पत्नीसोबतच्या मैत्रीचा राग, जुन्या मित्राचा खून निलंबित पोलिसानेच केल्याचे निष्पन्न

By सुमित डोळे | Published: March 23, 2024 01:54 PM2024-03-23T13:54:08+5:302024-03-23T13:55:44+5:30

साजापूर शिवारातील खुनाचा अखेर उलगडा, दोन महिन्यांपासून तयारी

anger over friendship with his wife, the suspended police officer killed the old friend small businessman in Waluj Area | पत्नीसोबतच्या मैत्रीचा राग, जुन्या मित्राचा खून निलंबित पोलिसानेच केल्याचे निष्पन्न

पत्नीसोबतच्या मैत्रीचा राग, जुन्या मित्राचा खून निलंबित पोलिसानेच केल्याचे निष्पन्न

छत्रपती संभाजीनगर : साजापूर शिवारात राहणाऱ्या लघुउद्योजक सचिन साहेबराव नरोडे (३७) यांची १७ मार्च रोजी डोक्यात पिस्तुलाद्वारे गोळी झाडून अज्ञातांनी हत्या केली. रात्री अंधारात झालेल्या या खुनात निलंबित पोलिस कर्मचारी रामेश्वर सीताराम काळे (३५) याने मित्र लक्ष्मण जगताप (२४) सोबत मिळून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. रामेश्वरला स्वत:च्या पत्नीसोबतची सचिनची मैत्री आवडत नव्हती. त्यातच तो दोनदा निलंबित झाला. या सगळ्यांसाठी त्याने सचिनला कारणीभूत ठरवले. आठ दिवसांपूर्वी पिस्तूल खरेदी करून अखेर रविवारी त्यांची हत्या केली.

सचिन सेवानिवृत्त मुख्याध्यापक वडील, आई, १२ वर्षांच्या मुलीसह साजापूरमध्ये राहत. कौटुंबिक मतभेदांमुळे २०१९ मध्ये त्यांचा पत्नीसोबत घटस्फोट झाला.

नेमका कशाचा राग होता?
वैजापूर पोलिस विभागात कार्यरत रामेश्वर व सचिन २०१३ पासून मित्र होते. २०१४ मध्ये रामेश्वरचे लग्न झाले. त्याची पत्नीदेखील पोलिस दलात आहे. मात्र, रामेश्वरने स्वत:चे लग्न लपवून दुसऱ्या मुलीसोबत प्रेमाचे नाटक केले. तिच्या घरी धिंगाणा घातल्याने त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.
-रामेश्वरच्या वागण्यामुळे २०१८ मध्ये त्याची पत्नी त्याच्यापासून वेगळी झाली. त्यात सचिनसोबतच्या मैत्रीतही वितुष्ट आले.
-२०२२ मध्ये तो वाळूच्या हप्तेखोरीत निलंबित झाला. त्यानंतर काही महिन्यांमध्येच पुन्हा रामेश्वर लाच प्रकरणात अडकल्याने दुसऱ्यांदा निलंबित झाला व तणावात गेला.

व्हॉट्सॲपवर धमक्या, संपवण्याचे स्टेटस
या सर्व घटनाक्रमांमुळे रामेश्वर तणावात होता. सचिन व त्याच्या पत्नीच्या मैत्रीमुळेही रामेश्वरच्या मनात राग होता. पत्नीने त्याला सगळीकडून ब्लॉक केले होते. काही दिवसांपासून रामेश्वरने व्हॉट्सॲपच्या फॅमिली ग्रुपमध्ये पत्नीला धमकावणे सुरू केले होते. 'सहन करणार नाही', 'बदला घेणार' असे स्टेटस ठेवायचा. गावातीलच कर्जबाजारी लक्ष्मणसाेबत रामेश्वरने मैत्री केली. त्याचे दीड लाखाचे कर्ज फेडले. स्वत:च्याच घरी राहायला जागा देत विश्वास जिंकला. सचिनने कसे फसवले, हे त्याला पटवून दिले.

नित्यक्रम समजून घेतला...
महिनाभरापूर्वी त्याने सचिनची चारचाकी जाळून टाकली. ती कोणी जाळली, हे सचिनलादेखील माहीत होते. मात्र, त्याने पोलिसांना सांगितले नाही. लक्ष्मणमार्फत त्याने सचिनचा दिनक्रम समजून घेतला. पंधरा दिवसांपासून चाकू, गज घेऊन दोघे त्याच्या घराजवळ फिरायचे. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. आठ दिवसांपूर्वी त्याने पिस्तूल मिळवून सचिनच्या मागून मानेवर पिस्तूल ठेवत गोळी झाडली. गोळी सचिनच्या कपाळापर्यंत येऊन अडकली होती.

व्हॉट्सॲपवरील धमक्यातून हेतू स्पष्ट
गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक संदीप गुरमे, सहायक निरीक्षक सुधीर वाघ, विनायक शेळके, काशीनाथ महांडुळे, उपनिरीक्षक विशाल बोडखे, प्रवीण वाघ यांनी रविवारीच तपास सुरू केला. सचिनच्या वडिलांकडून त्यांना रामेश्वर, त्याची पत्नी व सचिनमधील वाद कळाले. सोमवारी सायंकाळी त्यांनी रामेश्वरला ताब्यात घेतले. सलग तीन दिवस चौकशी केली. घटनाक्रम, सबळ पुरावे मिळवले. व्हॉट्सॲपवरील धमक्यातून त्याचा हेतू स्पष्ट झाला. पोलिसांना दुसरीकडे लक्ष्मणचा धागा मिळाला होता. गुरुवारी ताब्यात घेताच त्याने हत्येची कबुली दिली.

Web Title: anger over friendship with his wife, the suspended police officer killed the old friend small businessman in Waluj Area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.