इंटरनेट सेवा ५ तास बंद राहिल्याने बाजारपेठेत १० कोटींचे डिजिटल व्यवहार ठप्प

By प्रशांत तेलवाडकर | Published: February 27, 2024 04:45 PM2024-02-27T16:45:58+5:302024-02-27T16:47:04+5:30

बाजारपेठेत प्रत्येक हातगाडी ते मॉलपर्यंत सर्वत्र डिजिटल व्यवहारासाठी ‘क्यूआरकोड’ लावण्यात आले आहेत.

10 crore digital transactions in the market stalled due to internet services being shut down for 5 hours | इंटरनेट सेवा ५ तास बंद राहिल्याने बाजारपेठेत १० कोटींचे डिजिटल व्यवहार ठप्प

इंटरनेट सेवा ५ तास बंद राहिल्याने बाजारपेठेत १० कोटींचे डिजिटल व्यवहार ठप्प

छत्रपती संभाजीनगर : अफवांचा बाजार पसरू नये यासाठी सोमवारी प्रशासनाने खबरदारी म्हणून इंटरनेट सेवा बंद केली होती. याचा सर्वात मोठा फटका बाजारपेठेतील डिजिटल व्यवहाराला बसला. हातगाडी असो वा मॉल; सर्वत्र डिजिटल पेमेंटसाठी ‘युपीआय’चा वापर होत असतो. सोमवारी ६ तास इंटरनेट बंद राहिल्याने सुमारे १० कोटींचे डिजिटल व्यवहार ठप्प झाले.

दररोज ५ लाख वेळा होतात क्यूआरकोड स्कॅन
बाजारपेठेत प्रत्येक हातगाडी ते मॉलपर्यंत सर्वत्र डिजिटल व्यवहारासाठी ‘क्यूआरकोड’ लावण्यात आले आहेत. पेमेंट ॲप कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात स्मार्ट मोबाइलवरून दररोज ५ लाख वेळा क्यूआरकोड स्कॅन करून डिजिटल व्यवहार केले जातात. त्यात सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेदरम्यान २ लाख वेळा क्यूआरकोड स्कॅन होतात. नेमके याच वेळात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्याने तेवढे व्यवहार होऊ शकले नाहीत.

१० कोटींच्या डिजिटल व्यवहारावर परिणाम
दुपारी ६ तास इंटरनेट सेवा बंद राहिल्याने या दरम्यान दररोज होणारे १० कोटींचे डिजिटल व्यवहार झाले नाहीत. तसेच दररोज २० ते २५ कोटींदरम्यान शहरात डिजिटल पेमेंट होत असतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

डिजिटल पेमेंट सेवा बंद आणि खिशात दमडी नाही...
डिजिटल पेमेंट सेवा अचानक बंद पडली. आणि खिशात दमडी नाही, ही कल्पना करवत नाही. पण शहरवासीयांनी याची अनुभूती घेतली. सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेदरम्यान ६ तास इंटरनेट बंद राहिल्याने डिजिटल पेमेंट करणाऱ्या ‘स्मार्ट’ नागरिकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. अनेकांनी पेट्रोल पंपावर वाहनात पेट्रोल भरले आणि नंतर डिजिटल पेमेंटसाठी क्यूआर कोड स्कॅन झाले नाही. काही जणांकडे पाकिटात नोटा होत्या म्हणून निभावले, पण ज्यांचा खिसा रिकामा होता, त्यांची फजिती झाली. किराणा दुकानदार ओळखीचा असल्याने काहींना उधारी करावी लागली.

बँकेचे व्यवहार सुरळीत, एटीएममध्ये खडखडाट
इंटरनेट सेवा बंद असली तरी सर्वच बँकांकडे पर्यायी व्यवस्था असल्याने बँकेच्या कामकाजावर परिणाम जाणवला नाही. पण एटीएममध्ये रोख रक्कम काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यामुळे दुपारी २ वाजेनंतर काही एटीएममध्ये खडखडाट निर्माण झाला होता. यामुळे एका एटीएमवरून दुसऱ्या एटीएमपर्यंत नागरिकांना धावाधाव करावी लागली.

Web Title: 10 crore digital transactions in the market stalled due to internet services being shut down for 5 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.