कर्जमाफीचा गोंधळ कायम! वैजापूरमध्ये सत्कार झालेला शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 01:03 PM2017-10-26T13:03:06+5:302017-10-26T13:08:14+5:30

‘आपले सरकार’ या राज्य शासनाच्या संकेतस्थळावर बुधवारी संध्याकाळपर्यंत याद्या अपलोड झाल्या नाहीत. त्यामुळे तालुक्यातील शेतक-यांची कर्जमाफीची प्रतीक्षा कायम आहे.

Debt waiver forever! Farmers who felicitated in Vaijapur also waive their debts | कर्जमाफीचा गोंधळ कायम! वैजापूरमध्ये सत्कार झालेला शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

कर्जमाफीचा गोंधळ कायम! वैजापूरमध्ये सत्कार झालेला शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

googlenewsNext
ठळक मुद्देकिती शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र हे गुलदस्त्यातपात्र शेतक-यांची यादी उपलब्ध न झाल्याने बळीराजाला कर्जमाफीसाठी वाट बघावी लागत आहे.

- मोबीन खान 
वैजापूर ( औरंगाबाद ) : दिवाळीपूर्वी कर्जमाफी करण्याचा शब्द मुखमंत्र्यांनी दिला होता, त्यानुसार शेतक-यांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने कर्जमाफीस पात्र ठरलेल्या तालुक्यातील केवळ एकाच शेतक-याचा प्रातिनिधिक सत्कार ‘नरक चतुर्दशी’च्या दिवशी करण्यात आला. तसेच ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर कर्जमाफीस पात्र ठरलेल्यांच्या याद्या टाकल्याचे जाहीर केले होते. मात्र; ‘आपले सरकार’ या राज्य शासनाच्या संकेतस्थळावर बुधवारी संध्याकाळपर्यंत याद्या अपलोड झाल्या नाहीत. त्यामुळे तालुक्यातील शेतक-यांची कर्जमाफीची प्रतीक्षा कायम आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेद्वारे महाराष्ट्र शासनाने शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. कर्जमाफीच्या लाभासाठी शासनाने आॅनलाइन अर्ज प्रक्रिया राबविली होती. आॅनलाइन प्रक्रियेतील विविध अडथळ्यांमुळे अर्ज भरण्याच्या मुदतीत दोन वेळा वाढ करण्यात आली होती. २२ सप्टेंबरपर्यंत तालुक्यातील ८४ हजार शेतकºयांपैकी (खातेदार) ७७ हजार ९८४ शेतक-यांनी शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत आॅनलाइन अर्ज भरले आहेत; पण यापैकी किती शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले, याची यादी शासनाकडून अद्याप मिळाली नाही. त्यामुळे या शेतक-यांना अद्याप कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. 

तालुक्यातील लाख खंडाळा येथील रावसाहेब भागाजी गायकवाड या एकमेव शेतक-याला दिवाळीच्या मुहूर्तावर पालकमंत्र्यांच्या हस्ते १६ हजार ३८० रुपयांचे कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयीकृत बँका व सहायक निबंधक कार्यालयाकडे कर्जमाफी झालेल्या शेतºयांची ग्रीन लिस्ट शासनाकडून उपलब्ध न झाल्याने गावनिहाय कर्जमाफी झालेल्या पात्र शेतक-यांची संख्या, कर्जमाफीची एकूण रक्कम ही माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तालुक्यातील १५ शाखे अंतर्गत बाकीदार व थकबाकीदार शेतक-यांची संख्या २३ हजार एवढी आहे. या शेतक-यांची संपूर्ण माहिती जिल्हा बँकेने शासनाच्या १६६ कॉलममध्ये भरून अपलोड केली आहे; पण यातील किती शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत याची माहिती शासनाकडून मिळाली नसल्याचे जिल्हा बँकेचे लोन आॅफिसर उगले यांनी सांगितले. तालुक्यातील शेतक-यांची माहिती कर्जमाफी योजनेसाठी शासनाकडे पाठवण्यात आली आहे. २२ सप्टेंबरपर्यंत तालुक्यातील ७७ हजार ९८४ शेतक-यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्याचे चावडीवाचन तालुक्यातील १३५ ग्रामपंचायतींमध्ये करण्यात आले आहे; पण पात्र शेतक-यांची यादी उपलब्ध न झाल्याने बळीराजाला कर्जमाफीसाठी वाट बघावी लागत आहे.

साहेब पैसे केव्हा येणार....
च्औरंगाबाद येथे १८ आॅक्टोबर रोजी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा येथील एकमेव शेतकरी रावसाहेब भागाजी गायकवाड या शेतक-याचा पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते सत्कार करून कर्जमाफी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला; मात्र या शेतक-याच्या बँक खात्यात अजूनही पैसे जमा झाले नाहीत.

शासनाची यादी प्राप्त झाली नाही 
कर्जमाफी झालेल्या पात्र शेतक-यांची ग्रीन लिस्ट शासनाकडून अद्याप प्राप्त झाली नाही. ही यादी मिळाल्यानंतर तालुका कर्जमाफी समितीतर्फे तपासणी करून वेबसाइटवर टाकण्यात येईल. एक-दोन दिवसांत ही यादी मिळण्याची अपेक्षा आहे. 
-एफ.बी. बहुरे, 
सहायक निबंधक 

Web Title: Debt waiver forever! Farmers who felicitated in Vaijapur also waive their debts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.