कामचुकार अधिकाऱ्यांमुळे बट्ट्याबोळ !

By Admin | Published: May 6, 2017 12:15 AM2017-05-06T00:15:12+5:302017-05-06T00:16:07+5:30

उस्मानाबाद :बिनकामाच्या बुजगावण्या अधिकाऱ्यांमुळे या योजनांचा पुरता बट्ट्याबोळ झाल्याची संतप्त भावना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त केली

Due to shocking officials! | कामचुकार अधिकाऱ्यांमुळे बट्ट्याबोळ !

कामचुकार अधिकाऱ्यांमुळे बट्ट्याबोळ !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावला जावा, यासाठी शासन विविध योजना आखत आहे. परंतु, बिनकामाच्या बुजगावण्या अधिकाऱ्यांमुळे या योजनांचा पुरता बट्ट्याबोळ झाल्याची संतप्त भावना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त केली. रोजगार हमी, जलयुक्त शिवार या लोकहिताच्या योजना तळमळीने राबवायची गरज होती. मात्र अधिकाऱ्यांनी झोपा काढण्यात धन्यता मानली. अशा अधिकाऱ्यांना लाजाही वाटत नाहीत अशा संतप्त शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली. यापुढे अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय करणार नसल्याचा दमही त्यांनी यावेळी भरला. भापकर यांच्या या रूद्रावतारामुळे अधिकारी, कर्मचारी अक्षरश: घामाघूम झाल्याचे चित्र होते.
नगर परिषदेच्या नाट्यगृहामध्ये जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची शुक्रवारी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हाधिकारी आर. व्ही. गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, उपायुक्त विजयकुमार फड, पारस बोथ्रा, पटवारे, कुंभार, अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील यादव, प्रभोदय मुळे, अरविंद लाटकर आदी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या सुरूवातीला आयुक्तांनी विविध योजनांचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांची निराशाजनक कामगिरी पाहून आयुक्तांचा पारा चढला. उस्मानाबाद हा दुष्काळी जिल्हा आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलित आहेत. त्यामुळे शासनाने ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना आणली. परंतु, कृषी यंत्रणेने या योजनेची पुरती वाट लावल्याचे सांगत ‘आपल्या पैकी किती कृषी सहाय्यकांनी १०० शेततळी पूर्ण केली’? असा प्रश्न करीत त्यांनी हात वर करावा, असे सांगितले. परंतु, एकाही सहाय्यकाचा हात वर दिसला नाही. त्यानंतर भापकर यांनी ‘आपल्या पैकी किती जणांनी पन्नास शेततळी पूर्ण केली’? अशी विचारणा केली. यावेळीही एकाही सहाय्यकाचा हात वर झाला नाही. यावर आयुक्तांच्या रागाचा पारा चढला. अन्य एका जिल्ह्यातील महिला कर्मचारी दोनशे शेततळी पूर्ण करते आणि उस्मानाबादमध्ये ५० शेततळी पूर्ण करणारा एकही कर्मचारी नाही. ही बाब लाजिरवाणी असल्याचे सांगत ‘आपण झोपा काढता काय? हे पाप कोणाचे? अशा शब्दात अधिकारी, कर्मचाऱ्यांची त्यांनी कानउघाडणी केली.
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अकरा कलमी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. परंतु, या योजनेची गतीही फारशी समाधानकारक नाही. विहिरींची कामे ठप्प झाली आहेत. फळझाडे लागवडीच्या कामातही जिल्हा पिछाडीवर आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्ह्याबाबत आत्मीयता आहे की नाही, असा सवाल उपस्थित करीत यापुढे हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. जे अधिकारी, कर्मचारी झोपेचे सोंग घेऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्याविरूद्ध थेट कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
जिल्ह्यातील ९० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेचा खर्च शून्य टक्के आहे. या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांविरूद्ध थेट कारवाईचे संकेत त्यांनी यावेळी दिले. शासकीय कामावर येणाऱ्या मजुरांना श्रमाचा मोबदला सहा-सहा महिने मिळत नसेल तर ते कामावर येतील कशासाठी, असा सवाल करीत मजुरांच्या श्रमाचा सन्मान करायला शिका. मजुरांना मजूर म्हणून नका तर लाभार्थी संबोधा, असा सल्लाही त्यांनी दिला.
पहिल्याच बैठकीत आयुक्त भापकर यांचा रूद्रावतार पाहून कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी गमे यांनी प्रास्ताविक केले. तर अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Web Title: Due to shocking officials!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.