दलाई लामा यांचे औरंगाबादेत आगमन; जागतिक धम्मपरिषदेला राहणार उपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 11:06 AM2019-11-22T11:06:31+5:302019-11-22T11:44:18+5:30
अजिंठा लेणीतील प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : जागतिक बौद्ध धम्मपरिषदेनिमित्त बौद्ध धर्मगुरू आदरणीय दलाई लामा यांचे आज सकाळी १० वाजता दिल्लीहून औरंगाबाद विमानतळावर चार्टर विमानाने आगमन झाले. विमानतळ प्राधिकरणातर्फे दलाई लामा यांचे स्वागत करण्यात आले. लामा यांच्या आगमनानिमित्त विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडेकोट ठेवण्यात आली आहे.
औरंगाबादेत भरणार जागतिक बौद्ध धम्म परिषद; दलाई लामांची उपस्थिती
दिल्लीहून सकाळी ८.०० वाजेच्या सुमारास दलाई लामा यांच्या विमानाचे उड्डाण झाले. चिकलठाणा विमानतळावर सकाळी १० वाजता त्यांचे आगमन आहे. यावेळी धम्मपरिषदेचे संयोजक हर्षदीप कांबळे, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, विमानतळ संचालक डी.जी साळवे यांनी त्यांचे स्वागत केले. विमानतळावर धम्मपरिषदेची माहिती देणाऱ्या अजिंठा लेणीच्या थ्रीडी पोस्टरचे त्यांनी कौतुक करत त्याची माहिती घेतली.
या परिषदेसाठी देश-विदेशांतून शहरात विमानसेवेसह अन्य वाहतूक सुविधांद्वारे उपासक-उपासिका, भन्ते मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणानेही परिषदेनिमित्त जोरदार तयारी केली. विमानतळावर रांगोळ्या काढण्यात आल्या. जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेणीची भव्य पोस्टर विमानतळावर लावण्यात आली आहेत.
आज सायंकाळी परिषदेचे होणार उद्घाटन
नागसेनवनातील पीईएस क्रीडा संकुलावर शुक्रवारपासून तीनदिवसीय जागतिक धम्म परिषदेला प्रारंभ होत आहे. या परिषदेचे सायंकाळी ६ वाजता उद्घाटन होणार असून, श्रीलंकेचे महानायका महाथेरो डॉ. वरकगोडा यांच्यासह देश-विदेशातून प्रमुख भिक्खू व उपासकांचे आगमन झाले आहे. परिषदेच्या निमित्ताने शहरातील प्रमुख रस्ते व चौक पंचशील ध्वजाने सजविले आहेत. पाहुण्यांच्या स्वागतासाठी शहरातील उपासक-उपासिकांनी जय्यत तयारी केली आहे.
१३ देशातून येणार भिक्खू ,विचारवंत
राज्याचे उद्योग सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि थायलंडच्या उद्योजिका रोजना व्हॅनिच कांबळे यांच्या पुढाकारातून ही परिषद होत आहे. या परिषदेसाठी जपान, थायलंड, नेपाळ, चीन, कोरिया, मलेशिया, श्रीलंका, जपान, भूतान, ब्रह्मदेशांसह विविध देशांतून भिक्खू व बुद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक येणार आहेत. विदेशातील किमान १५० भिक्खू व देशातील ३०० भिक्खू परिषदेला हजर राहतील. श्रीलंकेचे महानायका महाथेरो डॉ. वरकगोडा यांच्या हस्ते परिषदेचे शुक्रवारी उद्घाटन होईल. त्यावेळी १३ देशांतील प्रमुख भिक्खू, विचारवंत यांच्यासह १ लाखांहून अधिक उपासक उपासिका उपस्थित असतील.