‘मतांचं विभाजन टाळा... भाजप-सेनेला पाडा’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 11:36 PM2019-02-07T23:36:50+5:302019-02-07T23:37:19+5:30

औरंगाबाद : ‘लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सुरू आहे. २८ फेब्रुवारी रोजी ही घोषणा होईल. त्यादृष्टीने कामाला ...

'Avoid voting division ... BJP-Senalea Padha' | ‘मतांचं विभाजन टाळा... भाजप-सेनेला पाडा’ 

‘मतांचं विभाजन टाळा... भाजप-सेनेला पाडा’ 

googlenewsNext
ठळक मुद्देअशोकराव चव्हाण : राजीव गांधी स्टेडियमवरील जाहीर सभेत आवाहन


औरंगाबाद : ‘लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सुरू आहे. २८ फेब्रुवारी रोजी ही घोषणा होईल. त्यादृष्टीने कामाला लागा. मतांचं विभाजन टाळा आणि भाजप- सेनेला पाडा,’ असे कळकळीचे आवाहन आज येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.
ते राजीव गांधी स्टेडयमवरील जाहीर सभेस संबोधित करीत होते. तब्बल अर्धा-पाऊण तासाच्या भाषणात चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारवर चौफेर टीका केली.
हात जोडून विनंती
भाषणाच्या शेवटी अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना उद्देशून ते म्हणाले की, ‘वंचित बहुजन आघाडीला माझी हात जोडून विनंती आहे की, भाजपला मदत होईल, असे काही करू नका. कृपया आपण सर्व जण एकोप्यानं राहूया. केवळ ३० टक्के मतांवर भाजपचं सरकार आलेलं आहे. उर्वरित ७० टक्के मते आता एकसंध राहिली पाहिजेत. मतांचं विभाजन टाळावं यासाठीच मी स्वत: प्रकाश आंबेडकर यांच्या घरी एकदा नव्हे, तर पाच वेळा गेलो. तशी जागावाटपाचीही फार मोठी गोष्ट नाही. स्वत: प्रकाश आंबेडकर हे खासदार बनावेत, ही आम्हा सर्वांचीच इच्छा आहे, असे त्यांनी जाहीरपणे नमूद केले.

काँग्रेस आरएसएसच्या बाजूचा कसा असू शकतो?

सभा संपल्यानंतर माध्यमांनी विचारले असता, अशोक चव्हाण यांनी सवाल उपस्थित केला की, काँग्रेस आरएसएसच्या बाजूचा कसा असू शकतो? काँग्रेस आरएसएसच्या विरोधात काल होता, आज आहे आणि उद्याही राहील. महात्मा गांधी यांच्या काळापासून काँग्रेसची आरएसएसविरोधी भूमिका स्पष्टपणे राहत आली आहे. त्यामुळे काँग्रेसची आरएसएसच्या संदर्भात लेचीपेची भूमिका असण्याचे कारणच नाही. उलट प्रकाश आंबेडकर यांच्यासह आरएसएसविरोधी सर्व शक्तींनी एकत्रित येण्याची आणि आरएसएसविरोधी लढा उभा करण्याची गरज आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या निरोपाची वाट पाहत आहोत. त्यांचा निरोप येत नसल्याने काँग्रेस- राष्टÑवादीचे उमेदवार जाहीर करावयाचे थांबले आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.

संविधान बचाव... देश बचाव अशी घोषणा यावेळी माजी खा. एकनाथ गायकवाड यांनी दिली. बाबा सिद्दीकी यांनी ‘हमने बिखर के खुदको तमाशा बना दिया’ अशी आठवण करून दिली. आ. सुभाष झांबड यांनी मनपाच्या कारभारावर सडकून टीका केली. नामदेव पवार यांचेही घणाघाती भाषण झाले. त्यांनी ‘भावी मुख्यमंत्री... अशोक चव्हाण’ आणि या राज्याचा मुख्यमंत्री कसा असावा... अशोक चव्हाणांसारखा’ अशी घोषणा उपस्थितांकडून वदवून घेतली. प्रारंभी अशोक चव्हाण यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. आज माता रमाई यांची जयंती असल्याने त्यांनाही अभिवादन करण्यात आले.
अशोक चव्हाण येण्यापूर्वी, मिलिंद पाटील, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा पानकडे, शहराध्यक्षा सरोज मसलगे पाटील, रेखा जैस्वाल, बाबा तायडे, डॉ. पवन डोंगरे, रवींद्र बनसोड, विलासबापू औताडे, इब्राहिम पठाण, केशवराव पा. तायडे आदींची भाषणे झाली. मंचावर माजी आमदार डॉ. कल्याण काळे, नितीन पाटील, प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सुनीता तायडे- निंबाळकर, सचिव मीनाक्षी बोर्डे- देशपांडे, मोटेभाभी, अशोक सायन्ना, नारायणअण्णा सुरगोणीवार आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
अब की बार... आपटी मार..
अबकी बार बस कर यार, अबकी बार काँग्रेस सरकार, अबकी बार आपटी मार, असे घोषवाक्य अशोकराव चव्हाण सादर करीत होते, तेव्हा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत होता. मराठवाडा पोरका झाला आहे. पालकमंत्री फक्त झेंडावंदनाच्या वेळेस येतात. एरव्ही मराठवाड्याच्या हालअपेष्टा बघायला कुणाजवळ वेळ नाही. मुख्यमंत्र्यांना तर अजिबात वेळ नाही. कारण ते क्रिकेट खेळण्यात आणि विरोधकांना कुत्रे- मांजरे अशी उपमा देण्यात दंग आहेत; पण हेच कुत्रे-मांजरे यांच्या गळ्याचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. लोकांना पाहिजेत चारा छावण्या आणि यांनी सुरू केल्या डान्सबार लावण्या या त्यांच्या वाक्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. मराठा आरक्षण ही काही सरकारची मेहरबानी नाही. त्यासाठी सकल मराठा समाजाला दबाव निर्माण करावा लागला. ५८ मोर्चे काढावे लागले; पण लागू झाले का मराठा आरक्षण? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Web Title: 'Avoid voting division ... BJP-Senalea Padha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.