औरंगाबाद मनपा आयुक्तांची स्वतंत्र टीम बांधणी सुरु; ११ अधिकाऱ्यांची लवकरच होणार नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 08:24 PM2018-06-15T20:24:17+5:302018-06-15T20:25:10+5:30

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शासकीय अधिकाऱ्यांची स्वतंत्र टीम बांधणी सुरू केली आहे.

Aurangabad Municipal Commissioner's independent team started; 11 officers will soon be appointed | औरंगाबाद मनपा आयुक्तांची स्वतंत्र टीम बांधणी सुरु; ११ अधिकाऱ्यांची लवकरच होणार नियुक्ती

औरंगाबाद मनपा आयुक्तांची स्वतंत्र टीम बांधणी सुरु; ११ अधिकाऱ्यांची लवकरच होणार नियुक्ती

googlenewsNext

औरंगाबाद : महापालिकेत कामे प्रचंड आहेत. वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करण्यासाठी तज्ज्ञ अधिकारीच नाहीत. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शासकीय अधिकाऱ्यांची स्वतंत्र टीम बांधणी सुरू केली आहे. मागील दोन ते तीन दिवसांमध्ये शासनाकडून अधिकारी येण्यास सुरुवात झाली आहे. एकूण ११ अधिकारी शासनाकडून महापालिकेत नियुक्त करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. आयुक्तांच्या या धोरणामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

मागील एक महिन्यापासून आयुक्त महापालिकेचा कारभार अत्यंत बारकाईने पाहत आहेत. सकाळी सांगितलेल्या आदेशाचे पालन सायंकाळपर्यंत होतच नाही. छोट्या-छोट्या कारणांसाठी फायलींवर नकारात्मक शेरे मारून फाईल या टेबलावरून त्या टेबलावर पळविण्यात येते. एकाच कामाशी निगडित दोन वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वय अजिबात नाही. दोन्ही विभागांमध्ये एक भिंत असली तरी अधिकारी, कर्मचारी एकमेकांचे तोंड पाहत नाहीत. अधिकाऱ्यांमधील अंतर्गत राजकारणही शिगेला पोहोचलेले आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या विकासकामांवर होत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. छोटी-मोठी समस्या परस्पर सोडविता येऊ शकते. मात्र, अधिकारी व कर्मचारी मिळून या समस्येचा मोठा स्फोट होईपर्यंत वाट पाहत असतात.

महापालिकेच्या कार्यशैलीचा अभ्यास करून आयुक्तांनी आपले वजन वापरून शासनाकडून अधिकारी आणण्यास सुरुवात केली. दोन दिवसांपूर्वीच उपायुक्त म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी मंजूषा मुथा यांची नियुक्ती करण्यात आली. कचरा प्रश्नात प्रतिनियुक्तीवर आलेले विक्रम मांडुरके यांना त्यांच्या स्वगृही म्हणजेच घनसावंगी नगर परिषदेत पाठविण्याचा निर्णय बुधवारी शासनाने घेतला. महापालिकेत सहायक आयुक्तपदी अंबड नगर परिषदेचे मुख्याधिकारी नंदकुमार भोंबे यांची नियुक्ती करण्यात आली.

कामकाजाला गती मिळेल
येणाऱ्या काही दिवसांत महापालिकेत एकूण ११ अधिकारी शासनाकडून प्रतिनियुक्तीवर येणार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने अधिकारी आल्यानंतर कामकाजाला गती मिळेल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Aurangabad Municipal Commissioner's independent team started; 11 officers will soon be appointed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.