समाजा-समाजात दुरावा, द्वेष ही चिंतेची गोष्ट : आ.ह. साळुंखे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 01:23 PM2018-12-21T13:23:30+5:302018-12-21T13:33:45+5:30

बहुजनांसाठी लढलेले बळीराजांपासून ते गाडगेबाबांपर्यंतच्या महामानवांनी जाती-पातीच्या पलीकडे जाऊन कार्य केले

Distraction and hatred in society is dangerous : A. H. Salunkhe | समाजा-समाजात दुरावा, द्वेष ही चिंतेची गोष्ट : आ.ह. साळुंखे 

समाजा-समाजात दुरावा, द्वेष ही चिंतेची गोष्ट : आ.ह. साळुंखे 

googlenewsNext
ठळक मुद्देएकमेका साह्य करून नवनिर्मितीचा आनंद मिळवाविविधता जपण्याशिवाय दुसरा मार्ग नाही

औरंगाबाद : आज समाजा-समाजात दुरावा वाढतोय. धर्म, जाती व भाषेच्या अस्मिता तीव्र होत आहेत. हा दुरावा आता द्वेषाच्या स्तरापर्यंत जातोय. ही मोठी चिंतेची बाब असून, सर्वांनी आंतरिक एकात्मता जोपासून एकमेकांप्रती सहकार्याची भावना ठेवली पाहिजे आणि त्यातून मिळणाऱ्या नवनिर्मितीचा आनंद मिळवला पाहिजे, असे आवाहन आज येथे ख्यातनाम विचारवंत, लेखक व प्राच्यविद्या पंडित डॉ. आ.ह. साळुंखे यांनी केले.

देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी डॉ. आ.ह. साळुंखे अमृत महोत्सव गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. सत्काराला उत्तर देताना आ.ह. सरांनी चार्वाकापासूनचा संदर्भ देत तब्बल तासभर मूलगामी चिंतन उपस्थितांसमोर ठेवले. स्वराज इंडियाचे राष्टÑीय अध्यक्ष डॉ. योगेंद्र यादव यांच्या हस्ते मानपत्र देऊन हा सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. स्मिता अवचार यांनी या मानपत्राचे वाचन केले. गौरव समारंभाचे नियोजित अध्यक्ष माजी न्यायमूर्ती बी.एन. देशमुख हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत.

डॉ. योगेंद्र यादव यांनी गणतंत्र भारताचे लोकशाही, विविधता आणि विकास हे तीन खांब असल्याचे म्हटले होते व त्यावरच आज चोहोबाजूंनी हल्ला सुरू असल्याचे वक्तव्य केले होते. तो धागा पकडत डॉ. साळुंखे म्हणाले की, विविधता जपण्याशिवाय दुसरा मार्ग नाही; पण बहुजनांसाठी लढलेले बळीराजांपासून ते गाडगेबाबांपर्यंतच्या महामानवांनी जाती-पातीच्या पलीकडे जाऊन कार्य केलेले आहे, हे विसरता येणार नाही. तो त्यांचा, हा यांचा, असे न म्हणता सगळे आमचेच आहेत, असे म्हणा, हा महात्मा बसवेश्वरांचा मूलमंत्र आजही ध्यानी घेतला पाहिजे. भावनेच्या आहारी जाऊन या देशाचे प्रश्न सुटणार नाहीत. विवेकाचा अंकुश लावण्याची आज गरज निर्माण झाली आहे, असे सूचक वक्तव्य त्यांनी आजच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केले. 

अ‍ॅरिस्टॉटल, गॅलिलिओ, कोपर्निकस, कप्लर व न्यूटन या थोर शास्त्रज्ञांनी कसे शोध लावले, याचा धावता आढावा घेत आज हे शोध कसे गतिमान झालेले आहेत, याकडे उपस्थितांचे साळुंखे यांनी लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, फुले विविध रंगांची म्हणून त्यांच्यापासून आनंद मिळतो. मी माझे स्वातंत्र्य जरूर जपेन; पण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करणार नाही, ही भूमिकाही तेवढीच महत्त्वाची. 

भारताच्या स्वधर्मावरील हल्ला परतवून लावा, असे आवाहन डॉ. योगेंद्र यादव यांनी यावेळी केले. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली आपण संस्कृतीशी नाते तोडून टाकत आहोत आणि त्यामुळेच धर्मांधाच्या हातात सारे ताट देऊन मोकळे होत आहोत, हे योग्य नसल्याचे यादव यांनी सांगितले. डॉ. आ.ह. साळुंखे अमृत महोत्सव गौरव समितीचे अर्जुन जाधव यांनी प्रास्ताविक केले. साळुंखे यांचा सत्कार मंगल खिंवसरा यांनी केला, तर योगेंद्र यादव यांचा सत्कार स्वागताध्यक्ष आ. सतीश चव्हाण यांनी केला. प्रा. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. उमाकांत राठोड यांनी आभार मानले. मंचावर समितीचे उपाध्यक्ष अण्णा खंदारे, के.ई. हरिदास, प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ. प्रतिभा अहिरे आदींची उपस्थिती होती.

फी मिळावी म्हणून शेणाचा मारा सहन केला का?
सावित्रीबाई फुले यांनी त्याकाळी स्त्रीशिक्षणाचा आग्रह धरला. सनातन्यांनी त्यांचा छळ केला. शाळेत जाताना त्यांना अडवून शिव्या दिल्या, शेणाचा मारा केला. यात त्यांचा स्वार्थ काय होता? त्यांना काही फी मिळणार नव्हती. नि:स्वार्थपणे त्या हे करीत राहिल्या म्हणून आज समाजजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महिला बरोबरीने काम करताना दिसत आहेत. संसर्गजन्य प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा करतानाच सावित्रीबार्इंचा मृत्यू झाला. हा सारा इतिहास विसरून आपण कृतघ्न होऊ शकणार नाही. दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा यातून घ्या, असे आवाहन डॉ. आ.ह. साळुंखे यांनी यावेळी केले.

शेतकरी सोडून कुणीतरी आपला माल रस्त्यावर फेकला का?
एकतरी उद्योगपती आपला माल रस्त्यावर कधी फेकून देतो का? मग ही वेळ शेतकऱ्यांवरच का? आता तर हजारो नव्हे, तर लाखोंच्या संख्येत शेतकऱ्यांचा आकडा गेला. ६० ते ७० टक्के लोक शेतीशी संबंधित आहेत. शेतकरी आज कांदा रस्त्यावर फेकतोय; पण आता कुणीही प्रतिक्रिया देत नाही. कर्जमाफीऐवजी कर्जफेड हा शब्द वापरला पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला.

Web Title: Distraction and hatred in society is dangerous : A. H. Salunkhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.