चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा प्रकरणी धोटे बंधूंना तीन दिवसांचा पीसीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 08:32 PM2019-05-21T20:32:06+5:302019-05-21T20:35:24+5:30

राजुरा येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी उशिरा धोटे बंधूंना मंगळवारी दुपारी ३.३० वाजता राजुरा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २४ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

In the Rajura case in Chandrapur district, three-day PCR to the Dhoate brothers | चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा प्रकरणी धोटे बंधूंना तीन दिवसांचा पीसीआर

चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा प्रकरणी धोटे बंधूंना तीन दिवसांचा पीसीआर

Next
ठळक मुद्देप्राचार्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनीची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राजुरा येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरण, त्यानंतर पीडित मुलींच्या तक्रारींबाबत केलेल्या वादग्रस्त विधान प्रकरणाचा ससेमिरा सुरू असतानाच नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून संस्थापक तथा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे व संस्थाचालक तथा राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे व प्राचार्य गुरुराज कुलकर्णी यांच्यासह सहा जणांविरुद्ध राजुरा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. सोमवारी रात्री उशिरा धोटे बंधूंना पोलिसांनी अटकही केली. त्यांना मंगळवारी दुपारी ३.३० वाजता राजुरा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २४ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
राजुरा येथील एका नर्सिंग स्कूलमध्ये एएनएम या अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे याबाबतची तक्रार केली होती. या आधारे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मदतीने तक्रार निवारण केंद्राच्या महिला पोलीस निरीक्षक प्रियंका बोबडे यांच्यासोबत पीडिताने राजुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी राजुराचे पोलीस निरीक्षक बाळू गायगोले यांनी नर्सिंग स्कूलचे प्राचार्य गुरुराज कुलकर्णी, सुभाष धोटे व अरुण धोटे, सुभाष धोटे यांचा चालक, छबन पचारे व वाचमन या सहा जणांविरुद्ध भादंविच्या ३५४, ३५४(अ), ३५४(ड ), ५०४, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुभाष धोटे व त्यांचे धाकटे बंधू अरुण धोटे यांना रात्री उशिरा पोलीस ठाण्यात बयाणासाठी बोलावून अटक केली. धोटे बंधूंना रात्रभर बल्लारपूर पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले होते.
पोलीस सूत्रानुसार, पीडित विद्यार्थिनी ही राजुरा येथील एका नर्सिंग स्कूलमध्ये दोन वर्षांपासून शिकत होती. दरम्यान, स्कूलचे प्राचार्य गुरूराज कुलकर्णी हे वारंवार नाहक अश्लील भाषेत तिचा छळ करायचे. ही बाब असह्य झाल्याने पीडिताने याबाबत संस्थाचालक सुभाष धोटे यांच्याकडे वारंवार तक्रार केली. याकडे मात्र त्यांनी कायम दुर्लक्ष केले. अशातच २९ आॅक्टोबर २०१८ रोजी रात्री वसतिगृहाच्या प्रांगणात प्राचार्य व इतर दोन जणांनी पीडितेसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. अखेर पीडिताने भावाला बोलावून ३० आॅक्टोबर २०१८ रोजी राजुरा पोलीस ठाणे गाठले. तक्रार नोंदविणे सुरू असतानाच संस्थाचालक अरुण धोटे यांनी ठाण्यातून जबरदस्तीने उठवून सुभाष धोटे यांच्या घरी नेले. तिथे पीडिताला व तिच्या भावाला जीवे मारण्याची तसेच शैक्षणिक रेकॉर्ड खराब करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे.

तक्रारीत नमुद घटनेच्या दुसऱ्याच दिवशी वसतिगृहातून काढून टाकण्यात आले. इतकेच नव्हे, तर वारंवार या ना त्या कारणाने त्रास देणे सुरुच होते. शैक्षणिक वर्ष खराब होऊ नये म्हणून राजुऱ्यात किरायाची खोली घेऊन राहायला लागले. राजुरा वसतिगृह अत्याचार प्रकरण घडल्यानंतर पाठलाग करणे, खोलीवर पाळत असल्याचे लक्षातच येताच ती खोली सोडली. आपले शैक्षणिक नुकसान होत असल्याने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली.
- पीडित विद्यार्थिनी.

धोटे बंधूंचे राजकीय भवितव्य धोक्यात
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावार एका रात्रीतून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी माजी आमदार सुभाष धोटे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवत लोकसभेची धुरा दिली. काँग्रेस उमेदवारावरून त्यांच्या नेतृत्त्वावर टीका झाली. निवडणुकीचे मतदान होण्यापूर्वीच त्यांच्या संस्थेच्या वसतिगृहातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात पोहचून होती. मतदान होताच हे प्रकरण उजेडात आले. यानंतर या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी राजुºयासह जिल्हाभरात मोर्चे, निदर्शने सुरू झाली. प्रकरण राज्य पातळीवर तापत असतानाच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पीडितांच्या तक्रारींबाबत वाद्रस्त विधान केले. पुन्हा त्यांच्याविरोधात रोष व्यक्त होऊ लागला. अखेर चंद्रपूर येथील रामनगर पोलीस ठाण्यात त्यांच्यासह इतरांविरुद्ध अ‍ॅट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात त्यांना अंतरिम जामीन मिळत नाही तोच नर्सिंगच्या विद्यार्थिनीने विनयभंगाची तक्रार केली. इतकेच नव्हे, तर यात त्यांना अटकही झाली. यामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीतच मिळाले आहे. या एकंदर घटनाक्रमांमुळे धोटे बंधूंचे राजकीय भवितव्यच धोक्यात आल्याचा सूर उमटत आहे.

Web Title: In the Rajura case in Chandrapur district, three-day PCR to the Dhoate brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.