नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:58 PM2018-01-19T23:58:23+5:302018-01-19T23:59:45+5:30

Report to the District Collector's Collector | नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

googlenewsNext
ठळक मुद्देस्थायी समिती सभापतींना घेराव : निधी वाटप प्रकरण आणखी चिघळले

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : मनपाच्या नगरोत्थान व दलित वस्ती सुधार योजनेंतर्गतचा निधी वाटपाचा वाद आता आणखी चिघळत चालला आहे. मतदारांना सामोरे जाण्यासाठी प्रभागात या निधीतून विकासकामे करणे आवश्यक असल्याने अनेक नगरसेवक आपल्या प्रभागासाठी निधी मिळावा म्हणून पाठपुरावा करीत आहेत. मात्र पदाधिकाºयांनी सर्व निधी आपल्याच प्रभागात वळता केल्याने विरोधकांसह भाजपाचेही नगरसेवक संतापले आहे. स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे यांना या नगरसेवकांनी शुक्रवारी घेराव घातला. त्यानंतर थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करीत न्याय निवाडा करण्याची मागणी केली.
मनपात भाजपात स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे आतापर्यंत विरोधकांचा फारसा आक्रोश कधी दिसून आला नाही. मात्र आता विकासनिधी वाटपावरून विरोधकांसह भाजपाचे काही नगरसेवकही संतापले आहेत. शहरातील विविध प्रभागाच्या विकासासाठी शासनाकडून नगरोत्थान व दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत निधी दिला जातो. २०१७-१८ या वर्षासाठीदेखील शासनाकडून मनपाला नगरोत्थान व दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र हा निधी वाटप करताना मनपाच्या सत्तारुढ पदाधिकाºयांनी भेदभाव केल्याचा आरोप आहे. शहरातील अनेक प्रभागातील वस्त्यांमधील अनेक कामे प्रलंबित आहे. तेथील नागरिकांच्या समस्या अजूनही कायम आहेत. मात्र २०१७-१८ मध्येही या वस्त्यांच्या विकासासाठी निधी देण्यात आलेला नाही. मनपा पदाधिकाºयांच्या या सापत्न वागणुकीमुळे विरोधकांसह सत्ताधारी भाजपाच्याही काही नगरसेवकांमध्ये सध्या तीव्र नाराजी पसरली आहे.
दरम्यान, नगरसेवकांच्या या नाराजीचे पडसाद सोमवारी मनपा कार्यालयात दिसून आले. बसपा, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस व सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी महापालिकेत उपमहापौर अनिल फुलझेले यांच्यासमोर आपली नाराजी व्यक्त करीत निधी वाटपात भेदभाव करू नये, अशा मागणीचे निवेदन दिले.
त्यानंतर मनपामधील नगरसेवकांच्या कक्षामध्ये सर्व नगरसेवकांनी बैठक घेतली व जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करण्याचे ठरविले. ठरल्याप्रमाणे सर्व विरोधक तसेच सत्ताधारी पक्षाचे समर्थक शुक्रवारी एकत्र आले. सर्व नगरसेवकांनी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्याकडे तक्रार केली. नगरसेवक जिल्हाधिकारी कार्यालयात आले असताना स्थायी समिती सभापती राहुल पावडेसुध्दा तेथे आले. ही संधी साधून नगरसेवकांनी त्यांना घेराव घातला. त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. सरतेशेवटी बैठक घेऊन चर्चा करण्याचे तसेच झालेला अन्याय दूर करण्याचे आश्वासन देऊन सभापतींनी स्वत:ची सुटका करून घेतली. यावेळी शिवसेना गटनेते सुरेश पचारे, बसपा गटनेते अनिल रामटेके, शहर विकास आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख,नगरसेवक सचिन भोयर, झोन सभापती रंजना यादव, नगरसेविका पुष्पा मून, संगिता भोयर, धनराज सावरकर, प्रदीप डे, पितांबर कश्यप, अमजद अली, राजलक्ष्मी कारंगल आदी नगरसेवक उपस्थित होते.
काँग्रेस नगरसेवकांची चुप्पी
नगरोत्थान व दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत आलेल्या निधीच्या वाटपावरून नगरसेवकांमध्ये वादंग उठले आहे. सत्ताधारी भाजपा नगरसेवकांसह जवळजवळ सर्वच विरोधक संतापले आहे. प्रत्येकजण आपला संताप बाहेर काढत आहे. मात्र काँग्रेस नगरसेवकांमध्ये या प्रकरणावरून अद्याप कुठल्याही हालचाली दिसून आल्या नाही. काँग्रेस नगरसेवकांच्या प्रभागात हा निधी मिळाला की त्यांना तो नको आहे, हेच कळायला मार्ग नाही. मात्र सर्वच नगरसेवक ओरड करीत असताना काँग्रेस नगरसेवक याबाबत गप्प का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Report to the District Collector's Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.