5:302024-01-11T18:40:01+5:30

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींमध्ये आता डिजिटल व्यवहार

Gram Panchayat Transactions Digital; Scan the QR code and fill the tax | ग्रामपंचायतीचा व्यवहार डिजिटल; क्यूआर कोड स्कॅन करून भरा कर

ग्रामपंचायतीचा व्यवहार डिजिटल; क्यूआर कोड स्कॅन करून भरा कर

छत्रपती संभाजीनगर : राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व ८७१ ग्रामपंचायतींकडे डिजिटल कारभाराचा आग्रह धरलेला आहे. यामुळे ग्रामपंचायतींचे प्रशासन पारदर्शक व पेपरलेस होईल, अशी अपेक्षा आहे. जि.प. पंचायत विभागाने यासाठी ८७० ग्रामपंचायतींना क्यूआर कोडदेखील उपलब्ध करून दिले आहेत. तथापि, आता ग्रामीण नागरिकसुद्धा घरबसल्या ऑनलाइन मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्यास प्रवृत्त झाले आहेत.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील नागरिकांसाठी ‘महा ई ग्राम सिटीजन ॲप’ हे ऑनलाइन पोर्टल उपलब्ध आहे. हजारो नागरिकांनी या ॲपवर नोंदणी केलेली आहे. या माध्यमातूनदेखील नागरिकांना कर भरणा, शिवाय घरबसल्या विविध दाखलेही मिळविता येतात. दुसरीकडे, नागरिकांना डिजिटल व्यवहार करण्यासाठी ८७१ पैकी ८७० ग्रामपंचायतींना क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या क्यूआर कोडचा वापर करून आतापर्यंत १० लाखांचा व्यवहार झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

डिजिटल ग्रामपंचायत म्हणजे काय?
डिजिटल ग्रामपंचायत ही संकल्पना डिजिटल इंडियाचे ध्येय समोर ठेवून तयार केलेली सॉफ्टवेअर प्रणाली आहे. याचा उद्देश गावातील सर्व घटकांना सर्व प्रकारचे व्यवहार व माहिती सहज उपलब्ध होईल.

जिल्ह्यात ८७० ग्रामपंचायती डिजिटल
जिल्ह्यातील ८७१ पैकी ८७० ग्रामपंचायती डिजिटल झाल्या असून नागरिकांकडून या व्यवहारासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कोणत्या तालुक्यात किती ग्रामपंचायती डिजिटल?
तालुका- एकूण ग्रामपंचायती- डिजिटल

छत्रपती संभाजीनगर : ११५- ९९
फुलंब्री : ७०- ६७
सिल्लोड : १०४- ७०
सोयगाव : ४६- ३७
कन्नड : १३८- १०१
खुलताबाद : ४०- ३८
गंगापूर : १११- ९०
वैजापूर : १३५- १०७
पैठण : ११०- ७५

ग्रामपंचायतींमध्ये दहा लाखांचा व्यवहार डिजिटल
ग्रामपंचायती डिजिटल झाल्यापासून नागरिकांमध्येही या व्यवहाराविषयी जागरुकता आली असून या माध्यमातून जिल्ह्यात आतापर्यंत १० लाखांचा व्यवहार झाल्याचे चित्र समोर आले आहे.

ग्रामपंचायतीचा व्यवहार डिजिटल
जोपर्यंत गाव डिजिटल होत नाही, तोपर्यंत देशाची वाटचाल डिजिटल होऊ शकत नाही. या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाने ग्रामपंचायतीचा व्यवहार डिजिटल करण्यावर भर दिलेला आहे. या उद्देशाने जिल्हा परिषदेने पाऊल उचलले असून जिल्ह्यातील ९९ टक्के ग्रामपंचायतींना क्यूआर कोड उपलब्ध करून दिले आहेत. या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांनी कराचा भरणा करावा, तसेच ‘महा ई ग्राम सिटिजन ॲप’द्वारे घरबसल्या विविध दाखले मिळवावेत.
-डॉ. ओमप्रकाश रामावत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

 

Web Title: Gram Panchayat Transactions Digital; Scan the QR code and fill the tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.