हिरावला तोंडचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 11:56 PM2017-12-06T23:56:26+5:302017-12-06T23:56:56+5:30

बोंडअळी आणि तुडतुडा या रोगाने शेतकऱ्यांना पार उद्ध्वस्त करून टाकले आहे. वातावरण बदलामुळे कधी नव्हे एवढा प्रकोप या रोगाने यंदा केला.

Weed grass | हिरावला तोंडचा घास

हिरावला तोंडचा घास

Next
ठळक मुद्देकृषी विभागाचे सर्वेक्षण पूर्ण : ९० टक्के पीक बाधित

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : बोंडअळी आणि तुडतुडा या रोगाने शेतकऱ्यांना पार उद्ध्वस्त करून टाकले आहे. वातावरण बदलामुळे कधी नव्हे एवढा प्रकोप या रोगाने यंदा केला. एक लाख ८२ हजार हेक्टरवरील कापसापैकी तब्बल एक लाख १० हजार ६२१ हेक्टरवरील पीक बोंडअळीने खावून टाकली तर एक लाख ५१ हजार ६५५ हेक्टरवरील धानपिकापैकी एक लाख पाच हजार ५० हेक्टरवरील पीक तुडतुड्याने उद्ध्वस्त केले. अगदी तोंडात आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी मरणासन्न अवस्थेत पोहचला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी ऋतुचक्राने आपली नियमितता आणि सातत्य कायम राखले नाही. कोणत्याही ऋतुने आपले गुणधर्म दाखविले नाही. वातावरणाच्या या बदलाचा कृषी क्षेत्राला यंदा चांगलाच फटका बसला. यावर्षी जिल्ह्यात एक लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली. तर एक लाख ५१ हजार ६५५ हेक्टर क्षेत्रावर धानपीक लावण्यात आले. दोन्ही पिके प्रारंभी चांगले होते. पावसाचे प्रमाण कमी असले तरी शेतकºयांनी पिकांची चांगली काळजी घेतली होती. त्यामुळे पिकांची वाढ भराभर झाली. मात्र सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात अचानक कापसावर बोंडअळीने आणि धानावर तपकिरी तुडतुडा या रोगांनी आक्रमण केले. प्रकोप एवढा मोठा होता की जवळजवळ ९० टक्के लागवड क्षेत्र या रोगामुळे बाधित झाले. तब्बल एक लाख १० हजार ६२१ हेक्टर क्षेत्रावरील कापूस बोंडअळीमुळे उद्ध्वस्त झाला. दुसरीकडे तुडतुड्याने एक लाख पाच हजार ५० हेक्टर क्षेत्रावरील धानपिकाची तणस करून टाकली.
दीड लाखांवर धान उत्पादकांना फटका
जिल्ह्यातील मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर, पोंभुर्णा, गोंडपिपरी हा धान पट्टा मानला जातो. या पट्टयातील संपूर्ण शेती तुडतुड्याने बाधित करून टाकली आहे. कृषी विभागाच्या सर्व्हेक्षणानुसार तब्बल एक लाख ६५ हजार ५९७ शेतकºयांना तुडतुड्यामुळे जबर फटका बसला आहे.
तीन हजार १३७ कापूस उत्पादकांचे नुकसान
जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, वरोरा, भद्रावती, जिवती या तालुक्यात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या तालुक्यांमधील तब्बल तीन हजार १३७ शेतकºयांच्या पिकांवर बोंडअळीचा प्रकोप सर्व्हेक्षणात दिसून आला.
आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आघात
बोंडअळी आणि तुडतुडा हे पिकांवरील रोग जिल्ह्यासाठी नवीन नाही. या दोन्ही रोगांचे यापूर्वीही पिकांवर आक्रमण झाले आहे. मात्र यावर्षी तब्बल ९० टक्के कृषी क्षेत्र या रोगांनी व्यापले आहे. मागील दहा वर्षांत या रोगांनी एवढे नुकसान कधीच केले नव्हते. आतापर्यंतचा हा सर्वाधिक मोठा प्रकोप असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.
वातावरणातील बदल कारणीभूत
बोंडअळी आणि तुडतुडा हे रोग एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढण्यास वातावरणातील बदल कारणीभूत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. यावर्षी पावसाळ्यात पाऊस नव्हता. कधी उन्हाळ्यासारखे वातावरण होते. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात दमट वातावरण तयार झाले होते. हे वातावरण या अळ्यांना पोषक असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

यावर्षी बोंडअळी आणि तुडतुड्याने चांगलाच प्रकोप केला आहे. कृषी विभागाने रोगग्रस्त पिकांचे सर्व्हेक्षण केले आहे. यासबंधीचा अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे.
- ए.आर. हसनाबादे,
जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी

Web Title: Weed grass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.