ऐतिहासिक वारसा केंद्रस्थानी, छत्रपती संभाजीनगरच्या नवीन विकास आराखड्यात ६६८ आरक्षणे

By मुजीब देवणीकर | Published: March 8, 2024 12:47 PM2024-03-08T12:47:16+5:302024-03-08T12:55:58+5:30

महापालिकेच्या नगररचना विभागात गुरुवारी सायंकाळी नवीन विकास आराखड्याचे नकाशे प्रसिद्ध केल्यानंतर नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती.

668 reservations in the new development plan of Chhatrapati Sambhajinagar | ऐतिहासिक वारसा केंद्रस्थानी, छत्रपती संभाजीनगरच्या नवीन विकास आराखड्यात ६६८ आरक्षणे

ऐतिहासिक वारसा केंद्रस्थानी, छत्रपती संभाजीनगरच्या नवीन विकास आराखड्यात ६६८ आरक्षणे

छत्रपती संभाजीनगर : मागील अनेक वर्षांपासून रखडलेला शहराचा विकास आराखडा गुरुवारी सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आला. महापालिकेच्या नगररचना विभागात आराखडा बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यापूर्वीच सोशल मीडियावर आराखडा प्रसिद्ध झाला होता. आराखड्यात एकूण ६६८ आरक्षणे टाकण्यात आली आहेत. २०४७ पर्यंतची लोकसंख्या, मनपा हद्दीतील भूवापर लक्षात ठेवून आराखड्यात अनेक सोयी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.

नगरपरिषद, महापालिका अस्तित्वात आल्यानंतर जुन्या शहराचा विकास आराखडा तयार केला. त्यानंतर वाढीव हद्दीसाठी वेगळा विकास आराखडा अंमलात आला. शहर जसे जसे वाढू लागले, आसपासचे १८ खेडी, सिडको-हडको, सातारा-देवळाईचा मनपा हद्दीत समावेश करण्यात आला. राज्य शासनाने शहराचा जुना आणि नवीन विकास आराखडा एकत्र तयार करावा. त्यात वाढीव हद्दीचा समावेश करावा, असे आदेश दिले. त्यानुसार मनपात डीपी युनिट शासनाने स्थापन केले. रजा खान यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जमीन वापर नकाशा तयार केला. त्यानंतर खंडपीठाच्या आदेशानुसार शासनाने बृहनमुंबई महापालिकेचे उपसंचालक श्रीकांत देशमुख यांची नेमणूक केली. मागील काही महिन्यात देशमुख यांनी विकास आराखडा तयार केला. प्रशासक जी. श्रीकांत यांना बुधवारी आराखडा सादर केला. गुरुवारी सायंकाळी नगररचना विभागात आराखडा नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला. सकाळपासूनच नागरिकांनी आराखडा पाहण्यासाठी गर्दी केली हाेती. दुपारनंतर सोशल मीडियावर आराखड्याचे नकाशे फॉरवर्ड होत होते.

शहर १७८.३० स्क्वेअर किमी
महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या विविध वसाहती गृहीत धरले तर १७८.३० स्क्वेअर किमी परिसर आहे. एवढ्या मोठ्या परिसरात नागरिकांसाठी ६६८ आरक्षणे टाकण्यात आली आहेत.

२०४२ पर्यंतची लोकसंख्या
२०३७ पर्यंत शहरातील २२ लाख नागरिकांसाठी कोणत्या सोयी सुविधा लागू शकतात, हे गृहीत धरून नकाशा तयार केला आहे. त्याचप्रमाणे २०४७ पर्यंतची लोकसंख्या २७ लाख होईल, त्यासाठी भूवापर किती राहील, याचा अंदाज बांधून नकाशात सोयी सुविधा दिल्याचे सूत्रांनी नमूद केले.

शहराचे ऐतिहासिक महत्त्व
शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हा वारसा डोळ्यासमोर ठेवून विकास आराखड्यात अनेक नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वीच्या विकास आराखड्यांमध्ये त्याचा अभाव होता.

Web Title: 668 reservations in the new development plan of Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.