अनेक वर्षानंतर झडीचा पाऊस

By admin | Published: July 13, 2016 01:51 AM2016-07-13T01:51:22+5:302016-07-13T01:51:22+5:30

१९३४ ला संततधार पावसाने चांगले दहा दिवस लोकांना झोडपून काढले होते. वर्धा नदीला महापूर आला.

Rainfall after several years | अनेक वर्षानंतर झडीचा पाऊस

अनेक वर्षानंतर झडीचा पाऊस

Next

१९५९ ची झड आणि वर्धा नदीचा महापूर : ज्येष्ठ मंडळी हरवली जुन्या आठवणीत
१९३४ ला संततधार पावसाने चांगले दहा दिवस लोकांना झोडपून काढले होते. वर्धा नदीला महापूर आला. त्याकाळी बल्लारपूर खूपच लहान गाव होते. वर्धा नदी काठचा १३५० पासून उभा असलेल्या किल्ल्याच्या आवारात पुराचे पाणी घुसले होते. वर्धा नदीला येवून मिळालेल्या ईरई नदीच्या पुराचे पाणी चंद्रपुरात घुसले होते. तो मोठा पूर ! त्यानंतर लक्षात राहाव असा मोठा पूर १९५९ ला आला. त्यावर्षी आॅगस्टच्या महिन्यात सतत दहा-बारा दिवस जराही विश्रांती न घेता पाऊस वादळी वाऱ्यासह बरसत राहिला. परिणाम मोठा भयंकर पूर आला.
येथील रेल्वे गोल पुलाच्या खुल्या निमुळत्या टोकापर्यंत पुराचे पाणी चढले होते. (ती पातळी गोल पुलावर लाल पांढऱ्या रंगात आजही रेखांकित करून आहे) किल्ला वार्डा नजिकच्या सिद्धार्थ वॉर्डातील सर्वच घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने घराचे नुकसान झाले होते. कॉलरी भागात घुग्घुस फाइल वॉर्डातील घरांमध्ये, क्वार्टर आणि कॉलरी परिसरात पुराने थैमान घातले होते. गणेशोत्सवात ही परत झड झाली होती.
पुरामुळे गणेश भक्तांना मूर्तीचे विसर्जन रस्त्यावर घरांनजिक करावे लागले. नदी पलिकडील कोलगावला पुराने चारही बाजूनी वेढा घातला होता. जी काही घरं शिल्लक होती, त्यात लोकांनी आश्रय घेतला होता. पाच दिवस झाले तरी पूर उतरायला तयार नव्हता. तो उतरावा याकरिता लोकांनी पूराच्या पाण्यात दिवे सोडणे, नारळ फोडणे असले प्रकार सुरू केले होते.
चंद्रपूरला तर याहून बिकट स्थिती या पुराने आणली होती. विठ्ठल मंदिर वॉर्ड, श्री टॉकीज, गोल बाजार या भागात पुराचे पाणी घुसले होते. १९६७-६८ या दोन वर्षात पाऊस झडीने मोठे चार पूर आणले होते. रेल्वे पुलाजवळ पुरात बुडून एका युवकाचा मृत्यू झाला होता. सन १९८४-८५ मध्ये आलेला पूर व झड आठवणीत राहावे असे होते. भूमिगत कोळसा खाणीत नदी लगतच्या भागात बोगदा पडून पुराचे पाणी खाणीत शिरले. यामुळे आलेला पूर एवढ्या झपाट्याने उतरायला लागला की, हे काय होत आहे, या आश्चर्याने सारे अवाक झाले होते.
सर्वे विभागाचे पाच कर्मचारी आत उतरले होते. ते मात्र वेळेच्या आधीच बाहेर आल्याने बचावले. १९५५-५६ पर्यंत बल्लारपूरच्या रोडची स्थिती अत्यंत वाईट होती. गिट्टी उखडलेली, माती साचलेली, गावात शेतकरी बरेच होते. त्यांची गुरं, घरोघरी गाय, म्हशी, शेळ्या आणि गावात डुकरांचा मोठ्या प्रमाणात वावर. या साऱ्याचे शेण, घाण रस्त्यावर. पावसाची रिपरिप वा झड असली की रस्त्याने चालताना वैताग यायचा... पण, लोकांमध्ये संयम मोठा! तेही दिवस काढले.
झड पावसात एक मजा असायची. थंड वारा, पावसामुळे कामं बंद. मग, फुरसतीचा क्षण, शेकोट्या लावून त्या भोवती शेकत बसायचे. गप्पा गोष्टी आणि गरमागरम ज्वारीच्या लाह्या, फुटाणे आणि सुकलेले मोहफुल भाजून त्यावर ताव मारायचा. जोडीला डिकासन चहा. जेवढे दिवस झड तेवढे दिवस हा क्रम चालत असायचा. शाळांना सुट्टी, विद्यार्थ्यांची मजा असायची. झडीच्या दिवसात चहा टपरीवर फुल्ल गर्दी असायची.
त्याकाळी घर कौलारु असत. कवलातून घरात पाऊस गळायचा. ते पसरुन घरात ओलेपणा राहू नये म्हणून टपकणाऱ्या ठिकाणावर ठेवा गंज, गडवे, ताट असे व्हायचे. हे झाले शहर- गावकडचे. खेड्यातही कमी-अधिक प्रमाणात तिच स्थिती असायची. म्हणजे, शेणमिश्रीत चिखल, गाई गोठ्यात माशांची घो घोऽऽ शेती मशागतीची कामे याच दिवसात असत.
विशेषत: धान रोवणीचे काम. बांध्यात पाणी, चिखल आणि त्यात उभे राहून धान पऱ्हे लावायचे. वरुन पावसाची झड, त्याला न जुमानता, तक्रार न करता, शेतमजूर उत्साहाने धान रोवणे करायचे, आताही करतात. असे पाऊस झडीचे गाव-शहर आणि खेड्यातले, शेतातले चित्र!

 

Web Title: Rainfall after several years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.