पहिल्या राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 01:01 AM2017-09-12T01:01:21+5:302017-09-12T01:01:21+5:30

आधुनिक भांडवलदारांनी एनजीओच्या नावाखाली नवीन स्वतंत्र व्यवस्था तयार केली आहे. त्यामुळे श्रमिकांनी लिखाण आणि वाचनाची कास धरावी, असे आवाहन प्रख्यात साहित्यिक उत्तम कांबळे यांनी येथे केले.

 The concluding of the first state-level worker's literature meet | पहिल्या राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलनाचा समारोप

पहिल्या राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलनाचा समारोप

googlenewsNext

राजेश भिसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना (कॉ.प्रभाकर संझगिरी साहित्य नगरीतून) : श्रमिक आणि कामगार संघटित राहू नये. म्हणून त्यांचे विविध संघटनांमध्ये तुकडे करण्यात आले. व्यवस्थाच तशी तयार करण्यात आली आहे. आता तर आधुनिक भांडवलदारांनी एनजीओच्या नावाखाली नवीन स्वतंत्र व्यवस्था तयार केली आहे. त्यामुळे श्रमिकांनी लिखाण आणि वाचनाची कास धरावी, असे आवाहन प्रख्यात साहित्यिक उत्तम कांबळे यांनी येथे केले.
जालन्यात सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या (सीटू) वतीने कॉ. प्रभाकर संझगिरी साहित्य नगरीतील गौरी लंकेश सभागृहात सोमवारी आयोजित पहिल्या राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. विचारपीठावर विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, शेतमजूर युनियनचे कुमार शिराळकर, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, सीटूचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. डी.एल.कराड, शम्स जालनवी, किशोर घोरपडे स्वागताध्यक्ष साईनाथ पवार, कॉ. अण्णा सावंत यांच्यासह संघटनेचे राज्यातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते.
कांबळे म्हणाले की, गत तीन वर्षांत साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, इतिहास बदलण्याचा प्रयत्न होण्याच्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर श्रमिक साहित्य संमेलनाला खूप अर्थ प्राप्त होतो. आतापर्यंत दर सहा महिन्यांनी निषेध सभा, शोकसभा, मूक मोर्चा आदी काढणे सुरु होते. देशातील प्रतिष्ठित अशा जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सोमवारी पुरोगामी विचारांचा झालेला विजय ही समाधानाची बाब मानली पाहिजे. यातून एकच संदेश गेला आहे. तो म्हणजे सर्व पुरोगागी विचारांच्या संघटना व व्यक्तींनी एकत्र आले तरच धर्मांध शक्तींचा बीमोड शक्य आहे. १९९० नंतर भांडवलदारांनी श्रमिकांच्या श्रमावर चालणारी पृथ्वी कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर ‘मायग्रेट’ केली. नवीन भांडवलशाही ही कमीत कमी कामगारांत अधिकाधिक नफा कमावत आहे.
रावसाहेब कसबे म्हणाले की, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य वाचल्याशिवाय क्रांती करता येणार नाही. त्यामुळे श्रमिकांनी सर्वप्रथम वाचन वाढविण्याची गरज आहे. आपण का जगतो आहोत, हा प्रश्न श्रमिकांना आणि कामगारांना विचारला पाहिजे.
कुमार शिराळकर म्हणाले की, सांस्कृतिक बदलाची जबाबदारी ही आता श्रमिकांवर येऊन ठेपली असून, श्रमिकांकडे माणूस म्हणून पाहण्याची गरज आहे. कार्यक्रमात जालन्यातील प्रसिद्ध शायर शम्स जालन्वी आणि साहित्यिक किशोर घोरपडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. संमेलनास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

Web Title:  The concluding of the first state-level worker's literature meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.