सभापती, उपसभापतींच्या निवडी चुरशीच्या

By Admin | Published: September 14, 2014 11:51 PM2014-09-14T23:51:53+5:302014-09-15T00:02:44+5:30

जालना: जालना पंचायत समितीत शिवसेना भाजप युतीचे बहुमत नसतानाही मनसेच्या एका सदस्यास युतीत खेचून आणण्यास यश मिळाल्याने पंचायत समितीवर भगवा फडकला आहे.

Chairperson of Chairperson, Vice President | सभापती, उपसभापतींच्या निवडी चुरशीच्या

सभापती, उपसभापतींच्या निवडी चुरशीच्या

googlenewsNext

जालना: जालना पंचायत समितीत शिवसेना भाजप युतीचे बहुमत नसतानाही मनसेच्या एका सदस्यास युतीत खेचून आणण्यास यश मिळाल्याने पंचायत समितीवर भगवा फडकला आहे.
सभापतीपदी शिवसेनेच्या बाजीउम्रद गणातील द्रोपदाबाई मुरलीधर थेटे यांची तर उपसभापतीपदी भाजपाचे गणेश बाबासाहेब नरवडे यांची वर्णी लागली आहे.
जालना पंचायत समिती मध्ये एकून १६ सदस्य आहे. त्यात शिवसेनेचे ७, भाजप १, मनसे १, काँग्रेस ३, राष्ट्रवादी ३ व १ अपक्ष असे संख्या बळ आहेत. मागील निवड निवडणुकीत मनसे व अपक्ष सदस्य कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने होते. त्यावेळी संख्याबळ बरोबरीत गेल्याने सोडत पद्धतीने निवडणूक झाली होती. यावेळेस मात्र सेना - भाजपाने निवडणुकीपूर्वीच मनसेच्या सदस्याचा सेनेत प्रवेश करून घेतला. त्यामुळे सेना भाजप युतीचे संख्याबळ ९ झाले. काँग्रेस आघाडीचे ७ असे राहीले.
या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून ब्रम्हा वाघ यांनी सभापतीपदासाठी तर उपसभापतीपदासाठी सुमनबाई रतनराव कावळे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र २ मतांनी त्यांचा पराभव होवून सेनेच्या द्रोपदाबाई थेटे यांची सभापतीपदी तर भाजपचे गणेश नरवडे यांची उपसभापतीपदी विजय झाले.
यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रामेश्वर भांदरगे यांच्यासह शिवसेना व भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. विजयी उमेंदवारांचा खोतकर यांच्या निवासस्थांनी सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)
मंठा : मंठा पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या उर्मिलाताई सुरेशराव सरोदे यांची तर उपसभापतीपदी काँग्रेसचे संतोष पवार यांची निवड झाली.
मंठा पंचायत समितीमध्ये पिठासन अधिकारी तहसीलदार छाया पवार यांनी पं.स.सदस्यांची विशेष सभा घेतली. यावेळी सभापतीपदी उर्मिला सरोदे यांचा ७ मतांनी विजय झाला तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या रोहिणी घारे यांना ५ मते पडली. उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसकडून किसनराव मोरे यांना ५ मते पडली तर काँग्रेसचे संतोष पवार यांना ७ मते पडली. यावेळी सभापती-उपसभापती पदासाठी पं.स.सदस्य संतोष वरकड, प्रदीप बोराडे, धरती हनवते, उषाताई कदम, दिगंबर नानवटे यांनी सहकार्य केले. यावेळी गटविकास अधिकारी कल्पना उईके यांनी सहकार्य केले. या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे ५ ते काँग्रेसचे २ असे काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत असताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे यांनी खेळी करून पंचायत समिती सेनेच्या ताब्यात आणली. यावेळी सभापती, उपसभापतींचे शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे, बाजार समितीचे उपसभापती प्रल्हाद बोराडे, तालुकाप्रमुख प्रसाद बोराडे, सचिन बोराडे, राजेश मोरे आदींनी स्वागत केले. (वार्ताहर)
परतूर : परतूर पंचयात समितीच्या सभापतीपदी पुन्हा छाया माने यांची वर्णी लागली, तर उपसभापतीपदी तुकाराम बोनगे यांची बिनविरोध निवड झाली.
परतूर पंचायत समितीच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया रविवारी पार पडली. सभापती पदासाठी भाजपाच्या छाया माने व रा. कॉ. चे कपिल आकात यांचे अर्ज आले होते. यावर वर हात करून मतदान घेण्यात आले. माने यांना सहा तर आकात यांना चार मते पडली. सहा विरूध्द चार मतांनी माने यांनी विजय मिळवला. उपसभापती पदासाठी तुकाराम बोनगे व शिवाजी पाईकराव यांचे अर्ज आले होते. ऐनवेळी पाईकराव यांनी आपले नामांकनपत्र परत घेतल्याने बोनगे यांची बिनविरोध निवड झाली.(वार्ताहर)
भोकरदन : भोकरदन पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या संगीता परमेश्वर लोखंडे तर उपसभापतीपदी सेनेचे नवनाथ दौड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे़
पंचायत समितीच्या बचत भवन मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रुपा चित्रक यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.
यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे हे होते. सभापती पदासाठी पारध गणातील भाजपाच्या सदस्या परमेश्वर लोखंडे यांचा सभापतीपदासाठी तर उपसभापती पदासाठी आन्वा गणातील सेनेचे सदस्य नवनाथ दौड यांचेच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी चित्रक यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले़
भोकरदन पंचायत समितीमध्ये २० सदस्य आहेत. त्यापैकी भाजपा १० सेना २ व काँग्रेस राष्ट्रवादीचे ८ सदस्य आहेत. या निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अनुपस्थित होते. तर भाजपा सेनेचे मावळते सभापती लक्ष्मण मळेकर, उपसभापती रोहिणी हिवाळे, बेबीताई नामदेव काकडे, भगवान साबळे, आशाबाई साबळे, अरुण बनकर, शेमनुरबी इरफान पठाण, नवनाथ दौड, संगीता लोखंडे, संतोष सोनवणे असे १२ सदस्य उपस्थित होते़
सभापती व उपसभापती यांची निवड होताच त्यांच्या समर्थकांनी आतषबाजी करून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवास्थानापर्यंत विजयी मिरवणूक काढली होती़
पंचायत समिती कार्यालय व परिसरात तालुक्यातून राजकीय पदाधिकारी तसेच समर्थकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (वार्ताहर)
बदनापूर : बदनापूर पंसच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे अदनान हमीदोदीन व उपसभापतीपदी काँग्रेसचे संजय जगदाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या विशेष सभेत सभापती व उपसभापती या पदांसाठी अनुक्रमे अदनान हमीदोदीन व संजय जगदाळे या दोहोंचे एकेक अर्ज आल्यामुळे पिठासीन अधिकारी तहसीलदार बालाजी क्षीरसागर यांनी या दोघांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले. या विशेष सभेला अदनान हमीदोदीन, संजय जगदाळे मिलींद साळवे, रावसाहेब भवर, गजानन गिते, पार्वती मदन, सुनीता पांढरे आदी पंस सदस्य उपस्थित होते. तसेच यावेळी राकॉंच्या रेणुका कोल्हे ,मुक्ता बरंडे व काँग्रेसच्या यशोदाबाई नन्नवरे हे तीन पं.स. सदस्य उपस्थित नव्हते. ही निवड होताच बबलु चौधरी, सुभाष काटकर,रामदास बारगाजे, सुभाष बोडखे, जि.प. सदस्य बाबासाहेब सोनवणे, राजेंद्र जैस्वाल, कैलास मदन, पी. एन. वाळके, उध्दव जायभाये, निवृत्ती डाके, पांडुरंग जऱ्हाड, भगवान मदन, बाबासाहेब कऱ्हाळे, संजय जऱ्हाड, शेख फेरोज यांच्यासह काँग्रेस राकॉंचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणुन तहसिलदार बालाजी क्षीरसागर व सहायक म्हणून गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी यांनी काम पाहीले. या निवडणुकीत सभापतीपदासाठी व उपसभापती पदाकरिता इच्छुक असलेल्या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सदस्यांची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवली. (वार्ताहर)
अंबड : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या अंबड पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती गावडे यांची बिनविरोध निवड झाली तर उपसभापतीपदी मदनराव जायभाये यांची ११ विरूद्ध ५ मतांनी विजय झाला.
१४ सप्टेबर रोजी दुपारी ३ वाजता पंचायत समितीच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापतीपद इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव होते. या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ११, शिवसेनेचे चार, तर एक अपक्ष असे पक्षीय बलाबल असल्याने ही निवडणूक म्हणजे औपचारिकताच समजली जात होती. सभापती आणि उपसभापतीपद बिनविरोध होईल असे चित्र होते. मात्र सभापतीचीच निवडणूक बिनविरोध झाली. तर उपसभापतीपदासाठी मतदान झाले.
सकाळी ११ ते २ या वेळेत सभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या ज्योती गावडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीकडून मदनराव जायभाये व शिवसेनेकडून दिनेश काकडे , अशोक तारडे यांनी अर्ज दाखल केले. पैकी तारडे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने जायभाये व काकडे यांच्यात निवडणूक झाली. त््यात जायभाये यांना ११ मते तर काकडे यांना ५ मते मिळाली.
जायभाये यांना विजयी घोषित केले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार महेश सावंत यांनी काम पाहिले.
त्यांना गटविकास अधिकारी डि. के. पांडव, व्ही. के. गिते, एस. बी. घोडके, एल. जी. वाघमारे, आर. पी. व्यास, एच.एस. म्हस्के, भागवत देशमुख यांनी काम पाहिले.
निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती गावडे व उपसभापती जायभाये यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जि. प. गट नेते सतीश टोपे, बाजार समितीचे सभापती प्रकाश बोर्डे, उपसभापती भाऊसाहेब कनके आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)
जाफराबाद : जाफराबाद पंचायत समिती सभापतीपदी रमाबाई चंद्रकांत चौतमल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसभापती पदाकरीता शिवसेना सदस्यांमध्ये एकमत न झाल्याने अखेर उपसभापतीपद रिक्त ठेवण्यात आले. जाफराबाद पंचायत समितीमध्ये भाजपा ७, शिवसेना ३, काँग्रेस १, राष्ट्रवादी काँग्रेस १ असे पक्षीय बलाबल असताना सभापती पदाकरीता एकमेव अर्ज आल्याने भाजपाच्या रमाबाई चौतमल या बिनविरोध निवडून आल्या. मात्र, शिवसेनेच्या तिन्ही सदस्यांच्या भूमिका तळ्यात मळ्यात राहता पक्षाने देखील रामदास जगताप, रमेश गायकवाड यांना पत्र देवून सामस्याची भूमिका न घेता पक्षीय मतभेद चव्हाट्यावर आले.
शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी इच्छुक दोन्ही सदस्यांना व्हीप दिला. त्यानुसार दोघांनी या पदासाठी दावा सांगून उमेदवारी दाखल केली. परंतु कोणीच माघार घेत नाही. यावरून चांगलीच खडाजंगी होऊन अखेर दोघांनी आपली उमेदवारी मागे घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रमाबाई चौतमल यांच्या निवडीची घोषणा करून उपसभापतीपद रिक्त ठेवल्याचे जाहीर केले. शिवसेना पक्षाच्या या अजब निर्णयामुळे जाफराबाद पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी नोंद झाली. याची चर्चा मात्र, सभास्थळी सुरू असल्याचे दिसून आले.
सभापतीपदी राठोड तर उपसभापतीपदी राऊत
घनसावंगी : घनसावंगी पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे प्रेमसिंग खेमा राठोड तर उपसभापतीपदी डॉ.राजेश राऊत यांची बिनविरोध निवड झाली.
१४ सदस्य असलेल्या घनसावंगी पंचायत समितीमध्ये बहुमत हे सेनेला आहे. यामध्ये १२ सदस्य हे शिवसेनेचे आहेत. तर २ सदस्य हे राष्ट्रवादीचे आहेत. आज झालेल्या निवडीमध्ये शिवसेनचे १२ सदस्य उपस्थित होते तर राष्ट्रवादीचे महिला सदस्या अनुपस्थित होत्या. यावेळी मावळते सभापती मधुकर साळवे, उपसभापती रणजित उढाण, सोनिया मरकड, प्रल्हाद वऱ्हाडे, गंगुबाई इंगळे, प्रेमसिंग राठोड, डॉ.राजेश राऊत, वैशाली काजळे, अंबादास उढाण, कुंडलिक जाधव, मंगला रोकडे, गोडसे आदींची उपस्थिती होती. महिला सदस्यांना संधी न दिल्याने महिल्या सदस्यांमधून नाराजीचा सूर उमटला. निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार अभय चव्हाण यांनी काम पाहिले. दरम्यान, नवनिर्वाचित सभापती व उपसभातींचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. ठिक ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली. (वार्ताहर)
परतूर पंचयात समितीत सदस्य संख्या दहा आहे. या निवडणुकीत विद्यमान सभापती छाया माने यांच्या बाजूने पाच सदस्य होते. यांचा एक सदस्य तुकराम बोनगे भाजपाच्या गोटातून फुटून कपिल आकात यांच्या गोटात सामील झाले होते, मात्र आज मतदान प्रक्रियेच्या वेळी अचानक बोनगे हे पुन्हा स्वगृही परतले. त्यामुळे छाया माने यांचे संख्याबळ पाचवरून सहावर गेले, तर कपिल आकात यांच्याकडे चारच संख्याबळ राहीले व ही टॉसवरील निवडणूक पुन्हा मतदान प्रक्रियेत रूपांतरित झाली. एकूणच दिवसभर फोडाफोडीचे राजकारण सुरु होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी काम पाहिले. तर त्यांना गटविकास अधिकारी प्रमोद कुसेमेनीवार यांनी सहाय्य केले.

Web Title: Chairperson of Chairperson, Vice President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.