रस्त्यावर येणारा कचरा बंद होईना, आता काय करावे? मनपा प्रशासनाचे डोकेच चालेना!

By मुजीब देवणीकर | Published: December 4, 2023 07:25 PM2023-12-04T19:25:34+5:302023-12-04T19:34:34+5:30

आठ वर्षांत इंदौरचे १० अभ्यास दौरे; सर्व उपाययोजनांवर फेरले जातेय पाणी

Garbage on the street will not be stopped, what to do now? Chhatrapati Sambhajinagar Municipality administration clueless! | रस्त्यावर येणारा कचरा बंद होईना, आता काय करावे? मनपा प्रशासनाचे डोकेच चालेना!

रस्त्यावर येणारा कचरा बंद होईना, आता काय करावे? मनपा प्रशासनाचे डोकेच चालेना!

छत्रपती संभाजीनगर : शहर इंदौरपेक्षाही अधिक स्वच्छ झाले पाहिजे, स्वच्छ भारत अभियानात देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये छत्रपती संभाजीनगरचा समावेश झाला पाहिजे म्हणून महापालिका तीन महिन्यांपूर्वी संपूर्ण यंत्रणेसह कामाला लागली. ‘हम होंगे कामयाब’ ही टॅगलाइन निश्चित करण्यात आली. त्यानंतरही शहरातील मुख्य रस्त्यांवर, चौकाचौकांत कचऱ्याचे डोंगर साचतच आहेत. कचरा रस्त्यावर येऊ नये म्हणून अनेक उपाययोजना केल्या. त्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. नागरिकच उघड्यावर कचरा आणून टाकत असल्याचे वारंवार समोर येत असल्याने आता काय करावे?; डोकंच चालत नाही, अशी भावना मनपा प्रशासनाची झाली आहे.

देशात स्वच्छ व सुंदर शहर म्हणून इंदौर शहराची ख्याती आहे. महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी मागील आठ वर्षांत इंदौरचे १० अभ्यास दौरे केले. मात्र, ‘इंदौर पॅटर्न’ची अंमलबजावणी महापालिकेला आजपर्यंत करता आली नाही. दरवर्षी महापालिका प्रशासन यंदा शहर इंदौरपेक्षाही अधिक स्वच्छ व सुंदर केले जाईल. तीन महिन्यांपूर्वी प्रशासनाचे अशाच पद्धतीने कंबर कसली. ओला व सुका कचरा वेगळा करण्यावर भर दिला. त्याला ९० टक्के यशही आले. आता ११५ वॉर्डांमधून ९० टक्के कचरा वर्गीकृत होऊनच येत आहे. १० टक्के नागरिक कचऱ्याचे वर्गीकरण करायला तयार नाहीत. महापालिका त्यांच्याकडून कचरा घेत नाही. त्यामुळे हे नागरिक रस्त्यावर, दुभाजकामध्ये, खुल्या जागांवर कचरा आणून टाकत आहेत. शहर विद्रुपीकरणात रस्त्यावरील कचरा अधिक भर घालत आहे. पर्यटनाच्या राजधानीला हे दृश्य शोभणारे नाही. झोन क्रमांक १, २, ३ मध्ये रस्त्यावर येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण जास्त आहे. रस्त्यावर कचरा येऊ नये म्हणून जनजागृती केली. दंडात्मक कारवाया केल्या. त्यानंतरही परिस्थिती सुधारणा नाही.

तीन प्रक्रिया केंद्र सुरू
हर्सूल, पडेगाव, चिकलठाणा येथे प्रत्येकी १५० मेट्रिक टन क्षमतेचे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू झाले. त्यामुळे दररोज तयार होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य होत आहे. ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती कांचनवाडीत सुरू झाली.

कोट्यवधींचा खर्च तरी...
शहरातील कचरा संकलनासाठी रेड्डी कंपनीची नेमणूक केली. दरमहा अडीच ते तीन कोटी रुपये निव्वळ कचरा उचलण्याचा खर्च येतोय. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी दरमहा किमान ५० ते ६० लाखांचा खर्च येतोय. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही शहर स्वच्छ व सुंदर होईना.

शर्थीचे प्रयत्न सुरू
रस्त्यावर येणारा कचरा बंद व्हावा, यासाठी महापालिकेने शर्थीचे प्रयत्न काही दिवसांपासून सुरू केले आहेत. एक कचऱ्याचे केंद्र बंद झाले तर दुसरीकडे दुसरे नवीन केंद्र तयार होते. जुन्या शहरात आणि शहराच्या आसपास असलेल्या गुंठेवारी भागात हा प्रश्न अधिक जटिल आहे. आम्ही येणाऱ्या काही दिवसांत यावरही मात करणार आहोत.
-सोमनाथ जाधव, उपायुक्त, मनपा.

Web Title: Garbage on the street will not be stopped, what to do now? Chhatrapati Sambhajinagar Municipality administration clueless!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.